भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:17 AM2018-12-12T02:17:18+5:302018-12-12T02:17:40+5:30

उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय

Special public prosecutor for reconciliation of brother and sister relationship | भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत

भावा-बहिणीच्या नात्यातील सलोख्यासाठी खास लोकअदालत

Next

राजगुरुनगर : आर्थिक वादामुळे अनेक ठिकाणी भावा-बहिणीची नाती मोडकळीस आली आहेत. एकमेकांचे तोंडही न पाहण्याइतपत कटुता निर्माण झाली आहे. अशावेळी भावा-बहिणीचे नाते टिकविण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून खास लोकअदालत भरविण्यात येणार आहे.

औद्योगिकीकरणामुळे खेड तालुक्यातील जमिनींना सोन्याचा बाजारभाव आला आहे. अनपेक्षितपणे मिळणाऱ्या मोठ्या पैशामुळे अनेक घरांमध्ये जागा वाटपावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले. भावा-बहिणीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. रक्षाबंधन व भाऊबीज या पवित्र सणांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. यामुळे सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून खेड बार असोसिएशनच्या सहकार्याने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) अशा खास ६८ दाव्यांसाठी लोकअदालतीचे आयोजन प्रांत कार्यालयात करण्यात आले आहे.

यासाठी संबंधित गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांना या लोकांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे, अशी माहिती प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. खेड तालुक्यातील ३७ गावांतील १०७ बेघर भूमिहीन नागरिकांना त्याच गावातील गायरान जमीन लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. यासंदर्भात, येत्या गुरुवारी (दि. १३) प्रांत कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.

प्रत्येक बेघर लाभार्थ्याला अर्धा गुंठा जमीन देण्यात येईल. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खेड तालुक्यातील यापूर्वीच्या प्रस्तावित ८३ लाभार्थ्यांना सोमवारी (दि. १०) जमीन वाटप केले आहे. पालकमंत्री पाणंद योजनेसाठी खेड तालुक्यातून एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे गुरुवारपर्यंत (दि. १३) प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले आहे.

७६ दावेकऱ्यांना कडक सूचना
प्रांत कार्यालयात २८०० महसुली दावे प्रलंबित होते. त्यापैकी १५०० दावे निकाली काढले असून, ५०० दावे अन्यत्र वर्ग करण्यात आले आहेत.
उर्वरित ८०० दाव्यांपैकी ७६ दावेकरी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा फिरकले नाही, अशा नागरिकांना अंतिम सूचना देण्यात आली असून १९ डिसेंबरपर्यंत त्यांनी संपर्क न केल्यास ते दावे निकाली काढण्यात येतील, असा इशारा प्रसाद यांनी दिला.

Web Title: Special public prosecutor for reconciliation of brother and sister relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.