पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 11:40 AM2017-12-01T11:40:25+5:302017-12-01T16:20:52+5:30

पुण्यात एक आळी आहे तिथे फार पुर्वीपासून तांबा आणि पितळेची भांडी आणि वस्तु बनवल्या जातात.

shop in pune makes Copper-brass utenciles from ancient times | पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी

पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी

ठळक मुद्देतांब्याला आयाम देऊन त्यापासून विविध वस्तू बनवणं काही सोपं काम नाही.अगदी शिवाजी महाराजांच्या काळातही पुण्यातील या तांबट आळीला फार महत्व होतं. महिला मंडळांनीही तांब्याच्या वस्तू वापरण्यापेक्षा स्टील, प्लास्टीकची भांडी वापरण्यास अधिक प्राधान्य दिलं.

पुणे : वेगवेगळ्या  कारणांमुळे पुण्याची आणि पुणेकरांची ओळख आहे. त्याचप्रमाणे पुणं हे तांबट आळीतील तांबे-पितळ्यांची भांडी घडवणाऱ्या कारखान्यांमुळेही ओळखलं जातं.  तांब्याला आयाम देऊन त्यापासून विविध वस्तू बनवणं काही सोपं काम नाही. पण गेल्या दिडशे वर्षांहून अधिक काळ तांबट आळीतील कारखान्यांमध्ये  कारागिर त्यांची कला पणाला लावून तांब्या पितळ्यांची भांडी बनवत आहेत. मात्र आता तांब्याला अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने तांबट आळीत हा व्यवसाय लयाला जात असल्याचं समोर येत आहे.

पुण्याच्या तांबट आळीला फार प्राचीन इतिहास आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातही या तांबट आळीला फार महत्व होतं. शिवाजी महाराजांच्या काळात या तांबट आळीतून शस्त्र तयार केली जात असत. त्यानंतर पेशवेकाळात ही मंडळी येथे तांबे-पितळ्यांची नाणी बनवत असत. मात्र नंतर भारतात ब्रिटीशांचे राज्य आले. ब्रिटिशांनी तांबट आळीतील हा व्यवसाय हाणून पाडला. त्यामुळे ९० टक्के तांब्याचा होणारा पुरवठा कमी झाला. तांब्याचा पुरवठाच कमी झाल्याने शस्त्रात्रे बनवणं येथील कारागिरांना कठीण बनलं. मात्र काहीतरी करून उदारनिर्वाह करणं गरजेच होतंच. ‌शेवटी त्यांनी मिळणाऱ्या तांब्यापासून घरगुती भांडी तयार करणं सुरू केलं. पूर्वी प्रत्येक घरात तांब्याची भांडी असत. अगदी चमच्यापासून, ताट, हंडे, कळशी, इतर भांडी ही सगळी तांब्याचीच असत. मात्र कालांतराने या भांड्यांची निगा राखणं कठीण झाल्याने या भांड्याना पर्याय येऊ लागले.

महिला मंडळांनीही तांब्याच्या वस्तू वापरण्यापेक्षा स्टील, प्लास्टीकची भांडी वापरण्यास अधिक प्राधान्य दिलं. त्यामुळे तांबट आळीतील कारखान्यातही याचा परिणाम झाला. एकतर ब्रिटीशांनी तांब्याची होणारी आयात कमी केल्याने शस्त्र बनवणं शक्य नव्हतं आणि तांब्याच्या भांड्यासाठी स्टीलचा पर्याय आल्याने तांब्याच्या भांड्याचीही मागणी कमी झाली. त्यामुळे पुण्यातील ही तांबट आळी सध्या विस्मृतीत जाऊ लागली आहे. येथील कारागिरांनी नव्या तंत्रज्ञानाने स्वत:ला अद्ययावत न केल्याने त्यांची कला लोप पावत असल्याचे काहीजण सांगतात. पण दुसरीकडे त्यांची हीच कला अजरामर रहावी याकरता काही सुशिक्षित मंडळींनी पावलंही उचलली आहेत.प्रोडक्ट डिझायनचे शिक्षण घेतलेल्या रश्मी रानडे यांनी या व्यवसायाला पुन्हा चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

तसेच या क्षेत्रातील अनेक सुशिक्षित मंडळीनी यात अद्यायवत तंत्रज्ञान आत्मसात करून तांब्याच्या पितळ्यांच्या भांड्याना आधुनिकतेचे रुप देण्याचे काम सुरू आहे. अर्थात पूर्वीप्रमाणे तांब्याच्या वस्तू नियमित वापरता येणं जरा कठीण आहे, पण घराची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच या तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो. तांब्या-पितळांचे हांडे, घागरी, कळशी, भगूली, तपेली, घंगाळी, बंब, पवाळी यासारख्या विविध वाणांचा खास पुणेरी घाट उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुण्यात तांबट आळीत घरांना लागून असलेल्या या कारागिरांचे कारखाने म्हणजे व्यवसाय आणि शिक्षणाचे विद्यापीठच आहेत. सव्वाशे वर्षांपूर्वी पुण्यात पितळकामाचे ७० व्यावसायिक आणि अडीच हजार कामगार होते. ८०० तांबट होत. तर १९२० च्या सुमारास पुण्यात पितळकामाचे ११० कारखाने आणि भांडी घडविणाऱ्यांची संख्या १२० होती.

 गेल्या काही वर्षांत तांब्या-पितळ्यांच्या भांड्यांना पर्याय उपलब्ध झाल्याने तांब्याच्या भांड्यांची मागणी कमी झाली. औद्योगिक विकास झाल्याने हातघडणाच्या कामाला उतरती कळी येऊ लागलीय. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून मेटल क्राफ्टची पदवी घेणारा स्वप्नील गोडसे म्हणतो, ‘पुण्यात आता जवळपास २५ तांबे-पितळ घडवण्याचे कारखाने असतील. धातूकामाचा हा व्यवसाय पूर्णपणे गृहोद्योग आहे. पवळे चौकाच्या परिसरात एकमेंकापासून ज‌वळ कारखान्यांचे दोन समूह आहेत. कसबा पेठेतील घरांच्या पडव्यांमधून आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेत विविध प्रकारचे, आकाराचे आणि वजनाचे हातोडे, तांबे, पितळेचे पत्रे कारागिर घडवताना दिसतात. ही भांडी बनवण्याची अवजारेही विशेष आहेत.

तबकं, स्वाग, रेनंद, तेजप, पत्री, खरवई, खोड, मोगरी, तावकाम, खोलण्या, लोखंडी उबाळा, लोखंडी आडी, दांडकं अशा विविध अवजारांचा वापर करून ही भांडी बनवली जातात.’ हा व्यवसाय हस्तकौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या व्यवसायाने परदेशी बाजारपेठेतही आपले बस्तान बसवलेले आहे. शंभर वर्षांपूर्वी या पुण्यामध्ये तांब्या पितळेची भांडी तयार करण्याचे कारखाने नव्हते, भांडी परगावाहून पुण्यात येत असत असं सांगण्यात येतं. मात्र कालांतराने पुण्यात प्रगती झाली. त्यामुळे पुण्यातही कारखाने उभे राहू लागले. 

सतत बदलत राहणे हा काळाचा गुणधर्म आहे. म्हणून काळाच्या प्रवाहाबरोबर जो राहतो तोच टिकतो. तांबट व्यवसायाचेही असेच झाले. तांबट व्यवसायातील कारागिरांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणली नाही, परिणामी त्यांचा व्यवसाय आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे. ज्याठिकाणी पुण्यात पूर्वी शंभरहून अधिक कारखाने होते, त्याचठिकाणी आता केवळ २५ ते ३० कारखाने उरले आहेत. याविषयी स्वप्नीलला विचारले असता तो म्हणाला,“तांब्या-पितळेचा हंडा, कळशी, बंब, घंगाळ आणि इतर ठराविक वस्तू सुरेख घाटात बनविणारे हे कलाकार इतर अनेक वस्तूही निश्चित तितक्याच सुंदर बनवू शकतात. या कलाकार हातांना आधुनिक तंत्रज्ञानाचे, सुयोग्य संचालनाचे, योग्य मागर्दशनाची जोड मिळाली तर हाच बसू पाहणारा व्यवसाय पुन्हा नव्याने जोमाने उभारी धरेल. तसंच, तांबट व्यवसाय हा अजूनही वैयक्तिक स्तरावर चालू आहे. सहकारी तत्वावरील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावरील बँकांची सरकारी मदत मिळते आहे. या सवलतींचा फायदा घेऊन बदलेल्या सहकारी स्वरुपात हा व्यवसाय सुरू झाला तर याला निश्चित भरभराटीचे दिवस येतील.’ 

तो पुढे म्हणतो की, ‘मागणीप्रमाणे पुरवठा या तत्वावर आज आपण आपल्या उत्पादनाच्या वस्तूंमध्ये भर घातली पाहिजे. हंडा, कळशी, बंब यासारख्या पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंबरोबर शोपीस याप्रकारत  मोडल्या जाणाऱ्या वस्तूही आपण निर्मितीत आणल्या तर त्याला निश्चितच भरपूर मागणी असेल. पण त्यासाठी योजनाबद्ध जाहिरातींचीही आवश्यकता आहे. अशावेळी आपल्या कलावंतांच्या कलाकृती या प्रसिद्धीविना अंधारात न राहता जर वेगवेगळ्या माध्यमातून प्रदर्शने, सेल, जाहिराती अशा विविध माध्यमाने जगापुढे आल्या तर तांबट व्यवसायाला आणखी चालना मिळेल. ’

पूर्वी ज्याप्रमाणात तांब्या-पितळेंची भांडी इथं बनवली जायची त्यांचं प्रमाण आता फारसं कमी झालंय. ज्याप्रमाणे मागणी केली जाईल तेवढीच भांडी घडवली जातात. शिवाय सध्या घरगुती भांड्यापेक्षाही प्रदर्शन स्वरुपातील भांड्यानाच जास्त मागणी आहे. विशेषत: देवळातील देवांचे दागिने, मुकुट, मखर, पायऱ्या अशा गोष्टी सध्या येथे घडवल्या जातात. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड असेल तर तो व्यवसाय यशस्वी होतो. तांबट व्यवसायाला पूर्वीप्रमाणे रुप यावं याकरता पुण्यातील आणि या तांबट कला क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे तांबट व्यवसायाला आणि तांबट आळीला पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील ए‌वढीच अपेक्षा करूया. 

आणखी वाचा - पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तुंना भेट दिलीत का?

Web Title: shop in pune makes Copper-brass utenciles from ancient times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.