‘त्या’ नराधम शिपायाला जन्मठेप

By admin | Published: September 28, 2016 04:39 AM2016-09-28T04:39:14+5:302016-09-28T04:39:14+5:30

जुन्नर तालुक्यातील अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंग कल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील पहिल्या खटल्याचा मंगळवारी निकाल लागला. या केंद्रातील

'She' gave birth to a Naradham Shipa | ‘त्या’ नराधम शिपायाला जन्मठेप

‘त्या’ नराधम शिपायाला जन्मठेप

Next

राजगुरुनगर : जुन्नर तालुक्यातील अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंग कल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील पहिल्या खटल्याचा मंगळवारी निकाल लागला. या केंद्रातील इयत्ता पाचवीतील तीन मुलींना जिवे मारण्याची धमकी देऊन, त्यांच्यावर वर्षभर बलात्कार करणाऱ्या आणि याच अपंग कल्याण केंद्रात शिपाई म्हणून काम करणाऱ्या महादेव आसराजी बोऱ्हाडे (वय ५४, मूळ रा. बालम टाकळी, ता. शेगाव, जि. अहमदनगर) या गुन्हेगारास राजगुरुनगरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या बलात्कार प्रकरणातील आणखी दोन अपंग मुलींच्या खटल्याचा निकाल येत्या बुधवारी आणि शुक्रवारी लागणार आहे.
या खटल्याबाबत सविस्तर हकीकत अशी : जुन्नर तालुक्यातील अणे येथे शासनमान्य भाऊसाहेब बोरा अपंग कल्याण केंद्र आहे. हे केंद्र अनुदानप्राप्त असून, तेथे केंद्रातर्फे शाळा आणि वसतिगृह चालविले जाते. राज्यभरातून अपंग विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आरोपी महादेव बोऱ्हाडे या केंद्रात शिपाई म्हणून काम करीत होता. सन २०१२ आणि २०१३ च्यादरम्यान त्याने या केंद्रामधील मूळ त्याच्या गावाकडील असलेल्या अपंग मुलींशी सलगी साधली. त्यानंतर एकदा तिला नातेवाइकांचा फोन आला आहे, असे सांगून धान्य ठेवण्याच्या खोलीत नेऊन दमबाजी करून आणि जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.
दरम्यान, शाळेला सुटी लागल्यावर पीडित मुलीला न्यायला तिचे पालक आले असता, मुलीने रडून ही हकीकत त्यांना सांगितली. आपल्याबरोबर दोन मैत्रिणीही आरोपीच्या अत्याचाराला बळी पडत असल्याचे तिने सांगितले. पीडितेच्या पालकांनी जेव्हा अपंग केंद्राच्या शिक्षक आणि संस्थाचालकांना माहिती दिली, तेव्हा त्यांनी त्यांना पाठिंबा आणि दिलासा देण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तरी पीडित मुलीने नारायणगाव पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०१३ रोजी तक्रार दिली. त्यापाठोपाठ वणी (नाशिक) येथील दुसऱ्या पीडितेने आणि खेड तालुक्यातील तिसऱ्या पीडितेनेही स्वतंत्र तक्रारी दिल्या. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर आणि पोलीस शशिकांत खरात यांनी तपास केला.
बोऱ्हाडे याच्यासह संस्थाचालक, शिक्षक मिळून १४ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांनी आरोपी महादेव बोऱ्हाडे याला ११ एप्रिलला अटक केली. मात्र, इतर आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतला होता. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अरुण ढमाले यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

सक्तमजुरी, कारावास : या कलमांखाली झाली शिक्षा
राजगुरुनगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हे तिन्ही खटले स्वतंत्रपणे चालू होते. त्यातील पहिल्या खटल्याचा निकाल आज लागला. त्यात आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली भा. दं. वि. कलम ३७६ नुसार जन्मठेप व ३ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिने सक्तमजुरी, विनयभंगाच्या आरोपाखाली कलम ३५४ नुसार १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल कलम ५०६ नुसार २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने शिक्षा सुनावली. या खटल्याच्या निकालात आरोपीला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम ४ व ६ नुसार १०-१० वर्षे सक्तमजुरी व २ हजार
रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिने कारावास; तसेच या कायद्याच्या कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने शिक्षा, कलम १० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी
व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने कारावास अशीही शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगायच्या आहेत, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.

शिक्षक सावळेराम पाचारणे निर्दोष
पीडित मुलगी, तिची आजी आणि इतर तिघे जण यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यात डॉक्टरांनी दिलेला अहवाल न्यायालयाने गृहीत धरून आरोपीला शिक्षा दिली.
या खटल्यात सहआरोपी असलेले शिक्षक सावळेराम सीताराम पाचारणे यांच्याविरोधात गुन्ह्याची माहिती असून, ती लपवल्याचा आरोप होता, त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. या प्रकरणातील उर्वरित दोन निकालांकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: 'She' gave birth to a Naradham Shipa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.