बँकेच्या एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:43 AM2019-03-11T03:43:22+5:302019-03-11T03:43:55+5:30

दिवसा-रात्री एटीएममधून पैसे चोरणे वाढले; अनेक सेंटरवर चौकीदार काढतात झोपा

Security of bank ATMs 'Ram Bharose' | बँकेच्या एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’

बँकेच्या एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’

Next

पुणे : शहरातील बहुतांशी एटीएममध्ये कॅमेरे बंद अवस्थेत असून, ते केवळ ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आहेत का, असा प्रश्न ग्राहकांकडूनच विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएमशी छेडछाड करु न त्यातून पैसे काढण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे अनेक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षेकरिता नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक चक्क झोपा काढत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता प्रयत्न करीत असताना दुसऱ्या बाजूला बँक व्यवस्था एटीएम सुरक्षासंदर्भात गांभीर्याने विचार करीत नसल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात दोन नायजेरियनांना एटीएममधून पैसे चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली. विशेषत: मुंढवा, कोंढवा, चंदननगर, बिबवेवाडी, गोकुळनगर या परिसरातील एटीएम सेंटरमध्ये अनेकांची फसवणूक झाली आहे. स्पाय कॅमेरा आणि स्कॅमरच्या मदतीने एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यापुढील काळात लाखो रुपयांचा अपहार एटीएम मशीन फसवणूक प्रकरणात झाला आहे तो उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तविली आहे. मात्र या सगळ्यात शहरातील एटीएम मशीन सेंटरमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहवयास मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमधील एटीएम सेंटरमध्ये देखील सुरक्षारक्षक नाहीत. तर ज्या ठिकाणी आहेत तिथे ते पेंगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. संबंधित बँकेच्या एटीएममध्ये गेले असता, तिथे असणारा कॅमेरा हा सुरु आहे किंवा बंद याचा तपास करणारी कुठली यंत्रणा आहे. त्याबद्दल ग्राहक तक्रारी करु लागले आहेत. याविषयी अधिक माहिती देताना कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, हल्ली ज्यापद्धतीने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होत आहे ते पाहता त्यानुसार अद्ययावत सोयीसुविधा बँकांनी करुन घेणे गरजेचे आहे. पोलिसांकडून रात्री- मध्यरात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. मात्र त्या वेळी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु आहेत किंवा नाहीत याबद्दल माहिती मिळत नाही. बँकांनी सक्षम यंत्रणा उभारावी. कार्ड क्लोनिंग करून बिनधास्तपणे ग्राहकांचे पैसे चोरीला जात आहेत.

सावधान, तुमचा पासवर्ड हँक होतोय
पैसे काढण्याकरिता ज्या एटीएममध्ये ग्राहक जातात त्यांनी आपल्या समोरील बाजूस कॅमेरा आहे किंवा नाही हे पाहावे. कॅमेरा मागील बाजूस असल्यास त्याची माहिती बँकेला द्यावी. पासवर्ड टाकताना काळजी घ्यावी. नंबर पॅडजवळील मोकळ्या फटीत स्पाय कॅमेरे बसवून तुमचा पासवर्ड नंबर हॅक केला जातो.
याचबरोबर स्कँमरच्या साह्याने आपल्या एटीएम कार्डची माहिती मिळवली जाते. ज्या जागेत कार्ड आत सरकवले जाते तिथे स्कीमर लावून त्या कार्डवरील डेटा लॅपटॉपमध्ये सेव्ह केला जातो. या माहितीच्या आधारे चोरी केली जाते. तसेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये ती माहिती विकली जाते.
त्यामुळेच अनेकदा कुठल्याही क्रमांकावरून फोन येऊन त्यावरून आपल्या बँक अकाऊंटची माहिती विचारून फसवणूक केली जाते. याबद्दल ग्राहकांंनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे.

सुरक्षारक्षक चक्क झोपतात...
शहरातील अनेक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक डुलक्या घेत असल्याचे दिसून येते. काही एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षकच नाहीत. त्या एटीएम सेंटरमध्ये कागदाचे बोळे इतस्तत: पसरले दिसतात. दरवाजे खिळखिळे अवस्थेत असून, त्याठिकाणी लावण्यात आलेले एसीदेखील बंद असल्याची तक्रार ग्राहक करतात. शहरातील खरेदीच्या प्रमुख ठिकाणी उदा. लक्ष्मी रस्ता, मंडई, कॅम्प परिसरातील एटीएम सेंटरमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्याची तक्रार ग्राहक करत असून तातडीने शहरातील सर्वच एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक असावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Security of bank ATMs 'Ram Bharose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम