कऱ्हा पात्रात खडखडाट

By admin | Published: April 26, 2017 02:45 AM2017-04-26T02:45:39+5:302017-04-26T02:45:39+5:30

पुरंदर तालुक्याची जीवनदायिनी व साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दर्जेदार लेखणीद्वारे अजरामर केलेली कऱ्हा नदी

Rumble in the tax haven | कऱ्हा पात्रात खडखडाट

कऱ्हा पात्रात खडखडाट

Next

गराडे : पुरंदर तालुक्याची जीवनदायिनी व साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दर्जेदार लेखणीद्वारे अजरामर केलेली कऱ्हा नदी यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात कोरडी ठणठणीत पडली आहे. गराडे तलावातून शेतीस देण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविण्यात आले आहे.
फक्त धरणातील व धरणाखालील विहिरीत पाणीसाठा असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे. गराडे परिसरातील पाझर तलाव, बंधारे, विहिरी आटल्याने पाणीटंचाई भासू लागली आहे. गुरे-ढोरे, बकरी, वन्यप्राण्यांचे पाण्याच्या कमतरतेमुळे हाल होत आहेत. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे पश्चिम पुरंदरमध्ये पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे.
गराडे गावानजीक दरेवाडी
(ता. पुरंदर) येथे कऱ्हा नदीचे उगमस्थान आहे. कऱ्हा गराडे व कोडीत गावातून वाहत सासवड येथे येते. कऱ्हा नदीची चरणावती ही उपनदी आहे. ती भिवरी येथे उगम पावून बोपगाव, चांबळी, हिवरे गावातून वाहत येत सासवड येथील संगमेश्वर मंदिराजवळ कऱ्हा व चरणावती नदीचा संगम होतो. सासवड, खळद, बेलसर या गावातून कऱ्हेचे पाणी धावते. कऱ्हा नदीवर जेजुरीजवळ नाझरे हे मोठे धरण आहे. कऱ्हा नदीचा प्रवास पुरंदर तालुक्यातुन पुढे बारामतीकडे होतो. कऱ्हा नदीकाठावर अनेक शिवालये आहेत.
गराडे विहीर, दरेवाडी, वारवडी येथील बंधाऱ्यात अजूनही पाणीसाठा टिकून असल्यामुळे गराडे पंचक्रोशीला पाणीटंचाई जाणविणार नाही, असे दिवे- गराडे गटाचे माजी जि. प. सदस्य गंगाराम जगदाळे यांनी सांगितले.
कऱ्हा नदीवर गराडे येथे लघुपाटबंधारे तलाव बांधण्यात आला आहे. गराडे तलाव ६५.३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. आजअखेर गराडे तलावात २ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गराडे तलावातून सासवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे महिनाभरापासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
सध्या सासवडकरांना वीर धरणातून पाणीपुरवठा चालू आहे. गराडे तलावातून बोपगाव व गराडे गावच्या पाणीपुरवठा योजना आहे. तसेच गराडे तलावाखालील विहिरीवर कोडीत व हिवरे गावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू आहेत. गराडे तलावातील पाणी काटकसरीने वापरल्यास मे महिन्याअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी माहिती गराडे पाटबंधारे शाखाधिकारी एम. डी. मोहिते यांनी दिली.

Web Title: Rumble in the tax haven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.