राजरोस छेडछाड होताना मदतीचे हात पुढे येतच नाहीत; पुण्यातील वास्तव, महिलासुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:57 PM2017-12-15T12:57:12+5:302017-12-15T13:06:29+5:30

भर रस्त्यात तरुणींची छेडछाड होते... अश्लील कमेंट केली जाते...एवढे सगळे घडत असताना नागरिकांमधून मदत मात्र मिळत नाही. पोलिसांचा कमी झालेला धाक आणि लोकांच्या उदासिनतेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

roadromio problem; women security in pune | राजरोस छेडछाड होताना मदतीचे हात पुढे येतच नाहीत; पुण्यातील वास्तव, महिलासुरक्षा ऐरणीवर

राजरोस छेडछाड होताना मदतीचे हात पुढे येतच नाहीत; पुण्यातील वास्तव, महिलासुरक्षा ऐरणीवर

Next
ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणांवर महिलांना ‘ईव्ह टीजिंग’चा करावा लागतो सामना'रहदारी कमी आहे तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत'

पुणे : भर रस्त्यात तरुणींची छेडछाड होते... अश्लील कमेंट केली जाते... पाठलाग केला जातो... तिला टवाळखोरांकडून मारहाण होते... तर कधी रस्त्यात भरदिवसा खूनही होतो... एवढे सगळे घडत असताना नागरिकांमधून मदत मात्र मिळत नाही. पोलिसांचा कमी झालेला धाक आणि लोकांच्या उदासिनतेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
महिला छेडछाड, रोडरोमिओंचा सहन करावा लागणारा त्रास, पाठलाग, एकतर्फी प्रेमामधून होणारी छळवणूक अशा एक ना अनेक समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. त्यामधून होणाऱ्या मानसिक त्रासामधून अनेक मुली आणि महिलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे ताजी आहेत. आजही शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, बसथांबे, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर महिलांना ‘ईव्ह टीजिंग’चा सामना करावा लागतो. या छेडछाडीचा सामना कसा करायचा, पोलिसांची मदत कशी घ्यायची, यासोबतच स्वसंरक्षण कसे करावे, यासाठी पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासमधील मुलींशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हा संवाद काही दिवसच चालला. 
बुधवारी रात्री चंदननगर परिसरात एका तरुणीला मद्यधुंद अवस्थेतील  तरुणांनी बेदम मारहाण केली. तसेच तिला अश्लील शिवीगाळ करीत कोणाकडे तक्रार करायची ते कर, वर अशी धमकीही दिली. सार्वजनिक ठिकाणावर घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. हा एक प्रसंग सोशल मीडियामुळे समोर आला. मात्र, असे अनेक प्रसंग अनेकदा समोर येत नाहीत. मुली घाबरून तक्रार करायला धजावतच नाहीत. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बागा, गल्लीबोळा, बाजार, क्लासेस, बसथांबे, धार्मिक स्थळं, महत्त्वाचे रस्ते आणि खाऊगल्ल्या आदी ठिकाणांवर तर ही स्थिती सर्रास पाहायला मिळते. करमणुकीसाठी किंवा विकृतीमधून मुलींची, महिलांची छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या मुली व महिलांनाही छेडछाडीचा सामना करावा लागतो. अंगचटीला येणे, लगट करणे, महिलांना उद्देशून अश्लील भाष्य करणे, असे प्रकार बसमध्येही घडतात. 

काही प्रौढ लोक लहान शाळकरी मुलींकडे पाहून इशारे करतात. कॉलेजच्या आसपास खूप टवाळखोर मुले येऊन बसतात. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी मुलींना पाहून अश्लील इशारे, शेरेबाजी करतात. कधी कधी पाठलागही करतात आणि फोन नंबर मागतात, अशा गोष्टी मुली शक्यतो घरी सांगणे टाळतात. कारण, यातून त्यांचेच नुकसान होण्याची शक्यता असते. शनिवारवाड्याजवळ आमच्या एका मैत्रिणीची छेड काढली होती. तेव्हा आसपासच्या लोकांनी तिची मदत केली होती. त्या टवाळखोर मुलांना चोप दिला होता.    
- शिल्पा, स्नेहल

मी १५ वर्षांपासून नोकरी करते. रात्री घरी जाण्यासाठी उशीर होतो. पण मला तरी अद्याप असा काही वाईट अनुभव आला नाही. अनेक सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींना वाईट लोकांना सामोरे जावे लागते. काही लोक बसस्टॉपवर थांबल्यावर एकटक पाहत राहतात. त्यांचे नजरेनेच कसेतरी वाटते. अनेकवेळा स्वत:सोबत छेडछाडीचे प्रकार झाले, तर घरी सांगत नाहीत कारण घरचे अविचाराने मुलींचे बाहेर फिरणेच बंद करतात.
- महिला नोकरदार

मुलींसोबत दररोज कुठेना कुठे वाईट प्रकार घडत असतात. मुलगी घरातून निघाल्यानंतर सायंकाळी घरी येईपर्यंत मनामध्ये काळजीच असते. त्यामध्ये मुलींची कोणीतरी छेड काढल्यास मुली घरच्यांच्या भीतीने सांगत नाहीत. असे झाल्यास आम्ही पालकांनी कसे मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करायला हवे? आम्हा पालकांसाठी हा गंभीर विषय झाला आहे. 
- पालक

ज्या ठिकाणी रहदारी कमी आहे तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. शहरातील बऱ्याच मुलींना नोकरीनिमित्त बाहेर पडावे लागते, त्यांना रात्री अपरात्री घरी जायला उशीर होतो. यावर उपाय म्हणून मुलींनी त्यांच्याकडे त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही स्प्रे ठेवावे. आपण कितीही म्हटले, की आपल्या देशामध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. पण एक कठोर सत्य म्हणजे मुली मुलांच्या तुलनेत शारीरिक ताकतीने कमी असतात, म्हणून त्यांनी प्रामुख्याने कराटे, बॉक्सिंग यासारखे शिक्षण घ्यावे.
- स्नेहा 

आम्हाला पुण्यामध्ये येऊन तीन ते चार महिने झाले आहे. आम्ही यापूर्वी चाकण एमआयडीसीमध्ये काम करायचो. या ठिकाणी लोकांचा मुलींकडे बघण्याची नजर खूप वाईट आहे. मुलींना मुद्दामहून हात लावणे, गाडीमध्येच थांबवून मी सोडते म्हणून फसवण्याचा प्रयत्न करणे, मुलींवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणे हे सर्व प्रकार येथे नेहमी चालू असतात. यावर पुणे पोलिसांनी कडक कारवाई करावी असे आम्हाला वाटते. 
- करिष्मा, ॠतुजा

एकदा एक आजोबा बसमध्ये चढले त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती म्हणून मी त्यांना जागा दिली व मी सीटच्या शेजारी उभी राहिले ते जाणून बुजून वारंवार माझ्या मांडीला स्पर्श करत होते. म्हणजे मी त्यांना दया दाखविली त्यांनी माझ्याकडे वासनेच्या नजरेने पाहिले.    
- अस्मिता

Web Title: roadromio problem; women security in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे