रस्ता सिंहगडाचा; चाल मात्र कासवाची

By admin | Published: March 3, 2016 01:48 AM2016-03-03T01:48:07+5:302016-03-03T01:48:07+5:30

रस्त्यावर जागा मिळेल तिथे उभी करण्यात आलेली वाहने. बंदी असतानाही राजरोसपणे सुरू असलेला जडवाहनांचा संचार. त्यातच भरीस भर म्हणून प्रवासी घेण्यासाठी वाहतुकीचे नियम धुडकावत

Road Sinhagad; The trick but the turtle | रस्ता सिंहगडाचा; चाल मात्र कासवाची

रस्ता सिंहगडाचा; चाल मात्र कासवाची

Next

रस्त्यावर जागा मिळेल तिथे उभी करण्यात आलेली वाहने. बंदी असतानाही राजरोसपणे सुरू असलेला जडवाहनांचा संचार. त्यातच भरीस भर म्हणून प्रवासी घेण्यासाठी वाहतुकीचे नियम धुडकावत, ऐन वर्दळीच्या रस्त्यावर कुठेही थांबणाऱ्या रिक्षा आणि एवढे कमी की काय म्हणून तब्बल दीड ते दोन किलोमीटर रस्त्यावर जागा मिळेल तिथे बसलेले भाजी; तसेच फळविक्रेते आणि खरेदीदारांच्या वाहनांनी अडविलेला रस्ता यांमुळे नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) वाहतूककोंडीत गुदमरून गेला आहे. या रस्त्याला कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने, दांडेकरपुलापासून धायरीफाट्यापर्यंत या रस्त्यावरून वाट काढताना वाहनचालकांना मोठ्या दिव्याचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर असणाऱ्या
वाहतूककोंडीमुळे ‘धायरी ते स्वारगेट’ हा अवघा १० किलोमीटरचा रस्ता आणि त्यावर असलेले ९ सिग्नल पार करण्यासाठी तब्बल १ तासाचा वेळ लागतो. म्हणजेच वाहनचालकांना अवघ्या ताशी दहा किलोमीटर वेगानेच या रस्त्यावर वाहने चालवावी लागत असल्याचे वास्तव आहे.
सिंहगड रस्त्यावरील ‘माणिकबाग ते राजाराम पूल’ हे अंतर गर्दीच्या वेळी पार करण्यासाठी किमान २0 मिनिटांचा वेळ लागतो. येथे संतोष हॉलच्या सिग्नलजवळ प्रचंड
वाहतूककोंडी होते. येथे पर्यायी रस्त्याची अथवा उड्डाणपुलाची गरज आहे. तरच या प्रश्नावर मार्ग निघू शकतो.
भाजी मंडई बांधून पडून असून त्याचा वापर केवळ महापालिका तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीवेळी मतदान केंद्रासाठी केला जातो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांची दुकाने रस्त्यावरच आहेत. विशेषत: सायंकाळी रस्त्यावर असलेल्या भाजी खरेदीसाठी ग्राहक भर रस्त्यातच आपली वाहने उभी करतात.
एक उड्डाणपूल असलेला रस्ता
एकही पर्यायी रस्ता नसल्याने, सिंहगड रस्त्याला जवळपास वीस ते बावीस इतर लहानमोठे जोड रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे या रस्त्यावर असलेले वडगाव स्मशानभूमीचा चौक, संतोष हॉल, राजारामपूल, दत्तवाडी चौक, दांडेकरपूल या प्रमुख चौकांमध्ये दिवसभर वाहतूककोंडी झालेले असते. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पादचारीही रस्ता ओलांडत आहेत. त्या ठिकाणी भुयारीमार्गही नाहीत. धायरी फाट्यावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, त्यावरून धायरीकडे जाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. यामुळे धायरीफाट्याकडे जाण्यासाठी अवघा १५ फु टांचा रस्ता ठेवण्यात आला आहे. त्या रस्त्यावरही वाहनांचे पार्किंग सुरू असल्याने, रस्ता शोधतच धायरीकडे जावे लागते, तर उड्डाणपुलाच्या खालची जागाही पार्किंगने घेतल्याने या ठिकाणी पुन्हा वाहतूककोंडीची समस्या सुरूच आहे.
रुंदीकरणाची जागा घेतली अतिक्रमणांनी
केंद्रशासनाच्या ‘जेएनएनयूआरएम योजने’तून या रस्त्यावर महापालिकेकडून बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग सुरू करायचा असल्यास त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक होते. त्यानुसार, पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून, या मार्गाचे रुंदीकरणही केलेले आहे, तर केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या मार्गावर सायकल ट्रॅक आणि पदपथही उभारलेला आहे. मात्र, त्याची जागा अतिक्रमणांनी घेतली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर असलेल्या हॉटेल; तसेच व्यावसायिकांच्या अस्थापनांची वाहने, तर इतर ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी तसेच फळविक्रेत्यांनी तर काही ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांनी हे पदपथ आणि ट्रॅक गिळंकृत केले आहेत, तर काही ठिकाणी पालिकेच्या कचरा पेट्या आणि बसथांबे तसेच स्वच्छतागृहेही चक्क पदपथावरच उभारण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून वाट शोधवी लागते.

पर्यायी रस्ताच नाही
सिंहगड रस्ता परिसराचा मोठा विस्तार झाला आहे. प्रामुख्याने मध्यवस्ती मधील पेठांमधील नागरिकांची; तसेच मध्यमवर्गीय नोकरदारांची या परिसरास पसंती असल्याने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत लोकवस्ती वाढलेली आहे. त्यातच किरकटवाढीसह, धायरी, नऱ्हे, नांदेड फाटा, कोल्हेवाडी परिसरात मोठ्या टाऊनशिप उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असली, तरी या रस्त्याला इतर कोणताही पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे एकाच रस्त्यावरून दररोज किमान तीन ते चार लाख वाहने प्रवास करतात. या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महापालिकेकडून ‘विठ्ठलवाडी ते वारजे पूल’ हा नदीपात्रातील रस्ता प्रस्तावित केला होता. या रस्त्याचे ८० टक्क्यांहून अधिक कामही पूर्ण झालेले होते. मात्र, पर्यावरणप्रेमींनी त्यास आक्षेप घेतल्याने हा रस्ता न्यायालयाच्या आदेशानुसार उखडून टाकण्यात आला आहे, तर वडगाव फाटा येथून खडकवासला कालव्याच्या बाजूने जनता वसाहतीपर्यंत आणखी एका पर्यायी रस्त्याची आखणी महापालिकेकडून करण्यात आली आहे; मात्र हा रस्ताही केवळ चर्चा, निधी आणि मान्यतांच्या फेऱ्यातच रखडलेला आहे.
या रस्त्याला पर्यायी असलेल्या रस्त्याचे काम कालव्याच्या बाजूने सुरू आहे; मात्र हा रस्ता वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे आवश्यक तेथे उड्डाणपूल आणि आवश्यक तेथे भुयारी मार्ग उभारणे गरजेचे आहे. तसेच, ‘शिवणे-खराडी’ रस्त्याला जोडण्यासाठी हिंगणे चौकातून नदीच्या पुढील बाजूस उड्डाणपूल करावा.
- श्रीकांत जगताप (नगरसेवक)

Web Title: Road Sinhagad; The trick but the turtle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.