भाजपाच्या 'घरच्या' मतदारसंघातही मतदान घटलं; मायक्रो प्लॅनिंग फसलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:00 AM2019-04-25T06:00:00+5:302019-04-25T11:34:14+5:30

खुद्द काँग्रेस आघाडीलाही कसब्यातून फार अपेक्षा नव्हती. त्यांनी कसब्यात फार लक्ष दिलेच नाही. त्यामुळेच भाजपाकडून जास्त अपेक्षा होती.

Reputation in the Kasba constituency is going on | भाजपाच्या 'घरच्या' मतदारसंघातही मतदान घटलं; मायक्रो प्लॅनिंग फसलं?

भाजपाच्या 'घरच्या' मतदारसंघातही मतदान घटलं; मायक्रो प्लॅनिंग फसलं?

Next
ठळक मुद्देगिरीश बापट यांनी नगरसेवक म्हणून तीन वेळा व त्यानंतर आमदार म्हणून ५ वेळा कसब्याचेच प्रतिनिधीत्व

पुणे : कसबा विधानसभाची एकूण मतदार संख्या २ लाख ८९ हजार २५. त्यातील १ लाख ६१ हजार ४९७ जणांनी मतदान केले. त्यात ८४ हजार ९४८ पुरूष व ७६ हजार ५४९ महिला मतदार आहेत. मतदानाची ही टक्केवारी ५५.८८  इतकी आहे. ही मते भाजपा-शिवसेना महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी यांना मिळून पडली आहे. त्यात भाजपाची मते किती असतील हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, मात्र जे काही मतदान झाले आहे ते अपेक्षेपेक्षा कमी आहे.  भाजपाच्या घरच्या मतदारसंघात ते असे असावे हे त्यांनी निवडणुकीआधी जाहीर केलेल्या त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगच्या रचनेच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. अन्य पाच मतदारसंघांपेक्षा ही टक्केवारी जास्त आहे ही त्यातल्या त्यात भाजपासाठी बरी गोष्ट.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी नगरसेवक म्हणून तीन वेळा व त्यानंतर आमदार म्हणून ५ वेळा त्यांनी कसब्याचेच प्रतिनिधीत्व केले. त्यामुळेच प्रचाराच्या समारोपाची सभा करताना ते भावूक झाले होते. त्याशिवाय कसब्यातील १६ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक भाजपाचेच. इथूनच आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल याचा बापट यांना विश्वास आहे, तसे ते असेलही कदाचित, मात्र जास्त टक्के मतदान झाले असते तर त्यामध्ये त्यांच्या मतांचा वाटा अर्थातच मोठा असला असता. मतदानच कमी झाल्यामुळे तसे आता होणार नाही असेच स्पष्ट दिसते आहे. म्हणजे कसब्यात बापट यांची मते जास्त असतील, मात्र ती दिपवून टाकणारी नक्कीच नसतील. ही एक प्रकारची नामुष्कीच आहे. कारण मागील वेळी ५९.३१ टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्त अपेक्षा असताना ते  ५५. ८८ इतके म्हणजे कमी झाले आहे.
खुद्द काँग्रेस आघाडीलाही कसब्यातून फार अपेक्षा नव्हती. त्यांनी कसब्यात फार लक्ष दिलेच नाही. त्यामुळेच भाजपाकडून जास्त अपेक्षा होती. मतदानाच्या सुरूवातीच्या काळात ती पुर्णही होत होती. सकाळी ११ वाजेपर्यंत आपले हक्काचे मतदान करून घ्यायचे असे आदेशच सर्वांना बजावण्यात आले होते. त्याप्रमाणे काम सुरू होते. दुपारी ११ नंतर ही संख्या कमी झाली. १ वाजल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते गायबच झाले. कसबा, शनिवार, सदाशिव, नारायण या पेठा म्हणजे भाजपाची पिढीजात प्रॉपर्टी. तिथेही दुपारनंतर फिरताना कोणी दिसत नव्हते. सगळे निवांत झाले होते.
दुपारी ४ नंतर गुरूवार पेठ, मोमिनपुरा येथील मतदान केंद्रांवर पुन्हा गर्दी होऊ लागली. या गदीर्ने कोणाला मतदान केले हे गुप्त असले तरी हा सगळा काँग्रेसचा पारंपरिक मतदार समजला जातो. दुपारी ३ पर्यंत एकूण टक्केवारी ३३ टक्के होती, म्हणजे मतदान संपेपर्यंत दुपारी ३ नंतर साधारण १६ टक्के मतदान झाले आहे. ते कोणाच्या पारड्यात पडले किंवा सकाळी झालेल्या एकूण मतदानाचा किती टक्के हिस्सा कोणाला मिळाला यावर विजय कोणाचा होईल याचा अंदाज काढता येतो. भाजपाकडून सांगण्यात येत आहे की आमचे सर्व मतदान बरोबर झालेले आहे. काँग्रेस आघाडीचेच मतदान झालेले नाही, त्यामुळे टक्केवारी घटली. काँग्रेसचे म्हणणे आहे की भाजपामधील बापट यांच्या विरोधातील नाराजी कमी मतदानातून दिसून आली. खरे काय आहे ते २३ मेला स्पष्ट होईलच, पण मतदानाच्या टक्केवारीवरून भाजपाची प्रतिष्ठा जाताजाता राहिली असे मात्र नक्की म्हणता येते. 

कसबा विधानसभा मतदारसंघ
२०१४ मधील एकूण मतदार- २ लाख ७५ हजार ८१
२०१४ मध्ये झालेले मतदान-१ लाख ६३ हजार १७८
मतदानाची एकूण टक्केवारी- ५९.३१ टक्के
---------------
सन २०१९ मधील एकूण मतदार- २ लाख ८९ हजार २५
२०१९ मध्ये झालेले एकूण मतदान- १ लाख ६१ हजार ४९७
मतदानाची एकूण टक्केवारी- ५५.८८ टक्के

Web Title: Reputation in the Kasba constituency is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.