२८ तोळे सोने पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आजीच्या नातेवाईकांचा सोशल मीडियाने घेतला शोध  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:30 PM2019-05-06T13:30:32+5:302019-05-06T13:35:19+5:30

अडचणीत असलेल्यांना पोलिसांची तत्परतेने मदत मिळाल्याचा अनुभव शुक्रवारी नुकताच आला.

relatives searched by social media of grandmother who took 28 tole gold in bag | २८ तोळे सोने पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आजीच्या नातेवाईकांचा सोशल मीडियाने घेतला शोध  

२८ तोळे सोने पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आजीच्या नातेवाईकांचा सोशल मीडियाने घेतला शोध  

ठळक मुद्देसिंहगड रस्ता पोलिसांची कार्यतत्परता ; आजीने मानले पोलिसांचे आभार 

नहे : अडचणीत असलेल्यांना पोलिसांची तत्परतेने मदत मिळाल्याचा अनुभव शुक्रवारी नुकताच आला. वयोमानामुळे विसरभोळा झालेला स्वभाव तसेच अंधारामुळे रस्ता चुकून नऱ्हे येथे आलेल्या आजीला सिंहगड रस्ता पोलिसांनी आस्थेने चौकशी करून अवघ्या दोन तासात नातेवाईकांचा शोध घेऊन पिशवीत असलेल्या अठ्ठावीस तोळे सोन्यासह आजीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 
सीताबाई बाबुराव बिनीवाले या ७५ वर्षाच्या आजीला घर सापडत नसल्याने एका अनोळखी इसमाने रात्री आठच्या सुमारास आजीला नऱ्हे पोलीस चौकीत आणून सोडले. मी शेजारच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. मात्र, आता मला नऱ्हे मधील घर सापडत नाही, मला घरी सोडा अशी विनवणी आजी पोलिसांना करू लागली. सहायक पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना आजीच्या नातेवाईकांना शोधण्याच्या सूचना दिल्या. 
पोलीस कॉन्स्टेबल गोरख चिनके यांनी आजीकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ असणाऱ्या पिशवीमध्ये अठ्ठावीस तोळे सोने असल्याचे लक्षात आले. यापूर्वी कसबा पेठेतील भोई आळीमध्ये राहावयास असल्याचे आजीने माहिती दिली.मात्र, मध्येच आजी आपण काय बोलतो हे विसरत असल्याने पोलिसांना चौकशी करताना अडचण येत होती. सध्या नऱ्हे मध्ये राहत असून मला घरचा पत्ता माहित नसल्याचे आजीने सांगितले, आजीने मला तीन मुली असून मुलगा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी नातवांची नावे विचारली असता आजीने केतन भानारकर असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सदर नातवाचे नाव फेसबुकवर शोधून नातवाचा फोटो आजीला दाखविला असता तोच माझा नातू असल्याचे आजीने सांगितल्यावर पोलीस कॉन्स्टेबल चिनके यांनी कसबा पेठ येथील आपल्या मित्रांना संपर्क साधून सदर आजीबद्दल माहिती देऊन तिच्या नातेवाईक मिळतात का याबाबत विचारपूस केली. त्यानंतर आजीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिचा नातू केतन राजू भानारकर (वय २८, गोपीनाथ नगर , कोथरूड)  यांच्या ताब्यात आजीला देण्यात आले. नातेवाईकांनी व आजीने पोलिसांचे आभार मानले.   

Web Title: relatives searched by social media of grandmother who took 28 tole gold in bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.