धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले, ग्रामस्थ दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:30 AM2018-03-12T06:30:19+5:302018-03-12T06:30:19+5:30

भूस्खलन व दरडी कोसळण्यामुळे धोकादायक झालेल्या आंबेगाव तालुक्यातील ५ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडला आहे. सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करा, आमचे माळीण होऊ देऊ नका, या मागणीसाठी ग्रामस्थांचे हेलपाटे सुरू असले, तरी प्रशासनाकडून हालचालींना वेग येत नसल्याने यंदाचा पावसाळाही या गावांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे.

 Rehabilitation of dangerous villages can be traced, villagers under threat | धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले, ग्रामस्थ दहशतीखाली

धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले, ग्रामस्थ दहशतीखाली

Next

डिंभे  - भूस्खलन व दरडी कोसळण्यामुळे धोकादायक झालेल्या आंबेगाव तालुक्यातील ५ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडला आहे. सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करा, आमचे माळीण होऊ देऊ नका, या मागणीसाठी ग्रामस्थांचे हेलपाटे सुरू असले, तरी प्रशासनाकडून हालचालींना वेग येत नसल्याने यंदाचा पावसाळाही या गावांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे. काही ठिकाणी जागेची अडचण तर जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे प्रशासनाचे दुर्लक्ष या स्थितीत पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे.
आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी व काळवाडी ही गावे धोकादायक झाली आहेत. येथे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्येही दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंढारवाडी येथे जमिनीला भेगा पडून दरडी कोसळल्या होत्या. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पाहणी करून या घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला होता.
काळवाडी या गावावर कोणत्याही क्षणी अवजड दगड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी साधा आवाज झाला, तरी भीतीपोटी आम्ही घराबाहेर धाव घेत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. पुनर्वसनासाठी ३० आॅगस्ट २०१७ रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीस या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन पुनर्वसनासाठीच्या दिशा निश्चित करण्यात आल्या होत्या. कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता सां.बा. विभाग, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता म. रा. वि. वि. मंडळ, तालुका आरोग्य अधिकारी, मंडल अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तलाठी, प्रकल्पाधिकारी एकात्मिक बालविकास व धोकादायक गावचे ग्रामसेवक व सरपंच यांना सविस्तर माहितीसह पाचारण करण्यात आले होते.
यावेळी पुनर्वसणासाठी येणाºया अडचणींवर चर्चा करण्यात आली. पसारवाडी व बेंढारवाडी येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध असल्याचे सांगितल्याने डिंभे धरणामुळे बाधित झालेली ३९ घरे व भूस्खलनामुळे संवेदनशील झालेल्या १६ घरांची मदत व पुनर्वसनाखाली पुनर्वसन करावे. पसारवाडी येथील २७ घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. भगतवाडी येथील १३ कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. असाणे येथील १०० ते १२५ घरे आहेत. काळवाडी येथील नं.१ मधील ३४ घरे व नं. २ मधील १७ घरांचे पुनर्वसन करावे लागणार, यावर चर्चा झाली होती.
नियोजनाची बैठक होऊन सहा महिने होत आले, तरी एकाही गावच्या पुनर्वसनाचे काम मार्गी लागले नाही. यामुळे अतिसंवेदनशील गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील दोन महिन्यांत काहीच काम मार्गी लागले नाही, तर या पावसाळाही गावकºयांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे.
धोकादायक परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढा, या मागणीसाठी गावकरी रोज हेलपाटे मारत आहेत; मात्र गावकºयांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या गावांचे तातडीने पुनर्वसन झाले नाही, तर आंबेगाव तालुक्यात दुसरे माळीण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पाच गावे अतिसंवेदनशील झाली असून, मानवीवस्तीसाठी धोकादायक झाली आहेत. पावसाळ्यात येथे जमिनीला भेगा पडून भूस्खलनामुळे कोणत्याही क्षणी घरे गाडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील पावसाळ्यात काळवाडी (ता. आंबेगाव) येथे दरडी कोसळल्याने परिस्थितीची माहिती देताना भयभीत झालेले ग्रामस्थ. या धोकादाय स्थितीतून आम्हाला बाहेर काढा, आमचे माळीण होऊ देऊ नका. एवढीच मागणी या पाचही गावच्या ग्रामस्थांची आहे.

Web Title:  Rehabilitation of dangerous villages can be traced, villagers under threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे