रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 02:06 AM2018-10-31T02:06:46+5:302018-10-31T02:07:52+5:30

राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे.

Rabi season going to be tough; Nine years of drought year | रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष

रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष

Next

पुणे : राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगलाच खडतर जाणार आहे. जलसंपदा विभागातर्फे इंदापूर, दौंड, बारामतीला शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून कालव्यातून सुमारे ८५ कि.मी.पर्यंत पाणी पोहोचले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती असून राज्य शासनानेही १० तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे जाहीर केले आहे. यंदा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात आॅगस्ट महिन्यापर्यंत संततधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली. परिणामी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी धरण १०० टक्के भरले. परंतु, जिल्ह्यातील काही तालुक्यात ४० ते ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.त्यामुळे जिल्ह्यातील भात पिकांसह,बाजरी, ज्वारी, सोयाबीन आदी पिके जळून गेली आहेत. त्यातच दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे तब्बल एक महिना कालव्यातून सोडण्यात आलेला विसर्ग बंद करावा लागला.दोन दिवसांपूर्वीच (रविवारी ) रब्बी हंगामासाठी विसर्ग सोडण्यात आला आहे. कालवा समितीच्या बैठकीत शेतीसाठी व पिण्यासाठी किती पाणी राखून ठेवावे.तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी केव्हा पाणी सोडले जावे याबाबतचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार यंदा १५ आॅक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, सुमारे १५ दिवस कालव्यातून शेतीसाठी विसर्ग सोडण्यास उशीर झाला. त्यातच सध्या खडकवासला धरण प्रकल्पात २०१५ नंतर सर्वात कमी पाणीसाठा आहे. २०१५ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी खडकवासला प्रकल्पात १५ आॅक्टोबर रोजी केवळ १६.१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा १५ आॅक्टोबर रोजी प्रकल्पात २५.३८ टीएमसी एवढा साठा शिल्लक होता.२०१०पासून २०१८ पर्यंतचा खडकवासला प्रकल्पातील हा सर्वात कमी साठा आहे. २०१० ते २०१४ पर्यंत १५ आॅक्टोबर रोजी २६ ते २८ टीएमसी पर्यंत धरणसाठा उपलब्ध होता.

मागील वर्षी रब्बीसाठी 35 दिवस पाणी
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खडकवासला धरण प्रकल्पातून रब्बी तब्बल 35 दिवस पाणी सोडण्यात आले होते.तरीही धरणात मुबलक पाणी शिल्ल्क होते.जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील वर्षी 24 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने २४ मार्च २०१८ ते १७ जून २०१८ पर्यंत कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता. एकाही दिवसाचा खंड न ठेवता सुमारे तीन महिने कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता.परंतु,यंदा पाऊस कमी झाल्याने शेती व पिण्यासाठी काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. खडकवासल्यापासून सोडलेले पाणी २०२ कि.मी. चा प्रवास करून इंदापूरपर्यंत पोहचते. त्यामुळे पाणी पोहचण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.

Web Title: Rabi season going to be tough; Nine years of drought year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.