लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:09 AM2018-12-26T02:09:17+5:302018-12-26T02:09:29+5:30

कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली.

Public Works Youth Camp: Public Works Movement for Rural Development | लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ

लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ

Next

पुणे : कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली. ग्रामविकासाला हातभार लावणारी सामाजिक कार्यकर्त्यांची भावी पिढी घडावी, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसाधना आणि टीम तरुणाईतर्फे २५ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान लोकनिर्माण युवा शिबिराचा उपक्रम चिखलगावमध्य ेहाती घेण्यात आला आहे. यामध्ये देशभरातील ३००, तर पुणे जिल्ह्यातील सुमारे १५ तरुण-तरुणींचा समावेश आहे.
चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमध्ये कौशल्याधारित शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगीण विकास या क्षेत्रांमध्ये लोकसाधना कार्यरत आहे. तरुणाईच्या ऊर्जेतूनच लोकनिर्माण, ग्रामकल्याण आणि राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी लोकनिर्माण युवा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देशाच्या कोणत्याही भूभागात गेलो तरी तेथील परिस्थितीशी जुळवून घेता यावे, सक्षम होता यावे, यादृष्टीने या वेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिरादरम्यान दांडेकर दाम्पत्यासह डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी, भगीरथचे डॉ. प्रसाद देवधर, विज्ञानाश्रमचे डॉ. योगेश कुलकर्णी, कोकणातील माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, अविनाश धर्माधिकारी आणि पूर्णा धर्माधिकारी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन तरुणांना मिळणार आहे. यामध्ये कोकणातील कौशल्य विकासाची चळवळ, निसर्गभान, श्रमदान, गटचर्चा, पक्षिनिरीक्षण, रात्रभ्रमंती आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या या शिबिरामध्ये तरुणांची ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडली जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण पर्यटन व पर्यावरण, ग्राम विकासाची चळवळ व लोकसहभाग, खेड्यांचा आर्थिक विकास, स्मार्ट खेडी व स्मार्ट शहरे, कौशल्यविकासातून खेड्यांचा विकास अशा विषयांबाबत विचारमंथन होणार आहे.

१ आॅगस्ट १९१९ ते १ आॅगस्ट २०२० या कालावधीमध्ये हे लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. गेली ४० वर्षे चिखलगावात काम करीत असताना ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून नवीन विचार पुढे आणावा, अशी कल्पना होती. त्यातूनच लोकनिर्माण युवा शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आली. समाजामध्ये नव्याने लोकनिर्माणाची गरज भासत असते. सामाजिक कार्याला बळकटी द्यायची असेल तर मनुष्यबळ आवश्यक असते. खेडी स्वयंपूर्ण झाल्यास देशाचा विकास होऊ शकेल आणि त्यासाठी तरुणांचा ग्रामविकासामधील सहभाग आवश्यक आहे. सहा लाख खेड्यांमध्ये युवकांनी परतण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण विकासाचे सूत्र घेऊन लोकनिर्माण युवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
- डॉ. राजा दांडेकर, संस्थापक, लोकसाधना

Web Title: Public Works Youth Camp: Public Works Movement for Rural Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे