पेटा विरोधात बैलगाडा मालकांचा एल्गार; पुणे-नाशिक मार्गावर चक्का जाम, चाकणला तळेगाव चौकात तीन तास वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 01:44 PM2017-10-28T13:44:13+5:302017-10-28T18:54:08+5:30

पेटा ( प्राणीमित्र) संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी, जयसिंह यांना प्राणी बोर्डातून काढण्यात यावे,  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायमची उठविण्यात यावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत बैलगाड्यासह शनिवारी चाकण येथील तळेगाव चौकात आंदोलन केले.

protest for bullock cart racing ban pune nashik highway | पेटा विरोधात बैलगाडा मालकांचा एल्गार; पुणे-नाशिक मार्गावर चक्का जाम, चाकणला तळेगाव चौकात तीन तास वाहतूक कोंडी

पेटा विरोधात बैलगाडा मालकांचा एल्गार; पुणे-नाशिक मार्गावर चक्का जाम, चाकणला तळेगाव चौकात तीन तास वाहतूक कोंडी

Next

चाकण - पेटा ( प्राणीमित्र) संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी, जयसिंह यांना प्राणी बोर्डातून काढण्यात यावे,  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायमची उठविण्यात यावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत बैलगाड्यासह शनिवारी चाकण येथील तळेगाव चौकात आंदोलन केले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत शासनाविरोधात घोषणा दिल्या. रस्त्यावर बैलगाडे आडवे लाऊन रस्ता रोखल्याने जवळपास तीन तास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली  होती. 

चाकण येथील तळेगाव चौकात खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खेडचे आमदार सुरेश गोरे, मावळचे आमदार संजय भेगडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार दिलीप मोहिते, दिगंबर भेगडे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, माजी सदस्य किरण मांजरे, बाजार समितीचे सभापती नवनाथ होते, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, चाकणच्या नगराध्यक्ष मंगल गोरे, नगरसेवक किशोर शेवकरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा संघटिका विजया शिंदे बैलगाडा विमा कंपनीचे अध्यक्ष सुदाम मोरे आदींसह गाडा मालक, बैलगाडा शौकीन तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

आंदोलनाच्या सुरूवातीला चाकण येथील बाजार समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष मंगल गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर  संपूर्ण चाकण शहरातून  बैलगाडा मालकानी वाद्यवृंदच्या गजरात गुलाल भंडाराची  प्रचंड उधळण करत पेटा संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  त्यांनतर आपल्या लाडक्या बैलांची जंगी मिरवणूक काढत येथील तळेगाव चौकात सर्व एकत्र आले.  गाडा मालकांनी पुणे नाशिक व मुंबई नगर रस्त्यावर चहुबाजूंनी दोरखंडाने बैल बांधून रास्ता रोखुन धरला. यावेळी संतापलेल्या बैलगाडा मालकानी पेटा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे चाकण शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. रस्त्याच्या चुहुबाजूने वाहतुकीची मोठी कोंडी होऊन तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

खासदार आढळराव पाटील या वेळी म्हणाले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शेतक-यांचा मर्दानी खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी लोकसभेत कायदा होणे  गरजेचे आहे. शेतक-यांचा आनंद हिरावून घेणा-या सरकारला जाग आणण्यासाठी यापुढे मोठे आंदोलन करू. शर्यतीवरील बंदी उठुवून या पूर्वी गाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
 खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची गरज आहे. या आंदोलनात गाडा मालकांचा सहभाग असायला हवा. आमदार गोरे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, बैलगाडा सुरू करण्याच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
 यावेळी महेश लांडगे, आशा बुचके, शरद सोनवणे, बांधकाम सभापती सुदाम शेवकरी, उद्योगपती दिलीप जाधव, राजेश जवळकर आदींनी पेटा संघटना व जय सिंह यांच्यावर टीका केली.   बैलगाडा शर्यती कायमस्वरूपी सुरू झाल्या पाहिज यावर निर्णयावर ठाम असलेल्या गाडा मालकांनी बैल गाड्या  आडव्या लावून रस्त्यावर ठाण मांडले होते. 
 

आंदोलकांनी केली एसटीवर दगडफेक
चाकण येथे बैल गाडा सुरू होण्यासाठी आंदोलन सुरू झाले. त्यावेळी काही आंदोलक तळेगाव चौकातून आंबेठाण चौकाकडे येत असताना येथील वघेवस्ती जवळ अनेक वाहने उभी होती. त्यावेळेस काही आंदोलकांनी एसटी चालकास मारहाण करून एसटीच्या समोरच्या काचा फोडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

 रुग्णवाहिकेला  दिली वाट
भर उन्हाच्या तडाख्यात येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत एक रूग्णवाहीकाही अडकली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तातडीने वाहनांच्या गर्दीत अडकलेल्या या  रुग्णवाहिकेला रास्ता मोकळा करून दिला.

 नगर परिषद कडून पाणी वाटप
खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरपरीषदच्या नगराध्यक्ष मंगल गोरे, उप नगराध्यक्ष राजेंद्र गोरे, गटनेते किशोर शेवकरी यांनी  आंदोलकांना मोफत पिण्याचे पाणी वाटप केले. तसेच बैलगाडा मालकांनी आणलेल्या बैलांसाठी   तीन टँकर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

 खासदार,आमदारांवर गुन्हा दाखल
आंदोलनानंतर पोलीसांनी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, शरद सोनवणे, प्रकाश वाडेकर, गणेश कवडे, भरत ठाकूर, रामकृष्ण टाकळकर यांना अटक केली. त्यांना चाकण पोलीस ठाण्यात नेत भा.द.वि.कलम १४३,३४१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यानंगर आंदोलकांना सोडून देण्यात आले.  

चाकण चौकात रास्ता रोको करून तीन तास चौकातील वाहतूक  रोखल्यामुळे चौफेर वाहतूक कोंडी चांगलीच झाली होती. त्यामुळे प्रवाशी चांगलेच हैराण झाले होते.

Web Title: protest for bullock cart racing ban pune nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.