बंद हृदयात डॉक्टरने फुंकले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 01:50 AM2018-12-21T01:50:44+5:302018-12-21T01:51:12+5:30

विमानात प्रवाशाला हृदयविकाराचा झटका : ससूनमधील डॉक्टरांच्या ‘जीवन संजीवनी’ने पुनर्जन्म

Pran survived the heart of the doctor | बंद हृदयात डॉक्टरने फुंकले प्राण

बंद हृदयात डॉक्टरने फुंकले प्राण

Next

पुणे : हृदयविकाराचा झटका येऊन हृदय बंद पडल्याने मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या एका विमान प्रवाशाला ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्परतेने पुनर्जन्म मिळाला आहे. जीवन संजीवनी अर्थात कार्डिओपल्मनरी रेस्युसीटेशनद्वारे (सीपीआर) डॉक्टरांनी या प्रवाशाचे प्राण वाचविले. केवळ १ ते २ मिनिटांच्या या जीवघेण्या प्रसंगाने अन्य प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

नागपूर ते पुणे यादरम्यानच्या विमानप्रवासातील ही घटना आहे. कोल्हापूर येथील अशोक जाधव (वय ५८) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तर ससून रुग्णालयातील बालरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय राजपूत हे त्यांच्यासाठी देवदूत ठरले. नागपूर विमानतळावरून या विमानाने दि. १७ डिसेंबरला रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले. त्यानंतर १५ ते २० मिनिटांतच वैमानिकाने ‘एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानात कोणी डॉक्टर आहे का?’ अशी उद्घोषणा केली. डॉ. राजपूत यांनी तातडीने प्रतिसाद दिला. त्यांच्या मागील बाजूस चौथ्या रांगेत बसलेल्या जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या शेजारी बसलेल्या नातेवाइकांनी एअर होस्टेसच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानंतर काही सेकंदांत उद्घोषणा झाल्याने डॉ. राजपूत हे तातडीने जाधव यांच्याजवळ गेले.
जाधव यांचे हृदय बंद पडले होते. हे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना तातडीने विमानातील मागील बाजूच्या रिकाम्या जागेत नेऊन ‘सीपीआर’ देण्यास सुरुवात केली. हा प्राथमिक उपाय तीन ते चार मिनिटे सुरू होता. दरम्यानच्या काळात विमानात उपलब्ध असलेल्या ‘डिफिब्रिलेटर’द्वारे एक शॉक दिला. हृदयक्रिया सुरू करण्यासाठी हा शॉक दिला जातो. तसेच दोन वेळा तोंडावाटे श्वास देण्यात आला. त्यामुळे जाधव यांचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू झाले. त्यांना तातडीने आॅक्सिजन लावण्यात आले. त्यानंतर काही वेळातच जाधव इतर प्रवाशांशी बोलूही लागले. काही मिनिटांपूर्वी मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या जाधव यांना बोलताना पाहून डॉ. राजपूत यांच्यासह इतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर राजपूत हे लोहगाव विमानतळावर विमान उतरेपर्यंत जाधव यांच्याशेजारी बसून होते. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास विमान पोहोचल्यानंतर जाधव यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांच्या जीवावरील धोका टळला होता.

प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविली
डॉ. उदय राजपूत हे रुग्णालयातील सीपीआर केंद्राचे संचालकही आहेत. मागील आठ वर्षांपासून ते ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देतात.
बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्यात आली
आहे. संस्था, कंपन्या, विविध कार्यालयांमधील गटाने आलेल्या कर्मचाऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.

Web Title: Pran survived the heart of the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.