इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण व्हावी सकारात्मक दृष्टी : भूषण गोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 08:14 PM2019-12-27T20:14:07+5:302019-12-27T20:19:33+5:30

ऐक्याला बळ देणारे ‘भारतीयत्व’ हेच आपले वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे..

Positive vision to be created through the study of history : Bhushan Gokhale | इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण व्हावी सकारात्मक दृष्टी : भूषण गोखले

इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण व्हावी सकारात्मक दृष्टी : भूषण गोखले

Next
ठळक मुद्देगुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने चर्चासत्र काश्मीर हे केवळ नंदनवन नाही तर, ती ज्ञानभूमी, वीरभूमी आणि तपस्याभूमी

पुणे : सगळे जण भारतात आनंदाने नांदू शकतात, हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आज आपण वेगवेगळ्या कारणाने आपापसांत भांडत आहोत. ते पाहता इतिहासाच्या अभ्यासातून सकारात्मक दृष्टी नांदली पाहिजे. ऐक्याला बळ देणारे ‘भारतीयत्व’ हेच आपले वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. येशू ख्रिस्त आणि काश्मीर या विषयाच्या पार्श्वभूमीवर वादविवादाच्या पलीकडे जाऊन त्या काळातली सांस्कृतिक मिसळण लक्षात घेतली पाहिजे, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने ‘जम्मू काश्मीर आणि येशू ख्रिस्ताचे अज्ञात चरित्र’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. स्वामी कृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सरहद संस्थेचे संजय नहार, लेखक संजय सोनवणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. अनिल दहीवाडकर, डॉ. भालचंद्र कापरेकर, अमृता देसर्डा, प्रवीण श्रीसुंदर आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत उपस्थित होते.
सोनवणी म्हणाले, मेलटिंग पॉईंट ऑफ युनिव्हर्सल कल्चर हे वैशिष्ट्य असलेल्या काश्मीरमध्ये येशू ख्रिस्त आले असल्याचा उल्लेख आहे. निकोलस नोटोविच यांनी मांडलेल्या तथ्याचा वीरचंद गांधी यांनी केलेला अनुवाद खरा ठरल्यास खरे बायबल सर्वांसमोर येईल. मात्र, याचा वस्तुनिष्ठपणे अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.
नहार म्हणाले, येशू ख्रिस्त काश्मीरमध्ये आले असल्याचा सिध्दांत खरा ठरल्यास जगाला आपण शांततेचा संदेश दिला, याला पुष्टी मिळेल. भारताचा इतिहास गरजेपुरता मांडला जातो, हाही ठपका मोडून काढता येईल.
येशू ख्रिस्त वयाच्या १३ ते २९ वर्षांत कुठे होते, याबद्दल इतिहास मौन बाळगून आहे. बौद्ध धर्माची शिकवण आणि येशू ख्रिस्ताने केलेला उपदेश यात साम्य असल्याचे श्रीसुंदर यांनी सांगितले. बायबलमधील येशू चरित्राचा बारकाईने अभ्यास केल्यास ते काश्मीरमध्ये आले असल्याचे सिद्ध होत नाही; पण अलीकडे मांडण्यात येत असलेले संशोधनपूर्वक मतांचा विचार करायला हवा, असे डॉ. अनिल दहीवाडकर यांनी सांगितले.
कामत म्हणाले, काश्मीर हे केवळ नंदनवन नाही तर, ती ज्ञानभूमी, वीरभूमी आणि तपस्याभूमी आहे. ज्यांना जगासाठी काही करायचे आहे, अशा भगवान महावीर, गौतम बुद्ध, राम-कृष्ण यांच्यासह येशू ख्रिस्तापर्यंत सगळ्यांना काश्मीरमध्ये जावं वाटलं कारण तशी अनुकूलता तिथं होती. ही अनुकूलता जगाला समजावून सांगितल्यास भारताचा आणि जगाचाही काश्मीरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
डॉ. करमळकर यांनी याबाबत अभ्यासाची गरज व्यक्त केली. अमृता देसर्डा यांनी वीरचंद गांधी यांच्या ‘द अननोन लाईफ आॅफ जिझस ख्राइस्ट’ या पुस्तकातील तर दीपक करंदीकर यांनी 'कृसावर चढण्यापूर्वी' आणि 'पुनरुत्थानंतर येशू ख्रिस्ताचे अज्ञात जीवन' या पुस्तकातील आशय विवेचन केले. डॉ. कापरेकर यांनी येशू यांच्या ज्ञात चरित्रावर प्रकाश टाकला. शुभदा वर्तक यांनी आभार मानले.

Web Title: Positive vision to be created through the study of history : Bhushan Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.