पीएमटी फायद्यात, पीएमपीलाच काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:07 AM2019-01-09T01:07:21+5:302019-01-09T01:07:40+5:30

तोट्याचे गौडबंगाल काय : विसर्जित करण्याची मागणी

PMT benefits, what happened to PMP? | पीएमटी फायद्यात, पीएमपीलाच काय झाले?

पीएमटी फायद्यात, पीएमपीलाच काय झाले?

Next

पुणे : फक्त पुणे महापालिकेची सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणून प्रसिद्ध असलेली पीएमटी कधीही तोट्यात नव्हती, मग आता सुरू असलेल्या पीएमपीचा तोटा दरवर्षी वाढतच कसा चालला आहे? याचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल पुणेकर नागरिकांकडून विचारला जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी तर यासंबंधी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पीएमपी बंद करून पुन्हा पीएमटी सुरू करा, अशी मागणीच केली आहे. दरवर्षी त्यांना द्यावे लागणारे ३०० कोटी रुपये तरी वाचतील व ते विकासकामांमध्ये वापरता येतील, असे बागूल यांनी म्हटले आहे.

पीएमपीचा तोटा आता संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. महापालिकेची पीएमटी फायद्यात होती. त्यांना बोनसशिवाय महापालिकेला कधीही पैसे द्यावे लागले नाहीत. सेवाही कार्यक्षम होती. नागरिक अजूनही पीएमटी असेच म्हणत असतात. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेची अशीच प्रवासीसेवा, दोन्ही शहरांचा वाढता विस्तार, वाढती प्रवासीसंख्या याचा विचार करून पीएमटी व पीसीएमटी (पिंपरी-चिंचवड महापालिका) यांचे एकत्रिकरण करून पीएमपी ही कंपनी स्थापन केली. असे करताना फायदा अपेक्षित धरला नव्हता, मात्र तोटा होणार नाही, कार्यक्षम सेवा मिळेल, असे गृहित धरले होते.

या कंपनीच्या स्थापनेपासून दोन्ही महापालिकांना दरवर्षी कोट्यवधी रुपये तूट भरून काढण्यासाठी म्हणून द्यावे लागत आहेत. तरीही या कंपनीचा तोटा कमी व्हायला तयार नाही. त्यामुळेच हा तोटा संशयास्पद झाला आहे. त्याबाबत पीएमपी व्यवस्थापन स्पष्टीकरण देत नाही.

पुणेकरही या सेवेने त्रस्त झाले आहेत. गाड्या रस्त्यातच बिघडतात, वेळेवर येत नाहीत, स्वच्छ नसतात अशा अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे कंपनी विसर्जित करावी, पीएमटी ही पुणे महापालिकेमार्फत चालवली जाणारी सेवा परत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
बागूल यांनी तसेच पत्र आयुक्तांना पाठवले आहे. असे करायचे नसेल तर एक स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करून त्याचे संपूर्ण नियंत्रण या सेवेवर राहील, याची व्यवस्था करावी, तसा ठराव दिल्याचे बागूल म्हणाले.

Web Title: PMT benefits, what happened to PMP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे