वारजे- गुरुवारी सकाळी वारज्यात पीएमपी बस वर्दळीच्या मुख्य चौकातच ब्रेक निकामी झाल्याने धडकली. सुदैवाने  उतार असूनही वेग कमी असल्याने व बसच्या समोर मोठ आयशर टेम्पो असल्याने अपघातात जीवित हानी झाली नाही फक्त चालकाच्या पायाला थोडा मुका मार लागला. पण या अपघाताने सकाळच्या सत्रात सुमारे तासा भर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.   

याबत स्थानिक नागरीक व वाहतूक पोलीस उपनिरीक्षक धनवे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पावणे दहाच्यासुमारास चौकात धडकल्याचा आवाज झाला. बस चालक गणेश भागवत व वाहक सिलोम भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी ते वाघोली (वज्र  सेवा) असा या बसचा मार्ग आहे. सकाळी बसने वाघोलीचे एक फेरी पूर्ण केली होती. आता ती दुसर्‍या फेरीला निघालीच होती. तेवढ्यात वारजे माळवाडी कडून कर्वेनगरकडे येत असताना वारजे उड्डाण पूलाच्या अलीकडेच वाहनांची गर्दी जास्त झाल्याने वाहने हळूहळू सरकत होती. 

बस अतिशय हळूच चालत असल्याने अचानक ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने हँड ब्रेक ओढून पहिला पण तोवर बस समोरच्या टेम्पोला धडकली. यात सूदैवाने बसच्या समोर दुचाकी नसल्याने मोठा अपघात टळला. यात चालकाला थोडा मुका मार लागला आहे. 

अपघातांनंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी क्रेन बोलवून बस बाजूला घेतली. पण बस दोन्ही ब्रेक जाम झाल्याने आधी दुरूस्ती पथक बोलावून ब्रेक फ्री करण्यात आले. यानंतर पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सोडून कोंडीवर यश मिळवले.