नारळाच्या कवटीपासून पिकवा पालेभाज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:39 AM2018-12-09T02:39:40+5:302018-12-09T02:39:59+5:30

हायड्रोपोनिक्सच्या तंत्राने कमी जागेत पिकवा पालेभाज्या; रुद्ररुप मित्र यांचा अभिनव प्रयोग

Pikawa leafy vegetables from coconut shell | नारळाच्या कवटीपासून पिकवा पालेभाज्या

नारळाच्या कवटीपासून पिकवा पालेभाज्या

Next

पुणे : सध्या रासायनिक खतांचा मारा करून कमी कालावधीत भरघोस वाढ झालेल्या पालेभाज्या खाल्ल्या जात आहेत. मात्र पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या रुद्ररुप मित्रा यांनी घरातच नारळाच्या कवटीच्या पावडरपासून पिकांची घरगुती शेती सुरू केली आहे. ‘जे आवडतं ते पेरायचं आणि तेच खायचं,’ या उक्तीप्रमाणे त्यांनी या अभिनव प्रयोगाला व्यापक रुप देण्याचे ठरवले आहे.

हायड्रोपोनिक्स या तंत्राचा त्यांनी उपयोग केला आहे. जमिनीशिवाय केवळ पाण्याच्या मदतीने वनस्पती वाढविण्याची कला म्हणजे हायड्रोपोनिक्स होय. या तंत्राविषयी रुद्ररुप म्हणाले, ‘‘हायड्रोपोनिक्स नावाची कला बॅबिलॉन संस्कृ तीमध्ये दिसते. त्यावेळच्या लोकांनी तिचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला. आता पुन्हा नव्याने हे शास्त्र उपयोगात आणायचे, कारण म्हणजे आपल्याला पूर्णपणे नैसर्गिकदृष्ट्या पिकविलेल्या पालेभाज्या किंवा फळभाज्या मिळत नाहीत. त्या हव्या असल्यास जादा किंंमत देऊन घ्याव्या लागतात. दुसरे म्हणजे त्याकरिता खूप शोधाशोध करावी लागते.’’

मध्यंतरीच्या काळात गच्चीवर, परसबागेत शेती पिकविण्यास प्राधान्यक्रम दिला जात होता. मुळात आता आपल्याकडे जागेची कमरतता आहे. परंतु, घरातील खिडकीजवळ किंवा ज्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात प्रकाश येतो अशा जागी असलेल्या कपाटाला प्लॅस्टिक अथवा काचेची बाटली अडकवून त्यात केवळ पाण्याच्या साह्याने आवडीच्या भाजीचे पीक घेता येईल. ही कल्पना सुचली आणि प्रयत्नाने ती प्रत्यक्षात आणली गेली. पुण्यात खूप शोधाशोध केल्यानंतरदेखील हायड्रोपोनिक्स या तंत्राविषयी काहीच माहिती उपलब्ध नसल्याने बेंगलोरमध्ये त्याविषयी कार्यशाळा होत असल्याची माहिती मित्रा यांना मिळाली. मात्र ती कार्यशाळा त्यांना पूर्ण करता आली नाही. या विषयाची लहानपणापासूनच आवड असल्याने त्यांनी स्वअध्ययनातून माहिती मिळवली. ते स्वत: हायड्रोपोनिक्ससंबंधी कार्यशाळा घेतात. आतापर्यंत दोन कार्यशाळा झाल्या असून पहिल्या कार्यशाळेकरिता १२, तर दुसºया कार्यशाळेत २५ जण सहभागी झाल्याचे ते आवर्जून सांगतात.

माती नव्हे, पाण्याच्या मदतीने घेतले पीक...
पिकांना आवश्यक असलेली पोषणद्रव्ये त्यांना योग्य त्या प्रमाणात मिळाल्यास त्यांची जोमदार वाढ होते. ती पोषणद्रव्ये मित्रा यांनी मातीच्या नव्हे, तर पाण्याच्या माध्यमातून दिली. हायड्रोपोनिक्स तंत्रात २ प्रकारच्या पोषणद्रव्यांचा वापर होतो.
मायक्रोन्यूट्रियंट्स (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिएम) मॅक्रोन्यूट्रियंट (बोरॉन, कॅल्शियम, क्लोरिन) या दोन्ही प्रकारांमध्ये मूलद्रव्य घटकांचा समावेश होतो. ही घटकद्रव्ये बाजारात एक त्रित स्वरुपात उपलब्ध आहेत. ती पाण्यात विरघळतात. आपल्या हव्या त्या पिकाकरिता मातीऐवजी नारळाच्या कवटीच्या भुकटीचा उपयोग केला जातो. पिकाच्या मुळांना पाण्यातून सर्व प्रकारची पोषणद्रव्ये दिली जातात.
मित्रा यांनी परसबागेत मिरची, पालक, टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्याकरिता त्यांनी घरातील वापरात नसलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा उपयोग केला. त्या अर्धवट कापून त्यात नारळाच्या कवटीच्या पावडरचा उपयोग करून पाण्याच्या आधारावर भाजी पिकवली.

Web Title: Pikawa leafy vegetables from coconut shell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.