पालखी मुक्कामाची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 12:32 AM2018-07-09T00:32:28+5:302018-07-09T00:33:01+5:30

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पायी चालत निघाले आहेत. या दोन्हीही पालख्या शनिवारी पुणे मुक्कामी आल्या.

 Piggy preparation | पालखी मुक्कामाची जोरदार तयारी

पालखी मुक्कामाची जोरदार तयारी

Next

पुणे - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पायी चालत निघाले आहेत. या दोन्हीही पालख्या शनिवारी पुणे मुक्कामी आल्या. सोमवारी या पालख्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन्हीही पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यामध्ये जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. गावोगावचे भाविक, ग्रामस्थ यांच्यासह प्रशासनही पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

यवतला संत तुकाराम महारांची पालखी

यवत : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी यवत नगरी सज्ज झाली असून वारीतील वैष्णवांच्या मेळ्यासाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण केली आहे.
लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करेल.दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम यवत येथे मंगळवार (दि.१०) रोजी पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे.यवत मध्ये मागील अनेक वर्षांपासून चांगल्या सोयी सुविधा मुक्कामासाठी वारक-यांना दिल्या जातात.
यवत ग्रामपंचायतीने यंदा देखील चांगली तयारी केली असून आठवडे बाजार मैदान, श्री काळभैरवनाथ मंदीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगण , दोरगेवाडी, मेहेर बिल्डिंग, स्टेशन रोड, पालखी मार्ग, शासकीय गोडाऊन, रस्ते, पालखी मार्ग, धान्य बाजार येथे स्वच्छता मोहीम राबवून बाजूचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक स्वच्छता गृहांची स्वच्छता करण्यात आली आहे. यवत परिसरातील सर्व विहिरींमध्ये टी. सी.एल.पावडर टाकून पाणी शुद्धीकरण करण्यात आले आहे.वारक-यांसाठी आंघोळीची व्यवस्था तसेच मोबाईल चार्जिंग व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने गावात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५०० फिरते शौचालय बसविण्या व्यवस्था केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी पालखी मार्गावरील ग्रामस्थांची वैयक्तिक शौचालये वारकरी भक्तांसाठी खुली करण्याचे आवाहन केले होते.यासाठी यवत ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देऊन २१६ कुटुंबांनी त्यांचे वैयक्तिक शौचालये वारकरी भक्तांसाठी खुली केली आहेत. शौचालयांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पांढरे झेंडे लावले जाणार आहेत.

यवत येथील पालखीतळ विकास कामांसाठी यंदा तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यातील सर्व कामे सुरू होण्यास विलंब लागला.
आता यातील फक्त सभागृहाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र ते काम देखील घिसाड घाईत केले जात असल्याने कामाच्या दर्जा कडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आता केवळ एक दिवस बाकी असताना काम उरकण्याची घाई केली जात असल्याचे चित्र आहे.


माऊलींच्या स्वागतासाठी सासवडनगरी सज्ज
सासवड : सासवड नगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह सोमवारी दोन दिवसांच्या सोमवार व मंगळवारी (दि. ९ व १०) मुक्कामासाठी दाखल होत आहे. या पार्श्वभुमीवर सासवड नगरी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पालखी मार्गावरील रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून पालखीच्या वास्तव्याकरता परंपरेनुसार अंकलीच्या शितोळे सरकारांचा तंबू उभारून सज्ज झाला आहे.
आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील तंबूत असणारा हा पहिला मुक्काम असून पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली तंबू उभारणीचे काम होते. तंबूमध्ये एल ई डी लाईटची व्यवस्था केलेली आहे. तसेच तंबूच्या खांबांना झळाळी देण्यात आल्याची माहिती शितोळे सरकारांचे प्रतिनिधी हेमंत निखळ यांनी दिली. सदरच्या तंबुच्या खांबाना पॉलीशचे काम सुहास, नरेंद्र व संदिप एकबोटे या कुंटुबीयांनी केले.
कर्नाटक - बेळगाव येथील अंकली च्या उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्यात सुमारे २०० वर्षांपासून पालखीच्या तंबूचा त्याच प्रमाणे माऊलींच्या अश्वाचा मान असून ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडून हा मान त्यांचाकडे आल्याचे निखळ
यांनी सांगितले.
आषाढ वारीत माऊलींसाठी रोजच्या पहाटेच्या नैवद्याचा मान देखील शितोळे सरकारांचा असून हा नैवद्य फक्त पुरणपोळीचाच असतो. तळावर उभारण्यात आलेल्या अष्टकोनी आकाराच्या तंबूची लांबी २८ फुट, रुंदी १८ फुट तर उंची १४ फुट असून तो पूर्णत: पाणी व अग्नी विरोधक आहे. तंबूमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. तंबू उभारणीसाठी नट बोल्ट वापरले नसून हा तंबू केवळ अर्धा तासात उभारता तसेच काढता येतो असेही निखळ यांनी सांगितले.

Web Title:  Piggy preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.