Pune: पीएचडी गाईड २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; प्राध्यापिकेला एसीबीने रंगेहात पकडले

By नारायण बडगुजर | Published: March 30, 2024 07:51 PM2024-03-30T19:51:47+5:302024-03-30T19:52:09+5:30

लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने शनिवारी (दि. ३०) सांगवी येथे ही कारवाई केली...

PhD guide caught taking bribe of 20 thousand; The professor was caught red-handed by the ACB | Pune: पीएचडी गाईड २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; प्राध्यापिकेला एसीबीने रंगेहात पकडले

Pune: पीएचडी गाईड २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; प्राध्यापिकेला एसीबीने रंगेहात पकडले

पिंपरी : पीएचडी डीग्रीसाठी प्रबंध सादर करणे आणि त्याला अप्रुव्हल देण्यासाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यातील २० हजार रुपये लाच स्वीकारताना पीएचडी मार्गदर्शक असलेल्या प्राध्यापिकेला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने शनिवारी (दि. ३०) सांगवी येथे ही कारवाई केली. 

डाॅ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९), असे ताब्यात घेतलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. डाॅ. माने ही सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची प्राध्यापक (वर्ग १) आहे. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शक आहे. याप्रकरणी ४० वर्षीय प्राध्यापकाने एसीबीकडे तक्रार केली. 

एसीबीचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय व्यक्ती प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये पीएचडी डीग्री प्राप्त करून घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे वीद्यापीठाकरीता ऑनलाइन प्रबंध तयार केलेला आहे. हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार प्राध्यापकांचे मार्गदर्शक (गाईड) म्हणून डाॅ. शकुंतला माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती झालेली आहे. तक्रारदार प्राध्यापकाने सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे व त्यावर अप्रुव्हल देणे यासाठी डाॅ. शकुंतला माने हिने तक्रारदार प्राध्यापकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. 

तक्रारदार प्राध्यापकाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने पडताळणी केली असता, डाॅ. माने हिने लाच मागितल्याचे समोर आले. लाचेच्या २५ हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये लाच स्वीकारल्यावर डाॅ. माने हिला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करीत आहेत.

Web Title: PhD guide caught taking bribe of 20 thousand; The professor was caught red-handed by the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.