आमचं आरोग्यसंपन्न, थंडगार, आनंददायी, वृक्षराजीने नटलेलं '' पुणं '' हरवलंय हो..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 01:27 PM2019-06-05T13:27:38+5:302019-06-05T13:35:12+5:30

अलिकडच्या दोन दशकांमध्ये पुण्याच्या या वैभवाला जबरदस्त ओहोटी लागली आहे.

Our healthiest, cool, pleasant, tree-planted nestled "Pune" is lost ..! | आमचं आरोग्यसंपन्न, थंडगार, आनंददायी, वृक्षराजीने नटलेलं '' पुणं '' हरवलंय हो..!

आमचं आरोग्यसंपन्न, थंडगार, आनंददायी, वृक्षराजीने नटलेलं '' पुणं '' हरवलंय हो..!

Next
ठळक मुद्देरम्य टेकड्यांचा गळा आवळला अतिक्रमणांनी : पारा गेला चाळिशीच्या पार बेसुमार बांधकामांवर कोणाचेच नियंत्रण नाही. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने प्रदूषणाच्या पातळीत देखील वाढज्या मुठा नदीत पुणेकरांच्या पिढ्या आनंदाने डुंबल्या तिची आज ‘गटारगंगा’

- श्रीकिशन काळे - 
पुणे : ब्रिटिश आमदानीत पुण्याला ‘हिल स्टेशन’चा दर्जा देण्यात आला होता. त्याचं महत्त्वाचं कारण होते, ते पुण्यातली भरगच्च हिरवाई आणि पुण्याला वेढणाऱ्या रम्य टेकड्यांनी निर्माण केलेला गारवा. अलिकडच्या दोन दशकांमध्ये पुण्याच्या या वैभवाला जबरदस्त ओहोटी लागली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने पुण्यात समृद्धी आणली. पण राजकर्त्यांकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव, भ्रष्टाचाराने माखलेले प्रशासन यामुळे पुण्याच्या रम्य हवामानाचा ऱ्हास सुरू झाला आहे. 


ज्या मुठा नदीत पुणेकरांच्या पिढ्या आनंदाने डुंबल्या तिची आज ‘गटारगंगा’ झाली आहे. भ्रष्ट राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे टेकड्यांचे लचके तोडले जात आहेत. बेसुमार बांधकामांवर कोणाचेच नियंत्रण नाही. परिणामी या पुण्यातला श्रीमंत माणूस असो किंवा गरीब या सर्वांचेच आरोग्य दूषित हवा, दूषित पाणी आणि ध्वनिप्रदूषणाने पोखरले जात आहे. पुण्याच्या पर्यावरणाचा हा ऱ्हास वेळीच थांबवला गेला नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी कधीकाळचे रम्य पुणे भीषण बनल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी शहरात तीन ते चार हजार बांधकाम प्रकल्प होत असल्याने हिरवाईऐवजी सिमेंटचे जंगल वाढत आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना ‘वायूप्रदूषण’ आहे. जगात सर्वत्र वायूप्रदूषण वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने प्रदूषणाची पातळीदेखील वाढतआहे. त्याचा परिणाम येथील पर्यावरणावर 
होत आहे. शहरात आजमितीस सुमारे ३६ लाख २७ हजारांहून अधिक वाहने दररोज कार्बन उत्सर्जन करतात. त्यामुळे येथील तापमानाचा पारा चाळीशीच्याही पुढे जात आहे. 

* ३३१.५६ चौरस किलोमीटर शहराचे क्षेत्रफळ 
* ४० लाखांहून अधिक लोकसंख्या 
* ३८, ६०, ०५५ वृक्षांची संख्या 


............
वृक्षांची संख्या फसवी  
शहराच्या क्षेत्रफळाचा विचार करताना ३३ लाख १५ हजार ६०० वृक्ष असणे बंधनकारक आहे. शहरातील वृक्षगणनेनुसार सध्या ३८ लाख ६० हजार ५५ वृक्ष आहेत. मात्र ही संख्या फसवी आहे. कारण वृक्षगणनेत झाडांचे वय, प्रकार आणि त्याचे मूळस्थान विचारात घेतले जात नाही. भाबुंर्डा (१००.७८१ हेक्टर), वारजे (१३०.८२ हेक्टर), पाचगाव पर्वती (२४७.६७ हेक्टर) आणि कोथरूड, धानोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. पाषाण येथे १२० एकर आणि सुतारवाडीला ६१ एकर वनक्षेत्र विकसित केले जात आहे. पुण्याला प्राणवायू पुरवणारे हे जणू ‘आॅक्सिजन सिलिंडर’च आहेत. यांची जपणूक आणि संवर्धन करण्याचे आव्हान पुण्याच्या राज्यकर्त्यांपुढे आहे.
उद्यानांमुळे हिरवाई 
शहरात पालिकेच्या उद्यान विभागाकडून १८९ उद्याने विकसित करण्यात आली आहेत. काही उद्याने विविध थीम्सवर आधारित आहेत. त्यामध्ये गुलाब उद्यान, आयुर्वेदिक उद्यान, नाला पार्क, पेशवे ऊर्जा उद्यान, साहसी उद्यान, सारसबाग, पु. ल. देशपांडे उद्यानांचा समावेश आहे. तसेच गावसंस्कृती दर्शविणारे ग्राम उद्यान, वर्तक बाग, सेव्हन वंडर, भविष्यात पाम पार्क, नक्षत्र उद्यान, अमृतवन उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. 
.............
जीआयएस, जीपीएसद्वारे वृक्षांची मोजणी 
शहरात जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉरर्मेशन सिस्टिम) व जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षगणना केली जात आहे. मार्च २०१८ पर्यंत ७० टक्के काम पूर्ण झालेले आहे. यामध्ये २६ लाख ७७ हजार ३७१ झाडांची, ४४८ झाडांच्या प्रजातींची, तसेच ८९ दुर्मिळ वृक्षांची मोजणी पूर्ण झाली आहे.

शहरात बांधकाम परवाना दिलेले प्रस्ताव 
२००८-०९ : ४४५३
२००९-१० : ४१७१
२०१०-११ : ४४२०
२०११-१२ : ४६२३
२०१२-१३ : ४०७३
२०१३-१४ : ४२८६
२०१४-१५ : ३८६६
२०१५-१६ : ४५११
२०१६-१७ : ३०९५
२०१७-१८ : ३८२६
.......
सध्या टेकड्यांवर अतिक्रमण वाढले आहे. कुठल्याही ठिकाणी मानवी वस्ती वाढली, की नैैसर्गिक संपत्तीवर घाला घालते. रस्ते झाल्याने वृक्षतोड केली जाते. लोकचळवळ मोठी हवी, तरच हे सर्व थांबेल. एका व्यक्तीला कोणी जुमानणार नाही. लोकांनी एकत्र आले पाहिजे, तरच टेकड्या जपल्या जातील. ताम्हिणी घाट चारपदरी करीत आहेत. त्याला परवानगी कशी मिळते.संवर्धन करणे खूप कठीण गोष्ट बनली आहे.- लोकेश बापट, पर्यावरणप्रेमी 
.............
वायूप्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याची माहिती नागरिकांना आहे. 
परंतु, अधिक जनजागृतीची गरज आहे. समाजाने चांगल्या हवेची मागणी करण्यासाठी दबाव गट तयार करणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा प्राधान्याने घेतला पाहिजे. - संस्कृती मेनन, सीईई
...........
वायूप्रदूषण ही जागतिक समस्या बनली आहे. खासगी वाहनांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, पार्किंग पॉलिसी आदींबाबत आम्ही जनजागृती करीत आहोत. सध्याचे सरकार या समस्येवर ठोस काम करेल, अशी आशा व्यक्त करू या. या सरकारने येत्या पाच वर्षांत ३५ टक्के प्रदूषण कमी करण्याचे ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. - सुजित पटवर्धन, परिसर 
............
331.56 ;चौरस किलोमीटर शहराचे क्षेत्रफळ 
४० लाखांहून अधिक लोकसंख्या 
38,60,055 वृक्षांची संख्या 

 

Web Title: Our healthiest, cool, pleasant, tree-planted nestled "Pune" is lost ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.