महापालिकेच्या कर्तबगारीवर ३० मार्चच्या रात्री चढला ‘कळस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:45 AM2019-04-02T02:45:57+5:302019-04-02T02:46:11+5:30

बिले अदा : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ठेकेदारांच्या शेकडो फाईल्स ‘क्लीअर’

On the night of March 30, the 'summit' of the municipal corporation | महापालिकेच्या कर्तबगारीवर ३० मार्चच्या रात्री चढला ‘कळस’

महापालिकेच्या कर्तबगारीवर ३० मार्चच्या रात्री चढला ‘कळस’

Next

पुणे : दुपार टळून सूर्य अस्ताला गेला... सायंकाळ संपून रात्र सुरू झाली... रात्रीनंतर उत्तररात्र आली... मात्र, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील आणि मुख्य इमारतीमधील अधिकारी आपल्या कर्तबगारीवर ‘कळस’ चढवित होते. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ठेकेदारांच्या शेकडो फाईल्स ‘क्लीअर’ करून त्यांना बिले अदा करण्याचा विक्रम पालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने केला आहे. ठेकेदारांनी कामे पूर्ण केली आहे किंवा नाही, याची खातरजमा न करताच बिले अदा झाल्याची चर्चा पालिकेमध्ये आहे. पालिकेमध्ये ३० मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत आणि काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पहाटे पाचपर्यंत अधिकारी घाम गाळत होते.

पालिकेच्या विविध विभागांमार्फत वर्षभर ठेकेदारांमार्फत कामे करून घेतली जातात. यासोबतच क्षेत्रीय कार्यालयाकडूनही ठेकेदारांमार्फत कामे केली जातात. अनेकदा ही कामे पूर्ण केल्यानंतरही ठेकेदारांच्या फाईल्स टेबलांवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय पुढे हलत नाहीत. यातूनच अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. मात्र, ३० मार्चच्या रात्री वेगळेच चित्र अनुभवायला मिळाले. एरवी पाच-साडेपाचच्या ठेक्याला घराकडे निघणारे अधिकारी व कर्मचारी पहाटेपर्यंत काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा ३१ मार्च रोजी रविवार आल्याने शनिवारी ३० मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत होते. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढून घेण्यासाठी लगबग सुरू होती. दिवसभर सुरू असलेली लगबग पहाटेपर्यंत सुरू होती.
पालिकेच्या लेखापरीक्षण विभागामध्ये एकाच दिवसात शेकडो फाईल्सचा गठ्ठा येऊन पडलेला होता. ठेकेदारांनी सादर केलेल्या फाईल्समधील कामे पूर्ण झाली आहेत किंवा नाही हे तपासण्याची यंत्रणा लेखापरीक्षण खात्याकडे नाही. विविध खात्यांच्या प्रमुखांनी चौकशी केल्यानंतर या फाईल्स लेखापरीक्षण विभागाकडे येणे अपेक्षित आहे.
मात्र, एकाच रात्रीत ‘जादूची कांडी’ फिरली आणि शहरातील जवळपास हजार-दीड हजार कामे एकाच दिवसात पूर्ण झाल्याचा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाला. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार ३० मार्चच्या रात्री घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. ठेकेदारांच्या फाईल्सची बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘टक्केवारी’ वाढविल्याचीही चर्चा पालिकेमध्ये होती.

प्रशासनाचा एका रात्रीसाठी वाढला टक्का
जी कामे सह यादीमधून आणि वॉर्ड स्तरीयमधून करण्यात आली आहेत त्यांची बिले यावर्षीच निघावीत, यासाठी ठेकेदार आणि काही ‘माननीयां’शी संबंधित ठेकेदार यांची पळापळ ३० मार्चच्या रात्री पाहायला मिळाली. पालिका भवनातील मुख्य कार्यालय आणि आणि क्षेत्रीय कार्यालये मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.

वास्तविक कामांची पाहणी करून बिले अदा करण्याची यंत्रणा पालिकेत आहे. यासंदर्भात कोणतीही शहानिशा न करता, केवळ टक्का वाढवून बिले सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे ही कामे झाली की नाही, याबाबत शहानिशा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एरवी सामाजिक संस्था आणि विधायक कामे केलेल्या संस्थांची बिले काढण्यामध्ये हेच अधिकारी नियमांवर बोट ठेवतात. त्यांच्याकडून टक्केवारी मिळणार नसल्याची कल्पना असल्याने त्रुटी काढून अशा फाईल्स प्रलंबित ठेवल्या जातात. त्रुटींचे शेरे मारून फाईल्स संबंधित खात्यांकडे परत पाठविण्यात काही अधिकाºयांनी ‘कळस’ चढविला आहे.

लेखापरीक्षण विभागाकडे ३० मार्च रोजी आलेल्या फाईल्सची संख्या जास्त होती. आम्ही रात्री साडेबारापर्यंत कार्यालयामध्ये बसून काम पूर्ण केले. त्यानंतर कार्यालयाला सील लावून गेलो. एकूण किती फाईल्स आल्या, तसेच कोणत्या विभागाच्या किती फाईल्स होत्या, एकूण किती रुपयांची बिले दिली गेली हे आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही.
- उल्का कळसकर,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी

Web Title: On the night of March 30, the 'summit' of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.