गणरायाला निरोप : शहरात २६ विसर्जन घाटांवर तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:30 AM2017-09-05T00:30:07+5:302017-09-05T00:30:27+5:30

गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील २६ विसर्जन घाटांवर पूर्ण तयारी झाली आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन दल सज्ज झाले आहे.

Message to Ganaraya: Preparations for 26 Visionary Ghats in the city | गणरायाला निरोप : शहरात २६ विसर्जन घाटांवर तयारी

गणरायाला निरोप : शहरात २६ विसर्जन घाटांवर तयारी

googlenewsNext

पिंपरी : गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील २६ विसर्जन घाटांवर पूर्ण तयारी झाली आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन दल सज्ज झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील विसर्जन मिरवणुकीची तयारीही पूर्ण झाली आहे. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़ पोलीस व सीसीटीव्हीची नजर विसर्जन सोहळ्यावर असणार आहे.
शहरात पिंपरी आणि चिंचवड असे दोन प्रमुख घाट असून शहरात दोन मिरवणुका महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर अन्यभागातही नियोजन केले जाते. मिरवणुकीसाठी वाहतुकींचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पिंपरीतील झुलेलाल घाट आणि चिंचवड थेरगाव पुलाजवळील घाटावरील तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर इंद्रायणी, मुळा, पवना नदीघाटावरही ठिकठिकाणी विसर्जनाची सोय केली आहे. पवना नदी घाटावर चिंचवड, मोरया गोसावी मंदिर, काळेवाडी फाटा, पिंपरीतील झुलेलाल घाट, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी घाटावर विसर्जनासाठी सोय केली आहे. महापालिका आणि पुणे पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शहरात स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. पिंपरीतील डिलक्स चौक व चिंचवडमधील चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारला आहे.
अग्निशामक विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा विभाग, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निशामक विभागाचे नियंत्रणाखाली गणेश विसर्जनासाठी सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. २६ विसर्जन घाटांवरच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, घाटावरील बॅरिकेड्स, सुरक्षा दोरी ओलांडू नये, लहान मुले, वृद्ध, स्त्रिया, अपंग इत्यादी व्यक्तींनी विसर्जनाच्या ठिकाणापासून दूर राहावे. विसर्जन करण्याकरिता महापालिकडून तयार करण्यात आलेल्या हौदाचा वापर करावा़ गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटावरील उपलब्ध कुशल व्यक्तीची मदत घ्यावी, असे आवाहन केले आहे.
महापालिका : मंडळांचे करणार स्वागत
भक्ती, जल्लोष, उत्साहात बाप्पांचे स्वागत केल्यानंतर आता वेळ आलीय बाप्पांना निरोप द्यायची. बाप्पांच्या विसर्जनाची तयारीही वेगाने सुरू आहे. शहरात चिंचवड आणि पिंपरी येथून मिरवणूक काढली जाते. गणपतींचे मिरवणुकीसाठीचे रथ तयार झाले आहेत. चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, थेरगाव, रावेत, किवळे, प्राधिकरण, पिंपळे सौदागर भागात आज मिरवणुकीची लगबग दिसून येत होती. तसेच विविध ढोल-ताशा पथक आपली कला सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारी सकाळी ११ पासून पिंपरीतील आणि दुपारी एक नंतर चिंचवड येथील मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. शगुन चौक आणि चापेकर चौकात महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर स्वागत करणार आहेत.
हिंजवडी येथील वाहतुकीत बदल
४हिंजवडी फेज-१ कडून येणारी वाहतूक जॉमॅट्रीक सर्कलपासून मेगा नाईनकडे व तेथून पुढे लक्ष्मी चौक तेथून उजवीकडे वळून भूमकर चौकात जाणार आहे. पोलीस ठाण्याकडून येणारा मार्ग शिवाजी चौकातून उजवीकडे वळून पुढे पेट्रोल पंपाकडे वळविण्यात येणार आहे. तेथून पुढे कस्तुरी चौक व पुढे भूमकर चौक असा हा मार्ग असणार आहे. शिवाजी चौकातून गावाकडे जाणारा मार्ग बंद असणार आहे.

Web Title: Message to Ganaraya: Preparations for 26 Visionary Ghats in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.