पुण्यात जीवावर बेतला पतंगाचा मांजा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:58 PM2018-10-30T19:58:25+5:302018-10-30T20:08:37+5:30

मांज्यामुळे जखमी व मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

manza of kite injured persons in pune | पुण्यात जीवावर बेतला पतंगाचा मांजा 

पुण्यात जीवावर बेतला पतंगाचा मांजा 

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेगाव परिसरातील सुर्या चौकामध्ये नायलॉन मांज्यामुळे तिघेजण जखमी पोलीस किंवा पालिका प्रशासनाकडून घटनेची दखल नाही

धनकवडी :- राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने पतंगाच्या मांज्यावर बंदी घातली असताना शहरात नायलॉन मांज्याची सर्रास विक्री होत आहे. मांज्यामुळे जखमी व मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेगाव परिसरातील सुर्या चौकामध्ये नायलॉन मांज्यामुळे तिघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. यात प्रशांत शिळीमकर (वय ४२, वर्षे रा.आंबेगाव पठार) हे जखमी झाले आहेत.
 आंबेगाव पठार येथे शिळीमकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या मानेजवळ काहीतरी वळवळल्याचा भास झाला. दुचाकीचा वेग कमी असल्याने लगेच त्यांनी आपल्या उजव्या हाताने मानेजवळ काय वळवळत आहे हे पाहिले असता नायलॉनच्या धारधार मांज्यामुळे  त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे कापली गेली. मांज्याची धार इतकी होती की काप थेट हाडापर्यंत गेला. त्यांच्या एका बोटाला पाच तर दुसऱ्या बोटाला दोन टाके पडले आहेत.सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने आणि प्रशांत यांच्या प्रसंग सावधनतेमुळे गळ्याला इजा होण्याऐवजी बोटे कापली गेली. त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या ओठाला तर दुसऱ्याच्या हाताला कापले. राजे चौकात लहान मुले पतंग उडवित असताना ही दुर्घटना घडली. 
प्रशांत शिळीमकर म्हणाले, याबाबत मी आंबेगाव पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांना मला सहकार्य केले नाही. ज्या मुलांच्या मांज्यामुळे ही घटना घडली ती घटनास्थळावरून निघून गेली असणार आता त्यांना कुठे शोधायचे कारण देत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने पुन्हा पोलीस चौकीत गेले असता तुम्ही आरोग्य विभागाकडे तक्रार करा, आम्ही याबाबत काही करू शकत नाही. असे बोलून त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. गेले तीन दिवस ते या प्रकरणाची तक्रार देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पोलीस प्रशासन किंवा पालिकाप्रशासनाकडून या घटनेची कोणतीही दखल घेतली जात नाही. 
...................... 
 मांज्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. काही जणांनी जीवही गमावला आहे. सहा महिन्यापुर्वी सुवर्णा मुजुमदार या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सात आँक्टोंबरला पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या डॉक्टर युवतीचा मांज्याने गळा कापला जावून मृत्यू झालाहोता. त्यानंतर प्रशासनाने दुकानांवर छापे टाकून मांजा जप्त केला होता.
......................
 महापौरांच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत कारवायांचे स्वरूप कशाप्रकारे असेल याचे स्पष्ट संकेत धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाला नसल्याने कारवाई करता आली नाही. परंतु, आता क्षेत्रीय कार्यालय परिसरात मांज्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- राजू दुल्लम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक,  सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय
........................
मांजावर कारवाई करण्याची महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त जबाबदारी आहे. यापूर्वी ही परिसरात मांज्याची विक्री करणाऱ्या दुकानांचा शोध घेतला असता फारशी दुकाने आढळून आली नाही. परंतु या घटनेनंतर मांज्याची विक्री होत असलेल्या दुकानांचा पुन्हा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.- मधुकर सांळुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आंबेगाव पठार पोलीस चौकी 

Web Title: manza of kite injured persons in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.