Maharashtra: राज्यातील कारागृहात आता असणार अत्याधुनिक तिसऱ्या डोळ्याची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 12:43 PM2024-02-04T12:43:04+5:302024-02-04T12:43:33+5:30

येरवडा कारागृहातील ८१२ सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन...

Maharashtra: Jails in the state will now have a state-of-the-art third eye | Maharashtra: राज्यातील कारागृहात आता असणार अत्याधुनिक तिसऱ्या डोळ्याची नजर

Maharashtra: राज्यातील कारागृहात आता असणार अत्याधुनिक तिसऱ्या डोळ्याची नजर

पुणे : कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी राज्यभरातील १६ मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात येरवडा, मुंबई मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, शनिवारी (ता. ३) सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती यांची उपस्थिती होती. कारागृहातील गैरप्रकार रोखणे, तसेच कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरणार असल्याचे रस्तोगी यांनी नमूद केले.

कारागृहातील कैद्यांची हाणामारी, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारागृहातील घडामोडी आणि कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर नियंत्रण कक्षातून कारागृहातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी नमूद केले.

कोणत्या कारागृहात किती कॅमेरे..

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ८१२ कॅमेरे, मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात ३२०, कल्याणमधील जिल्हा कारागृहात २७०, भायखळा कारागृहात ९०, अमरावती मध्यवर्ती कारागृहात १०६, नागपूर मध्यवर्ती कारागृहात ७९६, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ९४१, नाशिकमधील किशोर सुधारालयात ८६, लातूर जिल्हा कारागृहात ४६०, जालना जिल्हा कारागृहात ३९९, धुळे जिल्हा कारागृहात ३३१, नंदूरबार जिल्हा कारागृहात ३६५, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात ३१५ आणि गडचिरोली खुल्या कारागृहात ४३४ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित..

शासनाकडून निधी मंजूर झाल्यावर राज्यातील उर्वरित ४४ कारागृहांत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. राज्यातील सर्व कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय प्रत्येक कारागृहात कैद्यांच्या झडतीसाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच पॅनिक बटण देखील बसवले जाणार आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये कारागृहात मोबाइल आणि सीम आढळून आले होते. कारागृहात मोबाइल येऊ नये आणि यासाठी प्रत्येक कारागृहात बॉडी स्कॅनर यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे कारागृहातील प्रत्येक कैद्यावर लक्ष राहणार आहे. कैद्यांना कुटुंबाशी संवाद वाढवण्यासाठी टेलिफोन सुविधा सुरू केली आहे. कैद्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नव्याने बांधणाऱ्या कारागृहात ग्रंथालये आणि योगाची सुविधा मिळणार आहे.

- राधिका रस्तोगी, प्रधान सचिव, गृह विभाग (अपील व सुरक्षा)

Web Title: Maharashtra: Jails in the state will now have a state-of-the-art third eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.