काश्मिरी तरुणांना हवेत वैधानिक अधिकार- शाह फैजल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:33 AM2019-01-31T03:33:49+5:302019-01-31T03:35:50+5:30

सरहद आणि अर्हम फाउंडेशनच्यावतीने सांस्कृतिक महोत्सव

Legal rights in Kashmiri youth - Shah Faizal | काश्मिरी तरुणांना हवेत वैधानिक अधिकार- शाह फैजल

काश्मिरी तरुणांना हवेत वैधानिक अधिकार- शाह फैजल

Next

पुणे : गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. तरुण द्वेषापोटी हातात बंदूक घेत आहेत. १०० हल्लेखोर मारले गेले, तर २०० नव्याने तयार होतात. गोळीचे उत्तर गोळीने देऊन चालणार नाही. अजून किती सैनिक आणि तरुण मारले जाणार आहेत? आपले वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. तरुणांचा राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. वैधानिक अधिकारच नाहीत, तर मतदान का करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणांना अधिकार मिळायला हवेत. शासन, प्रशासन आणि सामान्यांमध्ये संवादाचे पूल बांधले जावेत, असा आशावाद शाह फैजल या काश्मिरी तरुणाने व्यक्त केला.

सरहद आणि अर्हम फाउंडेशनच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात फैजल यांनी जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. आएएसमध्ये प्रथम येऊनही ज्याने प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक-राजकीय क्षेत्रात येण्याचा निश्चय केला, ज्याच्या वडिलांना अतिरेक्यांनी ठार मारले, अशा डॉ. शाह फैजल या तरुणाशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. सरहदच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनिल आनंद, विवेक देशपांडे, मिलिंद देशपांडे, मुश्ताक अली यांचा सन्मान करण्यात आला. प्राणकिशोर कौल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारताने संवादाची भूमिका घेतली आहे, तेव्हा तेव्हा काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे हिंसक वातावरण, अशांतता, अराजक या प्रत्येक समस्येला संवाद हेच उत्तर आहे. हीच संवादाची भूमिका पुढे न्यायला हवी.’
‘भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. येथे समानतेचा सन्मान केला जातो. पूर्वी अल्पसंख्याक समाजालाही बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार होता. बंधुभाव, एकतेचे वातावरण टिकवण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. बंधुभाव कायम राहिला तरच विकास होऊ शकेल. त्यासाठी संविधानातील मूल्ये जपली गेली पाहिजेत’, याकडेही शाह फैजल यांनी लक्ष वेधले.

काश्मीरच्या मुलांना संस्कृतीबद्दल काहीच माहिती नाही
काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करून काश्मिरी पंडितांना परत बोलावले पाहिजे. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यातूनच भावी पिढी विविधतेतून एकता शिकू शकेल.
शाह फैजल तरुणांना चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे, असे तेथील स्टेक होल्डर्सना वाटत आहे. कारण, लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच तेथे अनेक गैरसमज आहेत. आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल.

प्रशासकीय सेवेत काम करत असताना रस्ता, वीज, दवाखाने, शाळा अशा सुविधा निर्माण करून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करता येईल, असे वाटायचे. मात्र, अशांततेला सामोरे जात असताना, काश्मीरला पैशांची गरज नाही, हे लक्षात आले. सैनिक पाठवले की प्रश्न सुटतील, असे सरकारला वाटते. सैन्य आणि तरुण यांच्यातील हा लढा नाही. याला राजकीय धोरणांमधील अपयश कारणीभूत आहे. धर्म, प्रदेश, प्रांत यापलीकडे जाऊन काश्मीर प्रश्न सोडवला पाहिजे. पैसा, राजकारणाने नव्हे तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हा प्रश्न सुटू शकेल.
- शाह फैजल

महात्मा गांधी सर्वमान्य
महात्मा गांधींना केवळ भारतातच नाही, जगात मानले जाते. अनेक ठिकाणी त्यांच्यावर संशोधन सुरू आहे. अनेक परदेशी तरुण त्यांची तत्वे अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीर सध्या जळत आहे. काश्मीरमधील अशांततेतून शांततेकडे घेऊन जाणारा मार्ग गांधींच्या अहिंसक विचारांमध्येच मिळू शकतो.

Web Title: Legal rights in Kashmiri youth - Shah Faizal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.