लष्कर-ए-तैयबा घातपात प्रकरण: जुनैद मोहम्मदची येरवडा कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:49 PM2022-06-08T12:49:12+5:302022-06-08T12:50:12+5:30

विशेष न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली...

Lashkar-e-Taiba massacre case Junaid Mohammad sent to Yerawada jail | लष्कर-ए-तैयबा घातपात प्रकरण: जुनैद मोहम्मदची येरवडा कारागृहात रवानगी

लष्कर-ए-तैयबा घातपात प्रकरण: जुनैद मोहम्मदची येरवडा कारागृहात रवानगी

Next

पुणे : भारत सरकारने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या मोहम्मद जुनैद मोहम्मद अता याची विशेष न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली.

जुनैदकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्याचा साथीदार आफताब हुसेन शाह (वय २८, रा. किस्तवाड प्रांत, जम्मू-काश्मीर) याला देखील अटक करण्यात आली आहे. दोघेही सामाजिक माध्यमातून लष्कर ए तैयबाच्या संपर्कात असल्याचा प्रकार एटीएसने केलेल्या तपासात समोर आला आहे. जुनैद याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासात त्याची १५ फेसबुक, सात व्हॉटस्-ॲप खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे ११ सीमकार्ड मिळाली आहेत.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने साक्षीदार असलेल्यांकडे तपास करून त्यांचे सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. अटक आरोपींचे सोशल मीडिया खात्याचा डेटा हा मोठ्या प्रमाणात असून, त्याचे विश्लेषणाचे काम सुरू आहे. तसेच पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे, असा युक्तिवाद ॲड. फरगडे यांनी केला.

आफताब हा जुनैद आणि लष्करे तैयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगिल, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली. या तपास पथकाने किश्तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले.

जुनैदची पोलीस कोठडी संपल्याने आणि त्याच्याकडील तपास संपल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. सध्या आफताब १४ जूनपर्यंत एटीएसच्या कोठडीत आहे. एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर गुन्ह्याचा तपास करत आहेत; तर सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील विजय फरगडे बाजू मांडत आहेत.

Web Title: Lashkar-e-Taiba massacre case Junaid Mohammad sent to Yerawada jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.