दिव्यांगांप्रति असंवेदनशीलता, विद्यापीठात सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:19 AM2018-12-29T01:19:11+5:302018-12-29T01:19:24+5:30

विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांगांसाठीच्या सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. विद्यापीठात जवळपास २५ हून अधिक विभागांत दिव्यांगांना ये-जा करण्यासाठीची योग्य सुविधाच उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

Lack of facilities in Vidyapith, insensitivity towards Divya | दिव्यांगांप्रति असंवेदनशीलता, विद्यापीठात सुविधांचा अभाव

दिव्यांगांप्रति असंवेदनशीलता, विद्यापीठात सुविधांचा अभाव

Next

- अविनाश फुंदे

पुणे - विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांगांसाठीच्या सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. विद्यापीठात जवळपास २५ हून अधिक विभागांत दिव्यांगांना ये-जा करण्यासाठीची योग्य सुविधाच उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

दिव्यांग कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये विकलांग मार्ग असणे बंधनकारक असून, नसेल तर मान्यता रद्द करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, या नियमाचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठ परिसरात अनेक दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे विद्यापीठ प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे; परंतु विद्यापीठ प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसते.

विद्यापीठ परिसरातील सुमारे २५ हून अधिक विभागांत दिव्यांगांसाठी विकलांग मार्गच नाहीत. क्वचितच काही विभागांत मार्ग आहेत तेथेदेखील दिव्यांगांना सगळीकडे जाणे शक्य नाही. फक्त दरवाजातून आत जाण्यास मार्ग आहे; परंतु पुढे सर्वत्र पायऱ्या असल्याने त्या मार्गाचा काहीच उपयोग नाही.

महत्त्वाची ठिकाणे जिथे मोठ्या प्रमाणात ये-जा असते जसे, की प्रशासकीय इमारत, कुलगुरू कार्यालय, जयकर ग्रंथालय या ठिकाणीदेखील विकलांग मार्ग नाही. कुलगुरूंचे आॅफिस पहिल्या मजल्यावर असून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल, तर त्यासाठीची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही.
विद्यापीठ परिसरात विज्ञान शाखेचे जे तळमजल्यावरीळ विभाग आहेत, असे काही विभाग सोडले तर इतर पहिल्या किंवा दुसºया मजल्यावरील विभागात जाण्याची कुठलीच सुविधा उपलब्ध
नाही.
दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र शौचालय असायला हवे; परंतु कुठल्याही विभागात आशा प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. अनेक विभागांत जाण्यासाठी १५ ते २० पायºया चढून जावे लागते. अशा ठिकाणी विकलांग मार्ग नसल्याने दिव्यांग व्यक्तींनी इतरांच्या मदतीने वर जावे लागते.

विद्यापीठाच्या फक्त एकाच वसतिगृमध्ये जाण्यास विकलांग मार्ग आहे. त्याचबरोबर वसतिगृहपासून विभागात जाण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी विकलांग मार्ग असलेच पाहिजेत याबद्दल काहीच दुमत नाही. आपण नवीन इमारतींना रॅम्पची व्यवस्था केलेलीच आहेच; परंतु ज्या जुन्या इमारतीत सुविधा नाही त्या ठिकाणी इंजिनिअरचा सल्ला घेऊन काय करता येईल ते पाहणार आहोत. ज्या ठिकाणी लिफ्ट ( उद्वाहक)ची सुविधा आहे त्या लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्या संदर्भात इस्टेट विभागाला सूचना दिलेल्या असून लवकरच बैठक बोलावून वेगाने काम करण्यात येईल.
- प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी

विद्यापीठ प्रशासनाकडे बाकीच्या गोष्टींसाठी पैसे आहेत; परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी खर्च करण्याचा मोठेपणा विद्यापीठ कधीच दाखवत नाही. विद्यापीठात सगळीकडे नवनवीन आहे; परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कधीच नाही.
- कुलदीप आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी

२०१६ कायद्यानुसार शिक्षण संस्थांमध्ये दिव्यांगांना सहज जाता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. परंतु, विद्यापीठामध्ये अशा सुविधा उपलब्ध नसल्याने आम्हाला अनेक ठिकाणी जाणे शक्य होत नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते.
- महेश शेळके,
दिव्यांग विद्यार्थी

दिव्यांगांची सोय करणे ही विद्यापीठाची नैतिक जबाबदारी आहे. आम्हाला सहानुभूतीपेक्षा जर सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर आम्ही कुणाचीही मदत न घेता स्वत:च्या पायावर उभे राहू शकतो. परंतु, विद्यापीठ प्रशासन अशा सुविधा देण्याकडे कधीच लक्ष देत नाही.
- सचिन लांबुटे, दिव्यांग विद्यार्थी

Web Title: Lack of facilities in Vidyapith, insensitivity towards Divya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.