कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:14 PM2024-02-13T18:14:02+5:302024-02-13T18:14:28+5:30

आरोपीने विजापूर जिल्ह्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत

Karnataka notorious Dharmaraj Chadchan gang leader jailed in Pune 3 pistols along with 25 cartridges seized | कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त

कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पुण्यात जेरबंद: 3 पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त

किरण शिंदे

पुणे: पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी मोठी कामगिरी करत कर्नाटकातील गुंडाच्या टोळीला जेरबंद केले. सातारा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण चौकात मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कर्नाटकातील कुख्यात कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या मड्ड उर्फ माडवालेय्या हिरेमठ याचा समावेश आहे. त्यांच्या अंग झडती तीन पिस्तूल आणि 25 जिवंत काडतुसे सापडली आहेत.

मड्ड उर्फ माडवालेय्या हिरेमठ (वय 35, एपीएमसी मार्केट जवळ बंब लक्ष्मी इंडी रोड, ता. जी विजापूर), सोमलिंग गुरप्पा दर्गा (वय 28, एम बी पाटील नगर, सोलापूर रोड, विजापूर), प्रशांत गुरुसिद्धप्पा गोगी (वय 37, शिवशंभू नगर कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कुख्यात 'धर्मराज चडचंण' टोळीचा म्होरक्या पिस्तूल घेऊन पुण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार पर्वती पोलिसांची चार पथके तयार करून नगर रोड ते पर्वती परिसरात सापळे रचण्यात आले होते. दरम्यान स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चौकात सोमवारी रात्री पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीत पोलिसांना संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानुसार पोलिसांनी गाडीतील तीनही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझेडतीत देशी बनावटीचे तीन पिस्तूल आणि 25 जिवंत काडतुसे सापडली. याची किंमत 11 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. 

कर्नाटक राज्यात कुख्यात धर्मराज चडचंण आणि महादेव बहिर्गोंड (सावकार) या डोळ्यांमध्ये खुन्नस आहे. यातील धर्मराज चडचंण याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंगाधर चडचंण याचा खून महादेव सावकार केल्याचा संशय आहे. त्यामुळे मड्ड उर्फ माडवालेय्या हिरेमठ याने धर्मराज चडचंण टोळीच्या नावाने महादेव सावकार याच्यावर 2020 मध्ये मोठा हल्ला केला होता. सहा गावठी पिस्तूल आणि टोळीच्या 40 साथीदारांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सावकार टोळीच्या दोघांचा खून झाला होता.  मात्र महादेव सावकार बचावला होता. तेव्हापासून मड्ड हा टोळी चालवत आहे. त्याने विजापूर जिल्ह्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. मात्र सध्या तो टोळी युद्धाच्या भीतीपोटी मागील दोन महिन्यांपासून कोंढवा परिसरात त्याच्या परिवारासह राहण्यास आहे. आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच पोलिसांनी कर्नाटक राज्यातील ही कुख्यात गुंडांची टोळी जेरबंद केली. 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सचिन पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, सद्दाम शेख, अमोल दबडे आणि त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Karnataka notorious Dharmaraj Chadchan gang leader jailed in Pune 3 pistols along with 25 cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.