तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त, टीमवर्क ही यशाची पंचसूत्री - कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:00 AM2019-02-03T02:00:49+5:302019-02-03T02:03:58+5:30

तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त आणि टीमवर्क ही कबड्डीच नव्हे तर कोणत्याही सांघिक खेळामध्ये तसेच जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक अशी पंचसूत्री आहे.

Kabaddi coach Shelaja Jain news | तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त, टीमवर्क ही यशाची पंचसूत्री - कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त, टीमवर्क ही यशाची पंचसूत्री - कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

googlenewsNext

पुणे : तंत्र, मेहनत, जिद्द, शिस्त आणि टीमवर्क ही कबड्डीच नव्हे तर कोणत्याही सांघिक खेळामध्ये तसेच जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक अशी पंचसूत्री आहे. आतापासून या पाच सूत्रांचा अंगीकार केल्यास तुम्ही खेळासह आवडीच्या क्षेत्रांमध्ये निश्चितच यशस्वी व्हाल, असा सल्ला आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील सुवर्णपदकविजेत्या इराणच्या महिला संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन यांनी उदयोन्मुख खेळाडूंना दिला.
शैलजा जैन यांना शनिवारी सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरतर्फे ‘सिम्बायोसिस क्रीडाभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थित युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘‘संकटे, आव्हानात्मक परिस्थिती यांचा बाऊ करण्याऐवजी खेळाडूंनी त्याची सवय करून घ्यायला हवी. याकडे संधी म्हणून बघायला हवे. अशा गोष्टींचा जिद्दीने आणि धैर्याने सामना केल्यास आपली क्षमता उंचावते.’’
मागील वर्षी जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या महिला संघाने अंतिम फेरीत भारताला नमवून कबड्डीचे सुवर्णपदक पटकावले होते. इराण संघाच्या या यशात शैलजा जैन यांच्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा होता. ‘‘इराण संघाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या देशात गेल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वांत पहिला अडसर हा भाषेचा होता. संघातील एकाही मुलीला इंग्रजी कळत नव्हते आणि मला फारसी. संघासोबत संवाद साधण्यासाठी मला दुभाषी महिला उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, संघातील मुलींसोबत स्वत:ला कनेक्ट करून घेण्याच्या दृष्टीने ही गोष्ट मला अपुरी वाटत होती. अखेर मी फारसी भाषा शिकण्याचे ठरवले आणि मुलींना कामचलाऊ इंग्रजी शिकविले. मी शाकाहारी आहे; मात्र तेथील लोकांना शाकाहार काय असतो, तेच ठाऊक नव्हते. माझी आहाराची अडचण ओळखून इराणच्या कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाकाहारी भोजन बनविणाºयाची सोय उपलब्ध करून दिली,’’ अशी आठवण जैन यांनी सांगितली.
सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे मानद संचालक डॉ. सतीश ठिगळे, शैलजा जैन यांचे पती जैनेंद्रकुमार जैन,
अर्जुन पुरस्कारविजेत्या माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या अध्यक्षा वसंती बोर्डे, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव, अण्णा नातू, देविदास जाधव, डॉ. कल्याण गंगवाल, राजू दाभाडे, विजय बोर्डे यांच्यासह
अनेक मान्यवर या वेळी उपस्थित
होते. डॉ. ठिगळे यांनी प्रास्ताविक
केले. प्रा. स्वाती दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

संघनिवड, प्रशिक्षणाबाबत होते संपूर्ण स्वातंत्र्य
इराण आशियाडमध्ये सुवर्ण जिंकू शकला, याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्याचे जैन यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, ‘‘इराणचा संघ काटक असून त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. या संघाची गुणवत्ता मैदानावर सिद्ध व्हावी, यासाठी त्यांचा खेळ खुलविणे ही माझी जबाबदारी होती. यासाठी मला इराणच्या कबड्डी प्रशासनाकडून संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. संघात कोणती खेळाडू निवडावी, कोणाला कोणत्या स्थानावर खेळवावे, यात कोणाचाही हस्तक्षेप नव्हता. प्रशिक्षणासाठी मागणी केलेली प्रत्येक गोष्ट पुरविण्यात आली. हाताचे पंजे आणि डोक्यावरील केस वगळता उर्वरित चेहरा हे सोडून स्त्रीचे संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख वापरण्याचा कठोर नियम तेथे आहे. खेळाडूंसाठीही हाच पोशाख आहे. मात्र, मैदानावर प्रतिस्पर्धी संघांचा पोशाख हा अडसर ठरू नये, यासाठी मी एक मार्ग शोधला. सरावादरम्यान, मी मुलींचे २ संघ बनवायचे. यातील एकाला इराणी पोशाख असायचा, तर दुसºया संघाला महिला कबड्डीपटूंचा नेहमीचा पोशाख. यामुळे सामन्यात चढाई वा पकड करताना उद्भवू शकणारी प्रतिस्पर्ध्यांच्या पोशाखासंदर्भातील समस्या दूर झाली. खेळाडूंचा दम वाढावा, यासाठी समुद्राजवळ शिबिर घेण्याची माझी मागणी पूर्ण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर इराण हे मुस्लिम राष्ट्र असूनही त्या मुलींना मी योग, प्राणायाम, ओंकार, शवासन असे श्वसनाशी संबंधित व्यायाम शिकवायचे ठरविल्यावर कुणीही त्याला आक्षेप घेतला नाही. या स्वातंत्र्यामुळे खेळाडूंकडून सुवर्णपदक जिंकण्यासाठी आवश्यक कामगिरी करवून घेणे शक्य झाले. सरावादरम्यान मी अनेकदा खेळाडूंवर रागवायचे; मात्र आईच्या मायेने त्यांच्यासोबत वागायचे. खेळाडूंना खरचटल्यावर लगेच हळद लावायचे. सोबतच फिजिओकडून योग्य उपचार करून घ्यायलाही सांगायचे. खेळाडूंनी अनेकदा मौल्यवान भेटवस्तू मला देऊ केल्या; मात्र मी त्यांना केवळ आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाची मागणी केली. त्या मुलींनी ही मागणी पूर्ण केली तेव्हा संपूर्ण संघाला आणि मला गहिवरून आले होते.’’

इराणने भारताला नमविल्यावर होत्या संमिश्र भावना...
अंतिम लढतीत भारताला नमवून सुवर्ण जिंकताच इराणच्या पाठीराख्यांनी आणि संघाने जोरदार जल्लोष सुरू केला. मलाही त्यात ओढले. त्याच वेळी माझ्या देशाच्या मुली, प्रशिक्षक पराभवामुळे निराश होते. अनेकांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. आपण प्रशिक्षण दिलेल्या मुलींनी मैदान मारले,ही कृतार्थतेची भावना मनात असतानाच आपल्या देशाचे सुवर्ण हुकले, ही खंत माझे मन पोखरत होती. अखेर ‘आपण समर्पित असलेल्या त्या खेळाला आॅलिम्पिकमध्ये नेण्यासाठी इतर देशांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने भारताला इराणने पराभूत करणे, ही सकारात्मक घटना असल्याचे मी मनाला समजावले,’ अशा शब्दांत जैन यांनी त्या वेळची आपली भावनिक घालमेल व्यक्त केली.
 

Web Title: Kabaddi coach Shelaja Jain news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.