"आमच्या आंदोलनामुळेच राष्ट्रपतींना शनिदेवाचे दर्शन घेता आले"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:13 AM2023-12-01T09:13:12+5:302023-12-01T09:15:48+5:30

२०१६ साली आम्ही यासाठी आंदोलन केलं होतं. कारण, अनेक वर्षांपासून येथील चौथऱ्यावर महिलांना दर्शनासाठी बंदी होती

"It was only because of our agitation that the President was able to see Lord Shani in Shinganapur, Trupti Desai." | "आमच्या आंदोलनामुळेच राष्ट्रपतींना शनिदेवाचे दर्शन घेता आले"

"आमच्या आंदोलनामुळेच राष्ट्रपतींना शनिदेवाचे दर्शन घेता आले"

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांसह पालकमंत्रीही उपस्थित होते. येथील शनि मंदिरात चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. त्यासाठी, भूमाता ब्रिगेडने तृप्ती देसाईंच्या नेतृत्त्वात आंदोलन केले होते. आता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन पूजा केल्यानंतर, आमच्या आंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं.  

२०१६ साली आम्ही यासाठी आंदोलन केलं होतं. कारण, अनेक वर्षांपासून येथील चौथऱ्यावर महिलांना दर्शनासाठी बंदी होती. संविधानाने अधिकार दिला असला तरीदेखील दर्शनासाठी संघर्ष करावा लागला. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं, याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटला. कारण, आमच्या आंदोलनामुळेच राष्ट्रपतींना तिथे दर्शन घेता आलं, असे भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी म्हटलं. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत, त्यामुळे मी त्यांना विनंती करेल की, त्यांनी शबरीमाला मंदिरात जाऊनही दर्शन घ्यावे. कारण, शबरीमाला मंदिरातही मासिक पाळीमुळे महिलांना दर्शनासाठी प्रवेश बंदी आहे. आम्ही त्यासाठीही आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयानेही मंदिर दर्शनाचे आदेश दिले आहेत. मात्र, काही जणांची तिथे दादागिरी चालते, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले. 

राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर  प्रसादालयात  राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

Web Title: "It was only because of our agitation that the President was able to see Lord Shani in Shinganapur, Trupti Desai."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.