मुलाखत: मराठी साहित्य श्राव्य स्वरुपात उपलब्ध व्हावे : करुणा गोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:18 PM2019-04-20T12:18:49+5:302019-04-20T12:19:08+5:30

अलिप्त आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने अनुवाद करावा लागतो. अनुवाद झाल्यावर त्याने वाचकाच्या भूमिकेत जावे, याकडे अनुवादिका करुणा गोखले यांनी लक्ष वेधले.

Interview: Marathi literature should be available in audio format: Karuna Gokhale | मुलाखत: मराठी साहित्य श्राव्य स्वरुपात उपलब्ध व्हावे : करुणा गोखले

मुलाखत: मराठी साहित्य श्राव्य स्वरुपात उपलब्ध व्हावे : करुणा गोखले

googlenewsNext
ठळक मुद्देअनुवाद क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानासाठी करुणा गोखले यांना रेखा ढोले स्मृती पुरस्कार

अनुवादक हा प्रसुतीरोगतज्ज्ञ असतो. बाळ जन्माला येईपर्यंत आई आणि बाळ यांची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी तज्ज्ञाची असते.  बाळाचा जन्म सुखरुप व्हावा आणि त्याच्यावर हक्क सांगू नये, अशी स्थिती असते. त्यामुळे अलिप्त आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने अनुवाद करावा लागतो. अनुवाद झाल्यावर त्याने वाचकाच्या भूमिकेत जावे, याकडे अनुवादिका करुणा गोखले यांनी लक्ष वेधले. मराठी साहित्य श्राव्य स्वरुपात उपलब्ध झाल्यास अनुवादाचे प्रमाण वाढेल, असेही त्या म्हणाल्या. अनुवाद क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानासाठी करुणा गोखले यांना राजहंस प्रकाशनातर्फे रेखा ढोले स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद.
--------
* पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काय भावना आहेत?
अनुवाद हा दखलपात्र साहित्यव्यवहार आहे, अशी मानसिकता अद्याप पूर्णपणे तयार झालेली नाही. राजहंस प्रकाशन ही संस्था ब-याच वर्षांपासून हा पुरस्कार देत असून, त्यानिमित्ताने अनुवाद हा गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, हे अधोरेखित होत आहे. त्यामुळे पुरस्काराबाबत मी समाधानी आहे.
* अनुवादामधील आव्हाने काय असतात?
- पुस्तकातील विषयाशी संबंधित पारिभाषिक संज्ञा तपासून घ्याव्या लागतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ अचूकपणे जाणून घ्यावे लागतात. आपल्या शैलीचे रोपण लेखकाच्या शैलीवर होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. आपली मूल्यव्यवस्था, राजकीय विचारधारा यांची लुडबूड लेखकाच्या साहित्यामध्ये होता कामा नये. लेखकाच्या म्हणण्याशी आणि साहित्याच्या दर्जाशी अनुवादकाने प्रामाणिक रहावे. भाषेप्रमाणेच व्याकरणाची उत्तम जाण असायला हवी. 
* मराठी साहित्याचे इतर भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण कमी का?
- अनुवादाची सृजनशील निर्मिती करताना व्याकरणावर प्रभुत्व असावे लागते. मराठी साहित्य श्राव्य रुपात उपलब्ध करुन दिल्यास अनुवादाचे प्रमाण वाढेल. दोन किंवा अधिक भाषांवर प्रभुत्व असणारे अनुवादक मराठी साहित्य इतर भाषांमध्ये नेऊ शकतात. जागतिक पातळीवर इतर भाषांच्या तुलनेत मराठीतील कथा आणि कादंब-या कमी प्रमाणात सरस ठरतात. मराठीतील नाटके आणि वैचारिक लेखन मात्र खूप ताकदीचे आहे. 
* अनुवादामध्येही तंत्रज्ञान डोकावत आहे का?
- मशीन ट्रान्सलेशन ही अनुवादाची उपशाखा आहे. तांत्रिक विषयांवरील संहिता मशील ट्रान्सलेशनद्वारे अनुवादित करता येतात. मात्र, या उपशाखेला मर्यादित शब्दकळा असतात. यातून ७०-८० टक्के अनुवाद होतो. माणसाला केवळ २० टक्के दुरुस्तीचे काम करावे लागते. भारतात काही व्यावसायिक संस्था या तंत्राचा वापर करतात. 
-----------------------
गोखले यांच्याविषयी :
करुणा गोखले यांनी बर्ट्रांड रसेल, सिमोन द बोव्हुआ या विचारवंतांचे तत्वचिंतनात्मक साहित्य मराठीत आणले आहे. युध्दांत होरपळलेल्या लहान मुलांच्या दैनंदिनी, शोधपत्रकारितेच्या अंगाने जाणारी ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’, ‘फार्देस्ट फील्ड’ ही भारताविषयीची इंग्रजी साहित्यात गाजलेली पुस्तके, ‘नेहरु-नवभारताचे शिल्पकार’, ‘अज्ञाताच्या ज्ञानासाठी’, ‘नाही लोकप्रिय तरी’ ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तके. २०१४ साली त्यांना ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी ‘दुर्गा भागवत, शब्द’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या ‘बाईमाणूस’ या पुस्तकास २०१० सालचा महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Web Title: Interview: Marathi literature should be available in audio format: Karuna Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.