भारतीय संस्कृती अखंड व शाश्वत

By admin | Published: June 3, 2017 02:50 AM2017-06-03T02:50:10+5:302017-06-03T02:50:10+5:30

ॠग्वेद, उपनिषदे, पुराणे यांतून भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. ‘सनातनम नित्यनूतनम’ याप्रमाणे संस्कृतीचा प्राचीन, सनातन

Indian culture is unbroken and eternal | भारतीय संस्कृती अखंड व शाश्वत

भारतीय संस्कृती अखंड व शाश्वत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ॠग्वेद, उपनिषदे, पुराणे यांतून भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. ‘सनातनम नित्यनूतनम’ याप्रमाणे संस्कृतीचा प्राचीन, सनातन प्रवाह कायम सुरूच आहे. यात सातत्याने नवीन भर पडत आहे. म्हणूनच संस्कृती आजवर टिकली आणि यापुढेही टिकेल. भारतीय संस्कृती अखंड आणि शाश्वत आहे, असे ठोस प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.
प्रसाद प्रकाशन व प्रसाद ज्ञानपीठातर्फे पं. वसंतराव गाडगीळ यांना बापूसाहेब जोशी स्मृतिगौरव पुरस्कार, तर व्यवस्थापनतज्ज्ञ प्र. चिं. शेजवलकर यांना मंजिरी जोशी स्मृतिगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी देगलूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी रामकृष्ण मठाचे स्वामी भौमानंद, समर्थ साहित्याचे अभ्यासक सुनील चिंचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ११ पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
देगलूरकर म्हणाले, ‘काळाच्या ओघात अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र, आसेतुहिमाचल हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. संस्कृतीची वैचारिक संपत्ती, ध्येय, प्रबोधनात्मक लेखन, प्राचीन साहित्याचा परिचय करून घेण्याचे आणि संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न आजही केले जात आहेत. प्राचीन ज्ञान कधीही लुप्त होत नसते. ते कायम घासून पुसून उजळून लख्ख करायचे असते.’
पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘भारतातील संस्कृत भाषा टिकवण्यासाठी मी जीवन समर्पित केले आहे. भारतीयांच्या मनात संस्कृत भाषेला ठोस स्थान मिळायला हवे. मानवी विचारांचा पहिला आविष्कार ॠग्वेद संस्कृतमध्येच उपलब्ध आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी, भाषासम्राज्ञी आहे. ही भाषा कधीही लोप पावणार नाही. अखंड भारतासाठी आपणा सर्वांचे विचार, ध्येय एकच असले पाहिजे.’
शेजवलकर म्हणाले, ‘आध्यात्मिक, धार्मिक लेखनातून भारताच्या परंपरेची झलक पाहायला मिळते. ललितगद्य प्रकार वाचकांना आजही आवडतो. आज आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचे वेड लागले आहे. मात्र, जुने ते सोने याचा विचार करून ते जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’
या वेळी स्वामी भौमानंद आणि सुनील चिंचोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. उमा बोडस यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा बोडस यांनी सूत्रसंचालन केले. रमेश भागवत यांनी आभार मानले.

प्रबंधासाठी सशक्त मार्गदर्शन आवश्यक
विद्यापीठातील पीएचडी यंत्रणा कशा प्रकारे काम करते, याकडे लक्ष वेधत देगलूरकर म्हणाले, ‘बऱ्याच प्रबंधांमध्ये चौर्यकर्म मोठ्या प्रमाणात चालते. दर्जेदार संशोधन आणि प्रबंधांसाठी सशक्त मार्गदर्शन आवश्यक असते.’ वाचक कमी झाल्याने अनेक दर्जेदार मासिके बंद पडली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Indian culture is unbroken and eternal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.