अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:48 PM2024-03-19T12:48:50+5:302024-03-19T12:51:53+5:30

शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत...

In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate | अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

- दुर्गेश मोरे

पुणे : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच एक बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोधही आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या तोडीस तोड उमेदवार मिळत नव्हता आणि महायुतीला ही जागा काही गमवायची नव्हती. पराभव झालेल्या दिवसांपासून आढळराव पाटील यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली होती. अखेर दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यात महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागण्याच्या सूचना आढळराव पाटील यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील हे आता स्पष्टच झाले आहे.

अतुल बेनकेंची यशस्वी मध्यस्थी

शिरूरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे असणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार हे निश्चित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांना विरोध दर्शवला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन काही अंशी विरोध केला. अखेर जुन्या सख्या मित्राला मदत करण्याचे ठरवले. यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. इतकेच नाही तर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही विरोध केला. त्यावेळीही आमदार बेनके मध्यस्थाच्या भूमिकेत होते. त्यानंतर इतक्या वर्षांतली मनातील मळमळ आमदार मोहितेंनी सर्वांसमोर व्यक्त केली होती. तेव्हापासून ते शांतच आहेत. दरम्यानच्या काळात वरिष्ठ पातळीवर अनेक घडामोडी घडल्यानंतर आमदार मोहितेंनी मौन बाळगले आहे. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

अजित पवार बुधावारी खेडला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवला. खुद्द आढळराव पाटील यांनी खेडला निवासस्थानी जाऊन आमदार मोहिते पाटील यांची भेट घेतली. पण, विरोध कायम होता. अलीकडे ते थोडे शांत झाले आहेत. त्यातच आता बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजते. ही भेट नाराजी दूर करण्यासाठीच असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.

Web Title: In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.