माझी इच्छा होती की, मी भारतीय सैन्य दलात दाखल व्हावे; मोहन आगाशेंनी सांगितली आठवण

By श्रीकिशन काळे | Published: July 23, 2023 03:45 PM2023-07-23T15:45:42+5:302023-07-23T15:46:30+5:30

जवानांकडून मला कायम स्फूर्ती मिळत असल्याचे मोहन आगाशे यांनी सांगितले

I wanted to join the Indian Army Reminiscences told by Mohan Agashe | माझी इच्छा होती की, मी भारतीय सैन्य दलात दाखल व्हावे; मोहन आगाशेंनी सांगितली आठवण

माझी इच्छा होती की, मी भारतीय सैन्य दलात दाखल व्हावे; मोहन आगाशेंनी सांगितली आठवण

googlenewsNext

पुणे: मी लहान होतो, तेव्हा मला एनडीएमध्ये दाखल व्हावे, असे  वाटत होते. त्यासाठी मेजर बापट यांच्या क्लासला जात होतो. माझी इच्छा होती की, मी भारतीय सैन्य दलात दाखल व्हावे. दोन गोष्टी घडल्या. एक तर चुकून मला जास्त गुण मिळाले. दुसरं ताकीद मिळाली की, तुला फ्लॅटचिट आहे. अशा माणसाला सैन्यात घेत नाहीत. पण जायबंदी जवानांनी पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी किती तरी गोष्टी घडवल्या आहेत. खरंच या जवानांचे मला कौतूक आहे. जवानांकडून मला कायम स्फूर्ती मिळत असल्याचे अभिनेते मोहन आगाशे यांनी सांगितले. खरंतर कोणालाही डिप्रेशन वाटत असेल तर मी पहिले खडकीच्या सेंटरमध्ये घेऊन जातो. त्या माणसाला लाज वाटली पाहिजे स्वत:ची. त्यामुळे मी जवानांनाच ऋणी आहे, असाही आगाशे म्हणाले.

निमित्त होते, त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ३५ व्या पुण्यभूषण पुरस्काराचे! ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना आज बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण शर्मिला टागोर आणि पद्मभूषण अनुपम खेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.त्या वेळी ते बोलत होते.

''सर्वांनी मिळून जी कला करायची असते, ती थिएटर किंवा सिनेमा. मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मानसिक पुनर्वसनाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. जे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. आमच्यामध्ये एक वर्ग असा आहे की, काही लोकं ट्रीटेड स्क्रिझोफेनिज आहेत, तर काही लोकं अनट्रीटेड स्क्रिझोफेनिज आहेत. त्यातला मी अनट्रीटेड आहे. शिकताना माझ्या लक्षात आले की वेडा कोण नाही. जो आपले वेड चांगल्यातऱ्हेने लपवू शकतो, तो वेडा नाही. त्यामध्ये मी यशस्वी झालो. मला नाटकाचा आधार मिळाला. जरी मी वागलो वेड्यासारखा तरी लोकं म्हणतात सोडून द्या, तो नाटक करतोय. अनेक वेळा माझ्या अभिनयाची मदत घेऊन मी कठिण प्रसंगातून बाहेर पडलो असा अनुभव मोहन आगाशे यांनी व्यक्त केला.

खरंतर मी त्या सर्वांचा ऋणी

ज्या शहराने माझ्या सगळ्या दोषासह सामावून घेतले, आणि आज मला पुरस्कार दिला. नाटकात काम करताना किंवा भाषण करताना मला कधी दडपण आलं नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा माझं कौतूक होतंय, तेव्हा दडपण येतंय. कारण माझ्यासमोर पुणेकर आहेत. पण मी पण पुणेकर आहे. पुण्यभूषण मिळाल्यानंतर असं वाटलं की, दिवस संपल्यावर सायंकाळी घरची आठवण येते. घरचं कौतूक व्हायला पाहिजे. तसा हा पुण्यभूषण माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी आला आहे. खास पुणेकर असल्याने मी तावून सुलाखून घेतला आहे. त्यानिमित्त किती मतभेद होतील. तसं पुण्यात मतभेदाला भरपूर संधी आहे. खरंतर वर्गामध्ये खूप मुलं असतात. एखादा पहिला येतो. पण पहिल्या येण्याच्या लायकीची खूप मुलं असतात. तशी इथं खूप लोकं आहे, ज्यांना पूण्यभूषण मिळाला पाहिजे. पण आमचा नंबर लागला. खरंतर मी त्या सर्वांचा ऋणी आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने हा पुरस्कार मी घेतलेला आहे. - डॉ. मोहन आगाशे

वैद्यकीय क्षेत्र अन् अभिनय माझे दोन पाय !

शिक्षण घेत असताना आणि नाटक करताना माझ्या लक्षात आले की, अभिनयाचा उपयोग शिक्षणात होऊ शकतो. सुमित्राबाई, जब्बार यांच्यासोबत काम करताना असं लक्षात आलं की वैद्यकीय शिक्षण आणि नाटक हे एकमेकांशी पूरक आहेत. ते माझ्या जगण्याचे दोन पाय आहेत. जसे दोन डोळे, दोन कान असतात, तसे हे माझे दोन पाय आहेत. एक वैद्यकीय क्षेत्र जे आजाराविषयी मला ज्ञान देते आणि दुसरं नाटक जे मला माणसं समजून घ्यायला मदत करते. चित्रपट, सिनेमांनी मला भावनांचा आदर करायला शिकवले, असे आगाशे म्हणाले.

अनुपम खेर यांनी काढला व्हिडीओ!

मोहन आगाशे यांचा वाढदिवस असल्याने अनुपम खेर यांनी सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांना विनंती केली की, आपण सर्वांनी मिळून मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि मी त्याचा व्हिडीओ तयार करतो. अवघ्या सभागृहाने हॅपी बर्थडे म्हणून शुभेच्छा दिल्या. आगाशे यांच्या 92 वर्षाच्या मामीने व्यासपीठावर येऊन विशेष शुभेच्छा दिल्या.

Web Title: I wanted to join the Indian Army Reminiscences told by Mohan Agashe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.