लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: विनोद सांगणे ही एक कला आहे.विनोदामुळे आपल्या सर्वांचे आयुष्य खूप सुखकर होते; पण हा विनोद निर्माण करणे व तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाच्या आत काहीतरी दु:ख वसलेले असते; परंतु आपल्याला दु:खाची झळ विसरत विनोदकर्ता माणसाच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेषा उमटवतो. त्यामुळे आपण थोडावेळ तरी ताण-तणावातून दूर जातो. अशी विनोदी माणसं जगली पाहिजे, असे मत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केले.
मारुती यादव लिखित ‘हसरे जग’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे, डॉ. न. म.जोशी, अनुराधा यादव आदी उपस्थित होते. मेहेंदळे म्हणाले की, काही विनोद हे काळाशी सुसंगत असतात. काही विनोद अजरामर झाले आहेत. शं. ना. नवरे नेहमी सांगायचे, विनोद, किस्सा सांगणे ही एक अवघड कला आहे. काही लोकं काय विनोद सांगतात ते कळत नाही तसेच त्यावर हसूही येत नाही. एकपात्री कार्यक्रम सादर करणे ही पण एक अनन्यसाधारण कला आहे. कोणतेही पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, सहकलाकारांशिवाय ही माणसं दोन- अडीच तास रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवत आनंद देतात.
मारुती यादवांनी मनोगतात सांगितले, या जगात रडणारे व रडवणारे खूप लोकं आहेत. पण हसणारे आणि हसवणारे लोकं खूप कमी आहेत.
आयुष्यात हे काम फार समाधान देते. पुण्यातील एकपात्री संस्थेतर्फे मारुती यादवांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बंडा जोशी, संतोष चोरडिया, वंदन नगरकर, वृंदा जोशी आदी कलाकार सहभागी होते. सूत्रसंचालन आनंद देशमुख, आभार प्रदर्शन संतोष चोरडिया यांनी केले.