भवतालच ‘विचित्र’ केलाय - गिरीश कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:01 AM2018-05-09T04:01:31+5:302018-05-09T04:01:31+5:30

आपल्याला रुचेल अथवा पटेल त्याविषयी अलिप्तपणे विचार करून भाष्य करणे हे कलेचे दायित्व आहे. अमीर खानच्या पत्नीला देशात असुरक्षित वाटतंय, माझ्या मुलीलाही परदेशात शिक्षण घ्यावसं वाटतंय, याचं कारण आपला भवतालच ‘विचित्र’ करून टाकलाय.

Girish Kulkarni News | भवतालच ‘विचित्र’ केलाय - गिरीश कुलकर्णी

भवतालच ‘विचित्र’ केलाय - गिरीश कुलकर्णी

Next

पुणे  - आपल्याला रुचेल अथवा पटेल त्याविषयी अलिप्तपणे विचार करून भाष्य करणे हे कलेचे दायित्व आहे. अमीर खानच्या पत्नीला देशात असुरक्षित वाटतंय, माझ्या मुलीलाही परदेशात शिक्षण घ्यावसं वाटतंय, याचं कारण आपला भवतालच ‘विचित्र’ करून टाकलाय. देशात चाललेल्या सर्वच गोष्टींची झाडाझडती घेऊन सरकार कबुली का देत नाही? असा संतप्त सवाल प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला. ज्याला देशद्रोही ठरवला, ‘तोच’ आज महाराष्ट्राचा दुष्काळ दूर करायला आला आहे, अशा परखड बोलातून त्यांनी सरकारलाच सणसणीत चपराक दिली.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत गिरीश कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले, त्या वेळी ते बोलत होते. शिक्षणाचे बाजारीकरण, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, पुरस्कार वापसी, राष्ट्रीय पुरस्कारांवर कलाकारांचा बहिष्कार, स्मार्ट सिटीमधील सांस्कृतिक परिप्रेक्ष्याबाबतची असजगता, सोशल मीडियामुळे आलेले एकटेपण अशा विविध मुद्द्यांचा परामर्श त्यांनी भाषणात घेतला.
आज शिक्षण व्यवस्थेने शिक्षणाचाच खेळखंडोबा केला आहे. अभ्यास आणि पात्रता असेल त्यानेच विशिष्ट गोष्ट केली पाहिजे असे कुठेही लिहिलेले नाही. एक टार्गेट ओरिएंटेड जीवन जगत आहोत. औचित्यभंग केल्याशिवाय नवीन वाट सापडत नाही. मात्र जिथे प्रस्थापितांची सद्दी असते त्यांच्याविरोधात कोणतीही गोष्ट केली की मग आम्ही टिकेला पात्र ठरतो. आम्ही आमची रेघ कमी करून चित्रपटातून काहीतरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न करतो, पण तिथेही आमची मुस्कटदाबी केली जाते. वेगळ्या पद्धतीचा विचार करणारी माणसं सर्वत्र विखुरलेली असल्यानेच बळ निर्माण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियाचाही खरपूस समाचार त्यांनी घेतला. ते म्हणाले, ‘सोशल मीडियावर भावनिक उकिरडे तयार झाले आहेत. तंत्रज्ञानाने समाजाला प्रतिक्रियावादी केले आहे. चर्चा आणि संवाद होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र आपली मते मांडताना खंडन करणाऱ्याचेही ऐकता आले पाहिजे.
मात्र बाष्कळ चर्चा घडत आहेत. या सोशल मीडियामुळेच माणसांमध्ये एकटेपण येत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

साहित्य संमेलन म्हणजे
प्रस्थ मांडायचे साधन
- साहित्य संमेलनात सातत्याने राजकीय वादविवाद आणि चर्चा झडतात. संमेलनात तदंत धंदेवाईक मंडळी जमा होतात. या संमेलनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गरजांचा आढावा घेतला जातो का? केवळ प्रस्थ मांडायचे हे साधन झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी संमेलनाच्या आयोजनावर बोट ठेवले.
- साहित्यात ‘कोसला’ कादंबरीने ५0 वर्षे पूर्ण केली, आजही ही कादंबरी लोकांना वाचाविशी वाटते. त्याच्यासारखी एकही कादंबरी झालेली नाही. आजचे साहित्य आणि कलासृष्टी बाजार कवी आणि कलाकारांनी भरलेला आहे. त्यांना खरच कवी किंवा नट म्हणावे का? असा प्रश्न पडतो. कुणाला म्हणावे? याचे निकषच प्रस्थापित झाले नाहीत. जिथे कुणी कवी मिळत नाहीत, मग तिथे कुणीही राजे निर्माण होतात. हे एक सांस्कृतिक कुपोषण असल्याची टीका कुलकर्णी यांनी केली.

स्मार्ट सिटी करताना सांस्कृतिक
पोच किंवा जाण आहे का?
पुण्याची स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न केला जातोय. भविष्यकालीन खूप काही संकल्पना राबविल्या जात आहेत. पण हे करताना सांस्कृतिक पोच किंवा जाण आहे का? व्यवस्थाकार म्हणून सजग आहात का? याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार
राष्ट्रपतींच्याच हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा हे म्हणणे योग्य आहे. पण जी केली ती बाष्कळ बडबड आहे. मला जेव्हा पुरस्कार मिळाला तो उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते मिळाला. या पुरस्कारासाठी अर्ज केला जातो आणि मग स्वीकृतेची मोहोर त्यावर उमटून तुम्हाला तो दिला जातो. पुरस्कारासाठी अर्ज करताना कलाकारांनी राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेणार अशी तळटीप दिली होती का? अशा शब्दातं त्यांनी कलाकारांचे कान टोचले.

ऐतिहासिक वास्तू पवित्र ठेवल्या जातात का?

- बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पुनर्विकासाच्या नावाखाली पाडली जाणार, यावर अनेक चर्चा झाल्या. पण मुळातच या वास्तूंना आपण कशा पद्धतीने वागवतो? कुठलीही वास्तू ही पवित्र राहात नाही. कुणाला या वास्तूशी खरच काही बांधिलकी आहे का? पुनर्विकासातून चार पैसे मिळवले तर बिघडले कुठे? असा सवालही गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

Web Title: Girish Kulkarni News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.