पवार कुटुंबातील व्यक्तीच म्हणते, 'आणखी पाच वर्षं हवं मोदी सरकार'; खासदाराने उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:54 PM2018-11-03T15:54:05+5:302018-11-03T15:58:09+5:30

केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत.

family member of Pawar told Modi government needs another five years, statement by mp amar sable | पवार कुटुंबातील व्यक्तीच म्हणते, 'आणखी पाच वर्षं हवं मोदी सरकार'; खासदाराने उडवली खळबळ

पवार कुटुंबातील व्यक्तीच म्हणते, 'आणखी पाच वर्षं हवं मोदी सरकार'; खासदाराने उडवली खळबळ

Next

बारामती - केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत. या विरोधकांमध्ये राष्ट्रवादी अग्रभागी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाविरोधात विविध आंदोलनाच्या माध्यमातुन टीका सुरू केली आहे. मात्र,देशाच्या विकासासाठी आणखी पाच वर्ष देशात ‘मोदी सरकार’ असावे, अशी इच्छा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवार  कुटुंबियातील एका जाणकाराने व्यक्त केली आहे. खासदार अमर साबळे यांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या सभेत हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पवार कुटुंबियातील ‘तो’ सदस्य कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दिवाळीच्या तोंडावर केलेली राजकीय फटाकेबाजी उपस्थितांनी कार्यक्रमात अनुभवली. मात्र खासदार साबळे यांची फटाकेबाजी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. यावेळी खासदार साबळे म्हणाले, पुणे येथील उद्योगपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्र्यासमवेत आपण उपस्थित होतो. आमच्या गप्पा सुरु होत्या,यावेळी तेथे पवार कुटुंबातील एक जाणकार सुज्ञ व्यक्ती उपस्थित होती. त्या व्यक्तीने देशाची विकासाची वाटचाल चांगली आहे. ही वाटचाल सुरू ठेवण्यासाठी आणखी पाच वर्ष  देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार  असावे, असे मत व्यक्त केले. त्यावर त्या व्यक्तीकडे पाहुन मी हसलो. त्यानंतर देखील त्या मतावर ठाम राहत त्या व्यक्तिने ‘मी पवार कुटुंबियांपैकी एक आहे, मी खोटे बोलत नाही. या देशात विकास होण्यासाठी देशात ‘मोदी सरकार’ असण्याची इच्छा पवार कुटूंबातील त्या व्यक्तिने व्यक्त केल्याचे  खासदार साबळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी सरकार खटकत असताना मोदी सरकार  पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छा बाळगणारा पवार कुटुंबियातील ‘तो’ सुज्ञ व्यक्ति कोण याची जोरदार चर्चा रंगली. यावेळी खासदार साबळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतची आठवण सांगून पवार या शेतकरी विरोधी असल्याची टीका केली. पवार यांच्या समवेत एका विमानप्रवासात शेजारी बसण्याचा प्रसंग आला.त्यावेळी सहज गप्पा मारताना माझ्यातील पत्रकार जागा झाला. त्यातून पवार यांना ‘साहेब, तुम्ही दहा वर्ष कृषिमंत्री आहात, मग तुम्ही स्वामिनाथन आयोग का लागु केला नाही,असा प्रश्न विचारला.त्यावर ज्येष्ठ नेते पवार यांनी देशात २९ टक्केशेतीमालाचे उत्पादक  आहेत. तर ७१ टक्के खाणारे आहेत.त्यामुळे २९ टक्के लोकांना न्याय देताना ७१ टक्के लोकांचे काय होईल, असे उत्तर दिले. पवार माझ्याकडे पाहुन हसले.या प्रसंगावरुन शेतकऱ्यांचे कैवारी म्हून घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नसल्याचे दिसुन येते. मात्र ज्यांना शेतकऱ्यांचे काही कळत नाही अशी टीका करतात. मात्र मोदींनी उत्पादक आणि खाणाऱ्यांचाही देखील विचार केला. स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला दीडपट भाव मोदी यांनी दिल्याचा दावा साबळे यांनी केला. त्यामुळे खासदार साबळे  यांच्या  फटाकेबाजीची चर्चा चांगलीच रंगली. ७० वर्षात न झालेले निर्णय मोदींनी घेतल्याचे साबळे म्हणाले.

Web Title: family member of Pawar told Modi government needs another five years, statement by mp amar sable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.