माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:22 AM2023-10-13T09:22:21+5:302023-10-13T09:23:15+5:30

या कार्यालयाच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याची व त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती....

Ex-MP Sanjay Kakad's problems increase! Municipal notice for unauthorized construction | माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस

माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस

पुणे: भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाला महापालिकेच्या वतीने अखेर नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत सर्व अनधिकृत बांधकाम स्वत: होऊन काढावे, अन्यथा महापालिका ते काढून टाकेल व त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या कार्यालयाच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याची व त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्याबाबत प्रशासनाने काकडे यांच्याकडे खुलासा मागितला, मात्र, तो दिला गेला नाही. त्यामुळे प्रशासनाने संबंधित जागेचा पंचनामा केला. तिसऱ्या मजल्यापर्यंतचीच परवानगी असताना चौथा मजला बांधून त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे पंचनाम्यात आढळले तसेच तिसऱ्या मजल्यावरही अनधिकृत बांधकाम केले असल्याचे निष्पन्न झाले.

महापालिकेची कोणताही परवानगी न घेता हे बांधकाम केले असल्याचे सिद्ध झाल्यामुळे प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेने तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना खुलासा मागवण्यात आला, तो दिला गेला नाही म्हणून स्मरणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराने महापालिका वेळकाढूपणा करत असल्याची टीका केली होती. त्याचबरोबर कारवाई झाली नाही तर महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे अखेर महापालिने आता काकडे यांना नोटीस बजावली आहे. हे मंगल कार्यालय माजी खासदार काकडे व त्यांच्या परिवाराच्या मालकीचे आहे.

Web Title: Ex-MP Sanjay Kakad's problems increase! Municipal notice for unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.