माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार स्मारकाचे काम सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:17 AM2017-12-29T00:17:56+5:302017-12-29T00:17:56+5:30

खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने झटून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे व गोरगरिबांच्या, वंचितांच्या मनात घर करून कायम स्मरणात राहणारे

Ex-MLA Late Narayanrao Pawar's memorial will be started | माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार स्मारकाचे काम सुरु करणार

माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार स्मारकाचे काम सुरु करणार

Next

हनुमंत देवकर
चाकण : खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने झटून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे व गोरगरिबांच्या, वंचितांच्या मनात घर करून कायम स्मरणात राहणारे, सलग वीस वर्षे आमदार म्हणून जनतेवर अधिराज्य करणारे माजी आमदार नारायणराव पवार उर्फ आप्पा यांच्या स्मारकाचा राज्यकर्त्यांना विसर पडला असून हा विषय नऊ वर्षे रेंगाळत पडला आहे. त्यांचे नातू ऋषिकेश रमेश पवार यांनी स्मारकाचा विषय स्वतःच हातात घेतला असून तालुक्यातील आप्पांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ‘स्व. नारायणरावजी पवार स्मृती प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून नवीन वर्षात स्मारक उभारण्याचा संकल्प केला असल्याची माहिती ऋषिकेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पवार म्हणाले, केवळ पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नव्हे, तर पिढ्यान पिढ्या जनतेच्या स्मरणात राहील असे सामाजिक काम स्मारकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे-नासिक महामार्ग किंवा चाकण-शिक्रापूर रस्त्यावर दोन एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. योग्य ठिकाणी जागा न मिळाल्यास प्रसंगी शेलगाव येथील आमची स्वतःची जागा त्यासाठी देणार आहोत. यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे त्यासाठी आर्थिक सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

@ दोन एकर जागेतील स्मारकात पुढील गोष्टींचा असेल समावेश

@ गोरगरिबांच्या कार्यक्रमासाठी १००० व्यक्तींची बैठक व्यवस्था होईल असा सुसज्ज हॉल,
@ अप्पांच्या जीवन पटावरील फोटो गॅलरी,
@ एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका,
@ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज ग्रंथालय,
@ अनाथ मुलांना दत्तक घेऊन अनाथाश्रम,
@ बगीचा, जॉगिंग ट्रॅक


@ माजी आमदार नारायण पवार यांच्या स्मारकाचा राज्यकर्त्यांना विसर
@ स्मारकाच्या विषयावर नेत्यांनी लढविल्या निवडणूका
@ नवीन वर्षात उभारणार स्मारक - नातू ऋषिकेश पवार यांचा संकल्प
@ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार करणार आर्थिक सहकार्य
@ नारायणराव पवार आजपर्यंतच्या इतिहासात सलग वीस वर्षे आमदार
@ सन २०१८ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रकल्पाची सुरुवात होणार

 काय आहे स्मारक प्रकरण :-

दिनांक १३ नोव्हेंबर २००८ रोजी नारायणराव पवार यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्या दशक्रियेच्या कार्यक्रमात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांनी आप्पांच्या स्मारकाची घोषणा केली. त्यानंतर एकदाही त्यावर विचारमंथन किंवा कार्यवाही करण्यात आली नाही. मात्र स्मारकाचे भांडवल करून व जनतेची सहानभूती मिळवून निवडणूक लढविल्या गेल्या.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीसाठी खेड, चाकण, शेलपिंपळगाव आदी ठिकाणी जागा घेतल्या. मात्र खेडच्या व्यापारी संकुलाला स्वर्गीय नारायणराव पवार व्यापारी संकुल नाव देण्याचा ठराव करूनही काहींनी राजकारण करून ते नाव काढण्यात आले.


आप्पांच्या राजकीय व सामाजिक कार्याची पार्श्वभूमी :-

स्वर्गीय नारायण पवार यांनी १९६२ साली ग्रामपंचायत सदस्य पदापासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते ५ वर्षे पंचायत समिती सदस्य व ५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य आणि ५ वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते.  भू-विकास बँकेचे संचालक, १९८४ ते २००४ या काळात सलग २० वर्षे आमदार होते तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सलग ३९ वर्षाच्या कालावधीत ४ वेळा सभापती पद भूषविले. त्यांच्याकाळात शेतकऱ्यांसाठी भामा-आसखेड धरण व चास-कमान धरण बांधण्यात आले. ३६ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. तालुक्यामध्ये १०० टक्के अनुदानित ४२ माध्यमिक विद्यालये काढली असून एकही संस्था स्वतःच्या नावावर केली नाही.



 

Read in English

Web Title: Ex-MLA Late Narayanrao Pawar's memorial will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.