स्वायत्त महाविद्यालयांकडे कोटींची थकबाकी; शुल्क न भरल्यास होणार कारवाई, विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:25 AM2023-12-01T09:25:54+5:302023-12-01T09:26:31+5:30

थकबाकीदार स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचे नाव, लोगो वापरण्यास बंदी घालण्यासह कठोर कारवाई करावी, पुणे विद्यापीठाचा निर्णय

Dues of crores to autonomous colleges Action will be taken if the fee is not paid | स्वायत्त महाविद्यालयांकडे कोटींची थकबाकी; शुल्क न भरल्यास होणार कारवाई, विद्यापीठाचा निर्णय

स्वायत्त महाविद्यालयांकडे कोटींची थकबाकी; शुल्क न भरल्यास होणार कारवाई, विद्यापीठाचा निर्णय

पुणे : स्वायत्त महाविद्यालये विद्यापीठाचे शुल्क भरण्यास टाळाटाळ करत असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, थकबाकीदार स्वायत्त महाविद्यालयांनी शुल्क न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि. २९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. थकबाकीदार स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचे नाव, लोगो वापरण्यास बंदी घालण्यासह कठोर कारवाई करावी, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी स्वायत्त (आटोनोमस) दर्जा मिळवला आहे. दिवसेंदिवस ही संख्येत भर पडत आहे. स्वायत्त महाविद्यालय स्वतः परीक्षेचे आयाेजन करतात. तसेच नवीन कोर्सेसही तयार करतात. मात्र, या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी, गुणपत्रिका यासह सर्वप्रकारचे प्रमाणपत्रे हे पुणे विद्यापीठाकडून मिळतात. स्वायत्त दर्जा मिळवताना शासननिर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या शुल्कातील १० ते १५ टक्के रक्कम महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे जमा करावी लागते. या अटीवरच स्वायत्त दर्जा मंजूर केला जातो. मात्र, स्वायत्त झालेल्या अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे शुल्क जमा केलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकला आहे.

विद्यापीठाकडे उत्पन्नाची साधने मर्यादिति आहेत. स्वायत्त महाविद्यालयांनी अशी थकबाकी ठेवल्यास विद्यापीठाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होऊन महसुलात घट होते. ज्यामुळे विद्यार्थी विकासाच्या अनेक योजनांवरही नकारात्मक परिणाम होतो. स्वायत्त महाविद्यालयांनी नियमांनुसार शुल्क जमा केले पाहिजे. - सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

एनएसएस अनुदानात भरीव वाढ

शासनमान्य निर्णयानुसार एनएसएसच्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आली. त्यानुसार सुधारित अनुदान २५० वरून ४०० रुपये प्रति विद्यार्थी करण्यात आले. तर विशेष शिबिर अनुदान ४५० वरून ७०० रूपये प्रति विद्यार्थी करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एनएसएसच्या १६ हजार ५०० विद्यार्थ्यांना तर शिबिरात सहभागी होणाऱ्या ८ हजार २५० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ हाेणार आहे. 

Web Title: Dues of crores to autonomous colleges Action will be taken if the fee is not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.