बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटला १४ वर्षांनंतरही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:35 AM2017-10-27T01:35:56+5:302017-10-27T01:35:59+5:30

पुणे : संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या कोट्यवधींच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले.

Due to the fake stamp misrepresentation case 14 years later | बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटला १४ वर्षांनंतरही प्रलंबित

बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटला १४ वर्षांनंतरही प्रलंबित

Next

पुणे : संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या कोट्यवधींच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले. १४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला नसून पुण्यात मोक्का न्यायालयात अजूनही खटल्याची सुनावणी सुरू आहे़
अब्दुल करीम तेलगी याला बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणात ३० आॅक्टोबर २००३ रोजी कर्नाटक पोलिसांनी पुण्याच्या न्यायालयात हजर केले होते़ या घटनेला १४ वर्षे पूर्ण होत आहे़ त्यानंतर अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या सहकाºयांवर पुण्याच्या मोक्का न्यायालयात एकूण ६७ आरोपींवर खटला सुरू होता़ तत्कालीन विशेष न्यायाधीश चित्रा भेदी यांच्यासमोर तेलगी व काही मुद्रांक विक्रेत्यांनी आपला गुन्हा कबुल केला़ भेदी यांनी तेलगी याला विविध कलमांखाली १३ वर्षे सक्तमजुरी आणि सुमारे १०० कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती़ त्याच्याबरोबर गुन्हा कबुल केलेल्या मुद्रांक विक्रेत्यांनाही त्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेऊन वेगवेगळी शिक्षा व ५ लाख रुपये दंड ठोठावला होता़ हा गुन्हा कबुल न केलेल्या १२ आरोपींविरुद्ध अजूनही खटला सुरू आहे़ माजी आमदार अनिल गोटे, कर्नाटकचे माजी मंत्री चेन्ना बायना कृष्णा यादव, निलंबित पोलीस अधिकारी श्रीधर वगळ, महमंद चाँद मुलाणी, दिलीप कामत, गोकुळ पाटील, लक्ष्मण सूर्यवंशी, दत्तात्रय डाळ, तेलगीचा पुतण्या परवेज तेलगी, अब्दुल अझीम तेलगी, त्यांचा वकील अब्दुल रशीद कुलकर्णी आणि तेलगीची पत्नी शहिदा तेलगी यांच्याविरुद्ध मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस़ एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़
या खटल्यात तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रणजितसिंह शर्मा यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर दुसºया दिवशी एसआयटीने अटक केली होती़ पुढे त्यांना या खटल्यातून वगळले़ तर, खटल्यातील मुख्य फिर्यादी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश देशमुख यांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे़ याबाबत अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी सांगितले, की तेलगी व अन्य काही आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना शिक्षा सुनावली होती़
ज्यांनी गुन्हा नाकारला त्यांच्याविरुद्ध अजूनही खटला सुरूच आहे़ या खटल्यात आतापर्यंत १५० हून अधिक जणांच्या साक्षीपुरावे नोंदविले आहेत़ या खटल्याची पुढील
सुनावणी ३ नोव्हेंबर २०१७ रोजी आहे़ तेलगी याला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे़ आपण व अन्य आरोपींचा गुन्हा एकच असतानाही त्यांना अत्यंत अल्प व आपल्याला
मोठा दंड सुनावला़ त्याविरुद्ध तेलगी याने सर्वाेच्च न्यायालयात दाद
मागितली आहे़
>खटल्याचा प्रवास
सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या या बनावट मुद्रांक गैरव्यवहाराची सुरुवात एका छोट्या प्रकरणातून झाली होती़ बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संशयास्पद मोटार पोलिसांना आढळून आली़ या मोटारीची तपासणी केली असता, त्यात काही हजार रुपयांचे बनावट मुद्रांक पुण्यात विक्रीसाठी आणण्यात आल्याचे आढळून आले़
७ जून २००३ रोजी घडलेल्या या घटनेपासून बनावट मुद्रांक प्रकरणाला सुरुवात झाली़ ही मोटार तेलगीची पत्नी शहिदा यांच्या नावावर होती़ यात सापडलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी भेंडीबाजार येथे काही दिवस वेशांतर करून पाळत ठेवली व त्यानंतर बनावट मुद्रांक छापण्याचा छापखाना जप्त केला़
या ठिकाणी छापलेले सुमारे ७०० कोटी रुपयांचे मुद्रांक व यंत्रसामुग्री जप्त केली होती़ त्याच्याअगोदर कर्नाटक पोलिसांनी बनावट मुद्रांक प्रकरणात अब्दुल तेलगीला अटक केली होती़ तेव्हा तो बंगळुरूच्या कारागृहात होता़ या प्रकरणात पत्नी शहिदा हिला आरोपी करण्यात येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी तेलगीकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला़
४पुण्यासह १२ राज्यांत तेलगीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते़ पुणे पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे तेलगीला हस्तांतरीत केल्यानंतर त्याला हॉटेलमध्ये नेऊन शाही बडदस्त ठेवल्याचा आरोप झाला़ त्यावर जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली़
उच्च न्यायालयाने या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली़ तत्कालीन पोलीस अधिकारी सी़ एच़ वाकडे या तपास पथकाचे प्रमुख होते़ या पथकाने पोलीस अधिकाºयांसह राजकीय नेत्यांना अटक केली़ अनेक वर्षे ते न्यायालयीन कोठडीत होते़ पुढे त्यांना जामीन मिळाला़
कर्नाटक पोलिसांनी तेलगी याची नार्को टेस्ट केली होती़ त्यात त्याने महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची नावे घेतली होती़ परंतु, त्यावर कधीच कारवाई झाली नाही़ एसआयटीनंतर या खटल्याची १२ राज्यांतील व्याप्ती लक्षात घेऊन तो सीबीआयकडे खटला वर्ग करण्यात आला़ पुणे न्यायालयात पुणे पोलीस, एसआयटी आणि सीबीआय अशा तीन तपास यंत्रणांनी वेगवेगळे दोषारोपपत्र दाखल केली आहेत़ त्यात हजारो पानांचा समावेश आहे़
तेलगी याच्या अनेक महागड्या गाड्या, हिरेजडीत घड्याळे व मुद्रांक छापण्यासाठीची मशीनरी असे साहित्य आजही पुण्यात पडून आहे़
तेलगी याने २० जानेवारी १९९४ रोजी मुद्रांक विक्रीचा परवाना मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता़ १८ मार्च १९९४ रोजी मुंबईत मुद्रांक विक्रीचा परवाना मिळाला़ त्याने अनेक मुद्रांक विक्रेत्यांकडे संपर्क करून त्यांचा परवाना दिला तर दरमहा ठराविक रक्कम देण्याचे आमिष त्यांना दाखविले़ मुद्रांक विक्रीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने अनेक मुद्रांक विक्रेत्यांनी त्याला आपला परवाना दिला़
या परवान्याचा गैरवापर करून तेलगीने बनावट मुद्रांक बँका, विमा कंपन्या, वाहन वितरक अशा मोठ्या प्रमाणावर मुद्रांक लागतात त्यांना त्यांच्या कार्यालयात मुद्रांक पोहचविण्यास सुरुवात केली़ ती सर्व अर्थातच बनावट होती़ अशा सुमारे ५ हजाराहून अधिक लोकांना तो मुद्रांक विकत असे़ हे मुद्रांक कधीही न्यायालयात येत नसल्याने ते बनावट आहेत, हे त्यापूर्वी कधीही पुढे आले नव्हते़

Web Title: Due to the fake stamp misrepresentation case 14 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.