धनगर समाज आंदोलन : इंदापूरला गांधीगिरी; बारामतीत ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:39 AM2018-08-15T00:39:02+5:302018-08-15T00:39:15+5:30

शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारशी धनगर आरक्षणावर चर्चा करून आरक्षणाचा विषय सोडवू, आंदोलनामधून कोणाचेही नुकसान होऊ नये, म्हणून धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या बसची पूजा व चालक वाहकांचा सत्कार करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

Dhangar Samaj Movement: Gandhigiri in Indapur | धनगर समाज आंदोलन : इंदापूरला गांधीगिरी; बारामतीत ठिय्या!

धनगर समाज आंदोलन : इंदापूरला गांधीगिरी; बारामतीत ठिय्या!

Next

इंदापूर - आंदोलन चुकीच्या मार्गाने करून जीवन संपवण्यात काहीच अर्थ नाही, शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करावे, शालेय तरुण मुलांवर गुन्हे दाखल होऊन त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारशी धनगर आरक्षणावर चर्चा करून आरक्षणाचा विषय सोडवू, आंदोलनामधून कोणाचेही नुकसान होऊ नये, म्हणून धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या बसची पूजा व चालक वाहकांचा सत्कार करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी धनगर समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे, विलास वाघमोडे, शिवाजीराव इजगुडे, मधुकर भरणे, अप्पा माने, लक्ष्मण देवकाते, दत्तात्रय पांढरे, अशोक चोरमले, विजय चोरमले यांच्या हस्ते तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
आंदोलनाची सुरवात शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शहरातील जुना पुणे-सोलापूर महामार्गावर बसची पूजा करून चालक वाहकाचा हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे डॉ. शशिकांत तरंगे, लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल मखरे यांनी, अन्यथा येणाऱ्या काळात सरकार विरोधात वेगवेगळ्या मार्गांनी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी बाळासाहेब कारगळ, बापू पारेकर, दादा पिसे, विजय वाघमोडे, सर्जेराव वाघमोडे, तुकाराम पारेकर, दादा शिंगाडे आदी धनगर समाजातील युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर धनगर समाज बांधवांच्या वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन कले. सकाळी १० वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होते.
बारामती, इंदापूर, तालुक्यांतील धनगर समाजाने ‘बंद’ न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, मदनराव देवकाते, धनगर प्रबोधन संघाचे राज्य अध्यक्ष गोविंदराव देवकाते, जी. बी. गावडे, तानाजी कोकरे, बाळासाहेब बंडगर, गणपत देवकाते, अविनाश भिसे, माधव कोकरे आदींनी सहभाग घेतला. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, येळकोट, येळकोट जय मल्हार, धनगर एकजुटीचा विजय असो, अरे कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही... आदी घोषणांनी बारामतीचा प्रशासकीय भवन इमारतीचा परिसर दुमदुमला. या वेळी धनगर समाज बांधवांनी जोरदार घोषणा दिल्या.

...आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर धनगर समाजबांधवांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर २४ आॅगस्ट रोजी धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतरदेखील निर्णय न झाल्यास समाज बांधवांच्या वतीने चौंडी येथे महामेळावा घेण्यात येणार आहे. या ठिकाणी शासनाने प्रातिनिधिक स्वरूपात आमची प्रमाणपत्रे आणावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Dhangar Samaj Movement: Gandhigiri in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.