१०० नंबरवरील कॉलमध्ये झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:05 PM2018-09-19T22:05:21+5:302018-09-19T22:10:22+5:30

पुणे शहर नियंत्रण कक्षातील १०० नंबर या क्रमांकावर पूर्वी दररोज २५  ते ३० हजार कॉल येत होते़. आता त्यांची संख्या एकदम १ हजार ते दीड हजारांपर्यंत कमी झाली़.का कमी झाली ही संख्या जाणून घ्या खालील बातमीतून..

Decrease in the calls of 100 numbers | १०० नंबरवरील कॉलमध्ये झाली मोठी घट

१०० नंबरवरील कॉलमध्ये झाली मोठी घट

Next
ठळक मुद्देइंटर एक्टीव्ह रिस्पॉन्स सिस्टिमचा परिणामअश्लिल संभाषण करणाऱ्या चौघांना गुन्हा दाखल

पुणे : पुणे शहर नियंत्रण कक्षातील १०० नंबर या क्रमांकावर पूर्वी दररोज २५  ते ३० हजार कॉल येत होते़. आता त्यांची संख्या एकदम १ हजार ते दीड हजारांपर्यंत कमी झाली़. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष खरंच मदतीची गरज आहे, त्यांना तातडीने मदत मिळणे शक्य होऊ लागले आहे़. पुणे पोलिसांनी १०० नंबर डायल कार्यप्रणालीला आयव्हीआरएस ही सिस्टीम बसविल्यामुळे अनावश्यक कॉलच्या संख्येत मोठी घट झाली आहे़. त्याचबरोबर इतक्या प्रचंड संख्येने येणारे अनावश्यक कॉल बंद झाल्याने नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी झाला आहे़. 
याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक डुंबरे यांनी सांगितले की, १०० क्रमांक हा मोफत असल्याने अनेकदा काही जण मुद्दाम रात्री अपरात्री कॉल लावून काहीही न बोलता तसाच हातात धरुन ठेवत़ अशा ब्लॅक कॉलची संख्या १४ ते १५ हजार होती़. तसेच काही जण कॉल केल्यावर रिंग वाजली की फोन ठेवून देत़ अशा मिस कॉलची संख्या त्याच्या खालोखाल होती़. असे कॉल करणाºयांमध्ये लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती़.  त्यानंतर वाहतूक कोंडीचे कॉल येत असत़ त्यानंतर ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, अशा कॉलची संख्या सुमारे ५०० च्या आसपास असते़. हे लक्षात घेऊन पोलिसांनी इंटर एक्टिव्ह व्हाईस रिपॉन्स सिस्टिमचा वापर करण्यास सुरुवात केली़.  
कशी चालते ही सिस्टिम
या सिस्टिमनुसार जेव्हा नागरिक १०० नंबरवर फोन करतील तेव्हा त्यांना प्रथम जयहिंद पुणे पोलीस कृपया आपल्या मदतीसाठी एक दाबा असे हिंदी, इंग्रजी व मराठीतून ऐकविले जाते़ त्याप्रमाणे नागरिकांनी कार्यवाही केल्यावर त्यांचा कॉल १०० नंबरला जोडला जाऊन त्यांना तात्काळ मदत पुरविली जाते़ तसेच त्यांना योग्य मदत मिळाली व त्यांचे समाधान झाले किंवा नाही याचा पाठपुरावा सुद्धा नियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांकडून घेतला जातो़. 
या सिस्टिममुळे अनावश्यक कॉल करणारे जयहिंद हा शब्द ऐकल्यानंतर पुढे कॉल चालू ठेवत नाही, असे लक्षात आले़. त्यामुळे कॉलच्या संख्येत मोठी घट झाली़. 
ही कार्यप्रणाली यशस्वीपणे राबविण्यासाठी पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे, अभियान आणि परसिस्टंट कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक वैभव गिव्हरे व त्यांचे सहकारी सारंग पंडीत, दीपक सापटे, नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी आश्लेषा माने, माधुरी अनमुले व स्रेहल केकडे यांनी परिश्रम घेतले़. 
...............
अश्लिल संभाषण करणाऱ्या चौघांना गुन्हा दाखल
नियंत्रण कक्षाला रात्री अपरात्री फोन करुन तेथे नेमणूकीस असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य व अश्लील भाषेत संभाषण करणाऱ्या चौघांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तसेच जे नागरिक अथवा त्यांची लहान मुले विनाकारण १०० नंबरला फोन करुन मिस कॉल देत होते, त्यांनाही त्यांच्या फोनवर फोन करुन पोलिसांनी समज दिली आहे़. 

Web Title: Decrease in the calls of 100 numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.