लसीकरणाच्या नावाखाली डॉक्टरांकडून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 01:45 AM2018-12-18T01:45:35+5:302018-12-18T01:46:20+5:30

खासगीत लस उपलब्ध केलेली नाही : पालकांकडून घेत होते ४०० रुपये

Deception by the doctor in the name of vaccination | लसीकरणाच्या नावाखाली डॉक्टरांकडून फसवणूक

लसीकरणाच्या नावाखाली डॉक्टरांकडून फसवणूक

Next

राजानंद मोरे 

पुणे : गोवर-रुबेला लसीकरणाच्या (एमआर व्हॅक्सिन) नावाखाली काही डॉक्टरांकडून पालकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाने ही लस खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध करून दिलेली नाही. मात्र, एका डॉक्टरने हीच लस असल्याचे भासवत एका पाच वर्षांच्या मुलीला लस दिली. त्यासाठी पालकांकडून ४०० रुपयेही घेतले. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता आपल्याकडील ‘स्टॉक’ संपला असल्याचे सांगितले.

गोवर व रुबेला या आजारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात दि. २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना लस दिली जात आहे. सध्या ही मोहीम सर्व शाळांमध्ये राबविली जात आहे. तसेच सर्व शासकीय, महापालिका रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध आहे. तसेच पालिकेने लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिलेल्या काही मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही लस आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मात्र, ही लस खासगी क्लिनिक, छोटी रुग्णालये, पालिकेची लसीकरण केंद्रे नसलेल्या एकाही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मात्र, काही डॉक्टरांकडून ‘एमआर’ ही लस आपल्याकडे असल्याचे भासवत पालकांची फसवणुक केली जात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, नºहे परिसरातील एका छोट्या क्लिनिकमध्ये पाच वर्षांच्या मुलीला लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर लस देण्यात आली. लशीमुळे मुलांना ताप, उलटी असा त्रास होत असल्याने पत्नीने डॉक्टरांना लशीबाबत विचारणा केली. शाळेमध्ये दिली जाणारी लस आहे का, असे विचारताच डॉक्टरांनी होकार दिला.
लस देण्यापूर्वी त्यांनी पैशांबाबत काही सांगितले नाही. लस दिल्यानंतर ४०० रुपये मागितले. त्यानुसार पत्नीनेही पैसे दिले. शाळेमध्ये ही लस घेण्याची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या नियमित लसीकरणाच्या नोंदवहीतही ‘एमआर व्हॅक्सिन’ दिल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे.

आता स्टॉक संपला
४संबंधित पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना लशीबाबत माहिती दिली. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने संबंधित डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत आपल्या मुलालाही ही लस द्यायची असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांशी झालेला संवाद...

खासगी डॉक्टरांकडे नाही लस
४गोवर व रुबेलासाठी बाजारात स्वतंत्र लशी उपलब्ध आहेत. दोन्ही लशी पहिल्यांदाच एकत्रित करून मोहिमेच्या माध्यमातून मुलांना दिली जात आहे. या लशीला ‘एमआर व्हॅक्सिन’ असे म्हटले जाते. नियमित लसीकरणामध्ये गोवर, गालफुगी आणि रुबेला या आजारांसाठी एकत्रितपणे ‘एमएमआर’ ही लस दिली जाते. ‘एमआर’ ही लस केवळ शासकीय यंत्रणेमार्फत दिली जात आहे. खासगी डॉक्टरांकडे ही लस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
सध्या शाळा, मनपाची रुग्णालये, ससून रुग्णालय व पालिकेने लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिलेल्या काही मोठ्या रुग्णालयांमध्येही ही लस उपलब्ध आहे. खासगी डॉक्टरांकडे लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांनी अन्य कोणत्याही डॉक्टरांकडे मुलांना घेऊन जाऊ नये. तसेच या काळात इतर डॉक्टरांनी एमएमआर ही लसही मुलांना देऊ नये, असे आवाहन सर्व डॉक्टरांना करण्यात आले आहे. याबाबत खूप जनजागृतीही केली आहे. पण त्यानंतरही काही डॉक्टर असे करीत असतील तर त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल.
- डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी,
महापालिका आरोग्य विभाग

लोकमत प्रतिनिधी : डॉक्टर, आता जे लसीकरण सुरू आहे, ती लस तुमच्याकडे आहे ना? माझ्या दोन वर्षांच्या मुलाला द्यायची आहे.
डॉक्टर : आता नाही. होते तेवढे संपले. आता अजिबात मिळत नाही.
प्रतिनिधी : कधीपर्यंत मिळेल?
डॉक्टर : नाही, आता प्रायव्हेटला त्यांनी बंदच करू टाकलं. मिळतच नाही.
आपल्याकडचे सेफ असते. पण गव्हर्नमेंटने आमच्याकडचे बंद केले. टोटल मार्केटमधून काढूनच घेतलं.
प्रतिनिधी : पण दुसऱ्यांना मागील आठवड्यातच दिलं ना.
डॉक्टर : होतं त्या वेळी. माझ्याकडे स्टॉक होता, तोपर्यंत वापरलं.

Web Title: Deception by the doctor in the name of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.