अतिक्रमणांच्या विळख्यात सायकल ट्रॅक

By admin | Published: April 1, 2017 02:49 AM2017-04-01T02:49:27+5:302017-04-01T02:51:19+5:30

स्वयंचलित दुचाक्यांमुळे पुसली गेलेली ‘सायकलींचे पुणे’ ही शहराची ओळख पुन्हा मिळवून देण्याचा पुणे महानगरपालिकेचा

Cycle track in the know of encroachments | अतिक्रमणांच्या विळख्यात सायकल ट्रॅक

अतिक्रमणांच्या विळख्यात सायकल ट्रॅक

Next

पुणे : शहर व परिसरात सायकलींसाठी दहा-बारा हमरस्त्यांवर ट्रॅक आहेत. या ट्रॅकचा वापर सायकलस्वार सहसा करतच नाहीत. एखाद्याने तो केला, तरी सध्या ‘वहिवाट’ असलेले लोक डोळे वटारत असल्याचे दुर्दैवी चित्र असून सायकलींऐवजी चायनीज सेंटर, खासगी दुकाने आणि हॉटेल्स यांचे पार्किंग, वॉशिंग सेंटर, भाजी आणि फळविक्रेते, तत्सम पथारीवाल्यांची तात्पुरती दुकाने, कचरा कंटेनर ठेवणे अशा भलत्याच कारणासाठी ट्रॅक उपयोगात आलेले आहेत.
स्वयंचलित दुचाक्यांमुळे पुसली गेलेली ‘सायकलींचे पुणे’ ही शहराची ओळख पुन्हा मिळवून देण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. सध्याच्या सैरावैरा आणि सुसाट वाहतुकीमध्ये सायकलस्वारच कमालीचे असुरक्षित असल्याने हा प्रकल्प स्वप्नवत असल्यासारखे नागरिकांना वाटते.
शहरालगतच्या हडपसर, संगमवाडी ते सादलबाबा दर्गा, बाँबे सॅपर्स ते विश्रांतवाडी, संगमवाडी ते सादलबाबा चौक, हॉटेल ग्रीन पार्क ते बालेवाडी स्टेडियम, पौड रोड ते चांदणी चौक, कर्वे रोड ते वारजे उड्डाणपूल, पुणे स्टेशन ते फित्झगेराल्ड पूल, गणेशखिंड ते पुणे विद्यापीठ चौक, नगर रोड खराडी ते मनपा नवीन हद्द, नगर रोड रामवाडी ते खराडी नाला, सिंहगड रस्ता अशा परिसरात सायकल ट्रॅक प्रामुख्याने आहेत. हे ट्रॅक अतिक्रमणग्रस्त असून, अनेक ठिकाणी ते तुटलेले, फुटलेले आहेत.
सायकली चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरी वेगवान वाहतुकीमध्ये आजही सर्वच रस्त्यांवर सायकलस्वार दिसतात. उपनगरांमध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत मोठे रस्ते तयार करताना अट म्हणून महानगरपालिकेतर्फे सायकल ट्रॅक बनविण्यात आले. त्यांचा उपयोग प्रामुख्याने रिक्षा किंवा दुचाक्या उभ्या करण्यासाठी, रस्त्यावरच्या विक्रेत्यांसाठी अनधिकृत ओटे म्हणून केला जात आहे.
दुचाकींचे पेव फुटल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतके सायकलस्वार सर्वच रस्त्यांवर आढळत होते.स्वयंचलित दुचाकींमुळे शहर प्रदूषणाने भारले आहे. अलीकडे आरोग्यासाठी सायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. मात्र, स्वत:चा जीव मुठीत धरून सायकल चालवावी लागते.


सायकलींच्या पार्किंगचा मोठा प्रश्न
कधीकधी वेगात जाणारे मोटरसायकलस्वार धक्का देऊन जातात. सायकलस्वार खाली पडला आहे, हेही पाहत नाहीत. त्यामुळे सायकली चालविण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था असली पाहिजे. सायकलींच्या पार्किंगचा मोठा प्रश्न आहे.
मोटरसायकलच्या पार्किंगमध्ये सायकली लावू देत नाहीत, त्यामुळे सायकली कशाही कोठेही उभ्या करून ठेवाव्या लागतात. सैरावैरा वाहतुकीमुळे सायकल चालविण्याची भीती वाटते. त्यामुळे जिवाची भीती वाटणार नाही, अशी वाहतूक व्यवस्था असली पाहिजे, अशी सायकलस्वारांची अपेक्षा असल्याचे त्यांच्याशी बोलताना दिसून आले.
सायकलस्वारांसाठी खास मार्ग असले पाहिजेत, सायकलींच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे. सायकलस्वारांना सायकल चालविताना भीती वाटणार नाही, असे सुरक्षित, निर्धोक वातावरण असले पाहिजे, अशी अपेक्षा सायकलस्वार व्यक्त करत आहेत. अनेक सायकलस्वार गरीब असतात. त्यांना अपघात झाले की ससून रुग्णालयात नेण्याची वेळ येते. त्यामुळे सुरक्षित वातावरण हा क ळीचा मुद्दा आहे.

स्वारगेट ते कात्रज
अस्तितवात असलेल्या सायकल ट्रॅक्सची लोकमतने पाहणी केली. या पाहणीत अनेक गोष्टी समोर आल्या. स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या सायकल ट्रॅकवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले दिसून येते. तुटलेले दुभाजक ट्रॅकवरच पडलेले आहेत. दुचाकीस्वार सर्रास सायकल ट्रॅकवरून जाताना दिसून आले. काही ठिकाणी चारचाकी वाहने ट्रॅकवर लावण्यात आली होती. त्यामुळे अनेक सायकलस्वार मुख्य रस्त्याचा वापर करताना दिसून येतात.

पालिकेकडून कचरा कंटेनर
कात्रजकडून स्वारगेटकडे येणाऱ्या सायकल ट्रॅकची परिस्थिती आणखीनच भीषण आहे. सायकल ट्रॅकमध्येच महापालिकेकडून कचरा कंटेनर ठेवण्यात आला असून, त्यातील कचरा इतरत्र पसरलेला असतो. त्याच्या पुढच्या भागात एका टायर व्यावसायिकाने अतिक्र मण केले आहे. दुभाजक सुस्थितीत नसल्याने वाहनचालक सहज सायकल ट्रॅकवर प्रवेश करतात. काही ठिकाणी सायकल ट्रॅक सुस्थितीत असले तरी सलग ट्रॅक नसल्याने सायकलस्वारांनी त्याकडे पाठ फिरवलेली आहे़

३ ते ५ किलोमीटर अंतराचा ट्रॅक
सिंहगड रस्त्यावरील सायकल ट्रॅक सुदैवाने बऱ्या स्थितीमध्ये आहे. वडगाव फाट्याजवळील ह्युम पाईप कंपनीपासून सुरू होणारा ट्रॅक राजाराम पुलापर्यंत आहे. पुलावरून पलीकडे गेल्यानंतर कर्वेनगर ते म्हात्रे पुलापर्यंत हा ३ ते ५ किलोमीटर अंतराचा ट्रॅक आहे. मात्र तो आणि पदपथ एकमेकांना जोडून आहेत. त्यामध्ये असलेले दुभाजक कमी उंचीचे असल्याने पादचारी ट्रॅकवरून जाताना दिसतात.

सायकल मार्गावर खोदकाम

1पुणे-सातारा रोड व मुंबई हायवेला समांतर असणारा कात्रज मार्ग असल्यामुळे येथून पुण्याकडे येणाऱ्या नागरिक, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावरील सायकल मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम चालू असल्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.
2भारती विद्यापीठ भागात ट्रॅकवर स्वयंचलित दुचाकी वाहनांना मज्जाव करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा दिसली नाही. सायकल ट्रॅकची रुंदी सर्वत्र एकसारखी नाही, चैतन्यनगर ते बालाजीनगर या भागात तर ते ट्रॅकच गायब झालेले दिसतात. बऱ्याचदा भारती हॉस्पिटल, चैतन्यनगर, बालाजीनगर, पद्मावती परिसरातील सायकल ट्रक, पादचारी मार्गावर दुचाकीस्वार वाहने चालवताना आढळतात.

हातगाड्या, विक्रेते

एलोरा पॅलेस भागात सायकल ट्रॅक आणि फुटपाथ हे एकमेकाला खेटून बनविले गेल्याने आणि एकाच पातळीत असल्याने चालणारे नागरिक सहज सायकल ट्रॅकवर येतात, त्यातही हातगाड्या, विक्रेते असल्याचे दिसले. विक्रेते फुटपाथवर बसल्यानंतर त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे सायकल ट्रॅकवरच उभे राहिलेले दिसतात.
सिटी प्राईड इथे चायनीज गाड्या, टपऱ्या, पथारीवाले, वॉशिंग सेंटर यांच्यासाठी सायकल ट्रॅक म्हणजे मालकी हक्काचे असल्याच्या थाटात असतात. संध्याकाळ झाल्यानंतर फोल्डिंग टेबल मांडून सर्रास सायकल ट्रॅक अडविला जातो. मैलभर अंतरावर गाडी लावून चालत जाणे अजूनही नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बसत नाही, त्यामुळे या परिसरात दुचाकी आणि चारचाकी पार्किंग करण्यासाठी हा ट्रॅक वापरला जात आहे.

मंगल कार्यालयांचे पार्किंग
सकाळी किंवा सायंकाळी या ट्रॅकचा वापर फिरण्याचा व्यायाम घेणाऱ्यांकडून होतो. डी. पी. रस्त्यावर मंगल कार्यालयांमध्ये आलेल्या नागरिकांना पार्किंगसाठी सायकल ट्रॅक ही हक्काची जागा आहे. या ट्रॅकचा वापर सायकलस्वार सहसा करतच नाहीत. ह्युम पाईप ते माणिकबागपर्यंत सायकल ट्रॅक सलग असून, माणिकबाग चौकानंतर तो आनंदनगरपर्यंत सलग आहे. चौकामध्ये तुटलेल्या ट्रॅकची सलगता थेट राजाराम पुलापर्यंतच्या चौकापर्यंत आहे.

Web Title: Cycle track in the know of encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.