आदिवासींच्या संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे : डॉ. प्रकाश आमटे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 07:40 PM2019-07-02T19:40:55+5:302019-07-02T19:41:47+5:30

आदिवासींकडे शिक्षण, हक्कांची जाणीव नसल्याने पर्याय नव्हते.

Conservation of tribal culture should be done: Dr. prakash Amte | आदिवासींच्या संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे : डॉ. प्रकाश आमटे 

आदिवासींच्या संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे : डॉ. प्रकाश आमटे 

googlenewsNext
ठळक मुद्देमाडिया शिकू या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : आदिवासींकडे शिक्षण, हक्कांची जाणीव नसल्याने पर्याय नव्हते. त्यामुळे वाईट परंपरा, अंधश्रध्दा त्यांच्यामध्ये रुजल्या होत्या. शहरात पर्याय असूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. शिक्षणाने आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन दिली. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची संस्कृतीही टिकून राहिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ' माडिया शिकू'  या या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सोमवारी घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखन मंजिरी परांजपे, ऋजुता टिळेकर, मैथिली देखणे-जोशी, ख्रिस्तीन फरायस यांनी केले आहे.   
आदिवासींना शिक्षण देण्यासाठी बाबांनी प्रयत्न सुरू केले. बाबांच्या शाळेत अनेक स्वयंसेवक आपणहून रुजू झाले. ते गावोगावी फिरले, भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुले शाळेतून पळून जायची. दोन वर्षांनी हे प्रमाण कमी झाले. शहरी संस्कृतीचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ नये, अशी इच्छा होती. ४५ वर्षांत वाईट प्रथा कमी होत गेल्या. संस्कृती मात्र टिकून राहिली, याकडेही आमटे यांनी लक्ष वेधले.
किरण कुलकर्णी म्हणाले, आदिवासी प्रवाह मुख्य प्रवाहात नेण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू आहे. मुख्य प्रवाहात आज गोंधळलेली अवस्था आहे. या अवस्थेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आदिवासी प्रवाहात नक्की सापडतात. शासकीय चौकटीच्या मयार्दा पाळून हे प्रवाह एकत्रित करण्याचे आव्हान पेलायचे होते. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करताना त्यांना मुख्य प्रवाहातील संधी मिळवून देणेही महत्वाचे आहे. संशोधनातून येणारी प्रगल्भता, अभ्यासातून येणारे भान आणि वर्तमानाची जाणीव यांचा समुच्चय संस्थेमध्ये आहेत.ह्ण
लेखिका मंजिरी परांजपे आणि मनीषा मज्जी या माडिया जमातीतील विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. सहआयुक्त नंदिनी आवाडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.विनीत पवार यांनी आभार मानले.
----------------
भारतात १० कोटी आदिवासी आहेत. ते जंगलाचे राजे होते. कायदे आले आणि जंगलाचा अधिकार वन विभागकडे गेला. त्यामुळे आदिवासी भरडले जाऊ लागले. त्यांना त्यांच्या अधिकारांची, हक्काची जाणीव नव्हती. त्यांना शिक्षण देण्यासाठी शासनाने शाळा सुरू केल्या. पण, आदिवासींची बोलीभाषा जाणणारे शिक्षक नव्हते. अन्यथा शिक्षणाचा स्तर उंचावला असता.
- डॉ. प्रकाश आमटे

Web Title: Conservation of tribal culture should be done: Dr. prakash Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे