उन्हाळी सुट्टयातल्या शिबिरांमध्ये मुले खरंच सुरक्षित आहेत ?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:56 PM2019-04-04T12:56:44+5:302019-04-04T13:07:10+5:30

शाळांची उन्हाळी सुट्टी म्हणजे शिबिरांचा हंगाम ! किंबहुना,समर कँप गेल्या काही काळात जणू स्टेटस सिंबॉलच बनू लागले आहे..

Children are safe in summer vacation camps? | उन्हाळी सुट्टयातल्या शिबिरांमध्ये मुले खरंच सुरक्षित आहेत ?  

उन्हाळी सुट्टयातल्या शिबिरांमध्ये मुले खरंच सुरक्षित आहेत ?  

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांची सुरक्षितता हाच आयोजक आणि पालक दोघांचाही प्राधान्यक्रम असायला हवानियोजनाबाबत शिबिरांचे आयोजक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा सहली, साहसी खेळ यामध्ये पालकही मुलांसह सहभागी झाल्यास मुलांची काळजी घेणे सोपे

- प्रज्ञा केळकर-सिंग-   
पुणे : शाळांची उन्हाळी सुट्टी म्हणजे शिबिरांचा हंगाम! मुलांना नवीन काहीतरी शिकता यावे, उपक्रमांची माहिती यावी,निसर्गाशी जवळीक साधता यावी अशा नानाविध कारणांनी पालक शिबिरांमधील मुलांच्या प्रवेशासाठी उत्सुक असतात. किंबहुना,समर कँप गेल्या काही काळात जणू स्टेटस सिंबॉलच बनू लागले आहे. उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना नव्या गोष्टी शिकता येतातच; पण मुले तेथे सुरक्षित आहेत का, साहसी खेळ, सहली, ट्रेकिंग अशा उपक्रमांच्या वेळी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला आहे का, याबाबत पालकांनी डोळयात तेल घालून लक्ष देणे गरजेचे असते.             
मुलांची सुरक्षितता हाच आयोजक आणि पालक दोघांचाही प्राधान्यक्रम असायला हवा, असे मत व्यक्त होत आहे. प्रथमोपचार पेटी, मुलांना ठरावीक क्रमांकाचे बिल्ले लावणे, पुरेसे मदतनीस अशी काळजी घेतल्यास संभाव्य धोका टाळण्यास मदत होते.  उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना साहसी खेळ, सहली, ट्रेकिंग अशा विविध उपक्रमांना वयोगटनिहाय प्राधान्य दिले जाते. अशा वेळी योग्य काळजी न घेतल्यास मुलांना दुखापत होण्याची, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी आयोजकांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, नियोजन कोणत्या पध्दतीने केले जात आहे, याबाबात शिबिरांचे आयोजक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा होणे आवश्यक मानले जात आहे.  
    बालभवनच्या संचालिका शोभा भागवत म्हणाल्या, सहलीला नेल्यावर अथवा बागेत घेऊन गेल्यावर मुलांवर नियंत्रण ठेवणे ही मोठी कसरत असते. गर्दीच्या ठिकाणी मूल अनोळखी व्यक्तीबरोबर गेल्यास, दुखापत झाल्यास, दुर्घटना घडल्यास ती जबाबदारी पूर्णपणे आयोजकांची असते. मुलांना बाहेर घेऊन जाताना संभाव्य धोके लक्षात घेऊन डोळयात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. मुळात, आयोजकांनी नसते धाडस करुन मुलांना धोक्याच्या ठिकाणी घेऊन जाऊच नये. कोणताही उपक्रम मुलांच्या जिवावर बेतणार नाही, याची काळही घ्यायला हवी. मुलांची सहल आयोजित करताना बाग, ऐतिहासिक स्थळे अशी सुरक्षित ठिकाणे निवडणे आवश्यक असते. मुलांची संख्या मर्यादित असावी, तसेच तीन-चार मुलांमागे एका मदतनीसाची नेमणूक केली जावी.  सहा वर्षांच्या चिमुरड्याची आई रुपाली चव्हाण म्हणाल्या, केवळ मूल घरात बसून राहू नये म्हणून किंवा आई-वडिलांना वेळ नाही म्हणून मुलांना उन्हाळी शिबिरांना घालणे चुकीचे आहे. मुलांचा स्वभाव, क्षमता, आवड याची पालकांना पूर्ण कल्पना असते. त्यानुसारच,शिबिरांची निवड करावी. शक्य असल्यास, सहली, साहसी खेळ यामध्ये पालकही मुलांसह सहभागी झाल्यास मुलांची काळजी घेणे सोपे जाते. 
-------
शिबिरांमध्ये मुले सुरक्षित आहेत?
पूर्ण चौकशी केल्याशिवाय, शिबिरांचा उद्देश जाणून घेतल्याशिवाय आणि खात्री असल्याशिवाय शिबिराची निवड करुच नये. शिबीर आयोजकांना मुलांच्या स्वभावाची बारीकसारीक माहिती द्यावी. आयोजकांनी उपक्रमांची निवड करताना कायम जोखीम टाळावी. मुलांना मोठ्या संख्येने बाहेर घेऊन जाणे टाळले पाहिजे. ट्रेकिंगला जाताना तज्ज्ञ व्यक्ती तसेच जास्तीत जास्त मदतनीस बरोबर असावेत. प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक केलेली असावी.
- वैदेही नेहरकर, शिबिर संयोजिका
-----------
मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय काळजी घेता येईल?
- मुलांची संख्या मर्यादित असावी.
- गदीर्ची वेळ, वार आणि ठिकाण टाळावे.
- प्रत्येक तीन-चार मुलांमागे एक मदतनीस असावी.
- मुलांना ठरावीक क्रमांकाचे बिल्ले, ओळखीची खूण लावावी.
- नसते धाडस करुच नये.
- पालकांचे संपर्क क्रमांक कायम सोबत बाळगावेत.
- ट्रेकिंगच्या वेळी सोपी चढण निवडावी, प्रशिक्षित व्यक्ती बरोबर असाव्यात.

Web Title: Children are safe in summer vacation camps?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.