चक दे इंडिया :जिद्दीच्या जोरावर मनाली निघाली अबूधाबीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 09:11 AM2019-02-26T09:11:59+5:302019-02-26T09:15:02+5:30

जन्माला येणारं  आपलं मूल हसरं, खेळत आणि निरोगी असावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत. पुण्यातले मनोज आणि नीलिमा शेळके दाम्पत्यही त्याला अपवाद नव्हते. पण त्यांच्या आयुष्यात आनंद बनून येणारी मनाली जेव्हा 'स्पेशल चाईल्ड' आहे असं  त्यांना समजल्यावर त्यांना धक्काच बसला.

Chak De India: Down syndrome girls Manali Shelke going to participate in special olympic | चक दे इंडिया :जिद्दीच्या जोरावर मनाली निघाली अबूधाबीला 

चक दे इंडिया :जिद्दीच्या जोरावर मनाली निघाली अबूधाबीला 

Next

पुणे : जन्माला येणारं  आपलं मूल हसरं, खेळत आणि निरोगी असावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत. पुण्यातले मनोज आणि नीलिमा शेळके दाम्पत्यही त्याला अपवाद नव्हते. पण त्यांच्या आयुष्यात आनंद बनून येणारी मनाली जेव्हा 'स्पेशल चाईल्ड' आहे असं  त्यांना समजल्यावर त्यांना धक्काच बसला. मात्र त्यातून सावरून त्यांनी मनालीला स्वीकारलं आणि नुसतं स्वीकारलं नाही तर घडवलं सुद्धा ! हीच १९ वर्षांची मनाली मनोज शेळके आज जागतिक 'विशेष' ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अबूधाबीला रवाना होत आहे. 

   १९९९साली जन्मलेली मनाली सुरुवातीचे तीन महिने सर्वसाधारण मुलांप्रमाणे होती. मात्र त्यानंतर तिच्या चेहऱ्यात आणि एकूण हालचालीत होणारे बदल मात्र शेळके दाम्पत्याला वेगळे वाटू लागले. त्यांनी तात्काळ डॉक्टरचा सल्ला घेतला, तपासण्या केल्या आणि तिला 'डाउन्स सिंड्रोम' असल्याचे समोर आले. हा धक्का त्यांना कोसळवून टाकणारा होता. क्वचित समाजात बघायला मिळणारे स्पेशल मुलं आपल्या पोटी जन्माला आले हे स्वीकारणं तितकं सोपेही नव्हतं. मात्र त्यातूनही मार्ग काढत ते खंबीर झाले. तिची शारीरिक, बौद्धिक वाढ, संगोपन अशा सर्व गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. अगदी एखाद्या नॉर्मल मुलीप्रमाणे तिला वागणूक दिली. वयाच्या सहाव्या वर्षी तिला कामयानी विद्या मंदिर या विशेष मुलांच्या शाळेत घातले. या शाळेत इयत्ता नसल्या तरी मुलांना जास्तीत जास्त स्वयंपूर्ण केले जाते.

    मनालीचे वडील सांगतात, 'तिला खेळ आणि कलेची पहिल्यापासून आवड. तिने कथकच्या दोन परीक्षाही दिल्या. मात्र पुढच्या परीक्षेत लेखी भाग असल्याने तिने परीक्षा न देता नृत्य करणे पसंत केले. दुसरीकडे वेटलिफ्टिंगमध्ये तिचे मन रमू लागले. अगदी मनापासून ती सराव करायची. त्याचेच फळ म्हणून कोल्हापूरच्या १८ राज्यातील खेळाडू सहभागी असलेल्या स्पर्धेत तिला एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावता आले'. याच स्पर्धेतून तिची निवड जागतिक स्तरावर होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झाली आहे. येत्या १५ ते २१ मार्चच्या दरम्यान ही स्पर्धा पार पडत आहे. तिच्या रूपाने महाराष्ट्राचे आणि देशाचेही नाव आंतराराष्ट्रीय स्तरावर झळकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Chak De India: Down syndrome girls Manali Shelke going to participate in special olympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.