‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:37 PM2019-02-01T18:37:03+5:302019-02-01T18:44:06+5:30

राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य हे वास्तव लघुपटाच्या माध्यमातून प्रखरतेने दाखवण्यात आले आहे.

'The Captivity' published At the European International Festival | ‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात

‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात

Next
ठळक मुद्देपुण्यातील तरुणाची भरारी : माध्यमांच्या सद्यस्थितीवर परखड भाष्यया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ९२ देशांतून ९०० लघुपटांनी घेतला सहभाग ७२० पैकी सहा उत्कृष्ट लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड

पुणे : लोकशाहीचा प्रभावी आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेची अलीकडच्या काळातील अवस्था, राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य हे वास्तव लघुपटाच्या माध्यमातून प्रखरतेने दाखवण्यात पुण्यातील किशोर लोंढे या युवा दिग्दर्शकाला यश आले आहे. किशोर लोंढे याने दिग्दर्शित केलेल्या आजच्या पत्रकारितेवर आधारित द कॅप्टिव्हिटी या लघुपटाने लाईफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द बेस्ट शॉर्टफिल्म विभागामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. हा महोत्सव युरोपातील प्रिश्टिना कोसोवा येथे आयोजित करण्यात आला होताा.
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ९२ देशांतून ९०० लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील ७२० पैकी सहा उत्कृष्ट लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात द कॅप्टिव्हिटी या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. या एक मिनिटाच्या लघुपटामध्ये पत्रकारितेचे वास्तव, तसेच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. आत्तापर्यंत युरोप, अमेरिका, इटली, रशिया, आफ्रिका इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये हा लघुपट दाखण्यात आला असून ब-याच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या लघुपटाने अंतिम फेरी गाठली आहे. 
‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाचे चित्रीकरण प्रीतेश गावंडे यांनी केले असून निर्मिती अविनाश लोंढे यांनी केली आहे. किशोर लोंढे मूळचा वेणेगाव (ता. माढा) येथील आहे. एमबीए पदवीधर असूनही त्याने आपली चित्रपट निर्मितीची आवड जोपासण्याचा निर्णय घेत दिग्दर्शनात यश मिळविले आहे. याआधी किशोरचा आझाद हा लघुपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे लघुपटातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न किशोर आणि त्याचे सहकारी करत आहेत. त्यांनी आजवर आझाद, जन्मजात अशा लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. प्रिश्टिना कोसोवा येथे प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तसेच प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंदी आणि समाधानी असल्याचे मत किशोर लोंढे याने लोकमत शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: 'The Captivity' published At the European International Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.